भारताकडून 90 देशांना शस्त्रास्त्र निर्यात
मेक इन इंडिया मोहीम ठरली यशस्वी : राजनाथ सिंह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे संरक्षण उत्पादन 2023-24 या आर्थिक वर्षात 1.27 लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहे. आता भारत 90 हून अधिक मित्रदेशांना शस्त्रास्त्रs अन् सैन्य उपकरणांची निर्यात करत आहे. भारतीय सशस्त्रदल आता भारतात निर्मित शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत आणि देश जागतिक संरक्षण औद्योगिक पटलावर वेगाने उदयास येत आहे असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी काढले आहेत. मेक इन इंडिया कार्यक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीकोनातून मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू केला होता. तेव्हापासून 10 वर्षांनी संरक्षण क्षेत्रासमवेत प्रत्येक क्षेत्रात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये सरकारने देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि विशेषकरून चीनला लागून असलेल्या सीमेवर सैन्यसज्जतेला मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
21 हजार कोटीची निर्यात
भारताची संरक्षण निर्यात 2023-24 मध्ये पहिल्यांदाच 21 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिली आहे. संरक्षण मंत्रालयाने पुढील 5 वर्षांमध्ये हा आकडा वाढून 50 हजार कोटी रुपये करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. भारत जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांच्या मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. भारतीय सशस्त्र दलांकडून 2029 पर्यंत भांडवली खरेदीत सुमारे 130 अब्ज डॉलर्स खर्च होण्याचा अनुमान आहे. केंद्र सरकार आयात शस्त्रास्त्रांवरील निर्भरता कमी करू पाहत आहे. याचमुळे देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.