For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत - इंग्लंड महिला टी20 मालिका आजपासून

06:58 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारत   इंग्लंड महिला टी20 मालिका आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांदरम्यानची टी20 मालिका आज बुधवारपासून येथे सुरू होत असून इंग्लंडविऊद्धच्या द्विपक्षीय मालिकांतील निराशाजनक कामगिरी सुधारण्याचा आत्मविश्वास अलीकडच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला वाटत असेल. टी20 मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले आहे. तसेच बांगलादेशविऊद्धची मालिका 2-1 ने जिंकलेली आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून दाखविलेला आहे.

दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला इंग्लंड घरच्या मैदानावर श्रीलंकेकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागल्याने आलेली निराशा या मालिकेतून दूर करण्याचा प्रयत्न करेल. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताची घरच्या मैदानावरील ‘टी20’मधील तसेच सर्वसाधारणपणे इंग्लंडविऊद्धची कामगिरी खराब राहिलेली आहे. मात्र यावेळी त्यात बदल घडण्याची आशा यजमानांना आहे. मायदेशात इंग्लंडविऊद्धच्या नऊ सामन्यांमध्ये भारताने केवळ दोनच विजय मिळविलेले आहेत. त्यापैकी त्यांचा सर्वांत अलीकडील विजय पाच वर्षांपूर्वी मार्च, 2018 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर नोंदला गेला होता. इंग्लंडविऊद्धची भारताची एकंदर कामगिरीही चिंताजनकच असून 27 सामन्यांत त्यांना केवळ सात विजय मिळवता आलेले आहेत.

Advertisement

टी20 मध्ये दीप्ती शर्मा ही 16 सामन्यांमध्ये 19 बळी घेऊन भारताची सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरली आहे, फलंदाजीत 13 सामन्यांतून 323 जमविलेली हरमनप्रीत, 16 सामन्यांत 342 धावा जमविलेली जेमिमा रॉड्रिग्स तसेच उपकर्णधार स्मृती मानधना (15 सामन्यांत तीन अर्धशतकांसह 369 धावा) यांच्यावर भारताचा भार राहील. नुकत्याच संपलेल्या महिलांच्या बिग बॅश लीगमध्येही हरमनप्रीतने चांगली फलंदाजी केलेली आहे. या मालिकेसाठी भारताने तीन नवे चेहरे निवडलेले आहेत. यात कर्नाटकची फिरकीपटू श्रेयंका पाटील, पंजाबची डावखुरी फिरकीपटू मन्नत कश्यप आणि बंगालची डावखुरी फिरकीपटू सायका इशाक यांचा समावेश आहे.

संघ : भारत-हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.

इंग्लंड-हीदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माया बाउचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, माहिका गौर, डॅनिएल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोन्स, फ्रेया केम्प, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनियल वॅट.

Advertisement
Tags :

.