भारत-इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
दुखापतींनी त्रस्त भारतापुढे नवीन समीकरणे पडताळून पाहण्याचे आव्हान
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
इंग्लंड दौऱ्यातील आज बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात पुनरागमन केलेल्या इंग्लंडविऊद्ध खेळताना दुखापतींनी त्रस्त भारताला त्यांच्या पसंतीच्या फॉर्म्युलापासून दूर जावे लागू शकते. ओल्ड ट्रॅफर्ड येथील विजयहीन कामगिरीची परंपरा मोडून भारत आतापर्यंत आकर्षक राहिलेल्या या मालिकेत बरोबरी साधेल, अशी आशा आहे.
लीड्समधील पहिल्या कसोटीनंतर भारताने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये तीन अष्टपैलू खेळाडूंना समाविष्ट करून एक स्थिर संघ उतरविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नितीश रेड्डीr याचा समावेश होता, जो आता गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन फिरकी गोलंदाज अष्टपैलू असल्याने भारताला आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची ताकद खेचण्याची संधी मिळाली होती. परंतु मँचेस्टरमध्ये असे होऊ शकत नाही, जिथे पाहुण्या संघाला नऊ प्रयत्नांमध्ये अद्याप विजय मिळालेला नाही. यामध्ये चार पराभव आणि पाच अनिर्णीत सामने आहेत.
मालिकेतील या चौथ्या सामन्यात उतरताना इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील सलामीची लढत खेळलेला शार्दुल ठाकूर हा रेड्डीच्या जागी संघात खेळेल, पण त्याच्या फलंदाजीचा दर्जा तितका नाही. जर त्याची निवड झाली, तर त्याला आपली गोलंदाजीही सुधारावी लागेल. कारण रेड्डीने लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत वेळेवर बळी घेतले होते. उपलब्ध पर्यायांचा विचार करता भारत लीड्समध्ये खेळलेल्या संघाचा पुन्हा वापर करू शकतो. तिथे त्यांच्याकडे फक्त एक फिरकी गोलंदाज जडेजा होता आणि सहाव्या क्रमांकापर्यंत विशेष फलंदाज होते, ज्यात कऊण नायर आणि साई सुदर्शन या दोघांचाही समावेश होता.
या संघात अजूनपर्यंत संधी न मिळालेला वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा देखील आहेत. जर आकाश दीप त्याच्या कंबरेच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नाही, तर त्यांच्यापैकी कोणीही त्याच्या जागी येऊ शकतो. आकाश दीपप्रमाणेच कंबोज बऱ्यापैकी चेंडू स्विंग करू शकतो आणि या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी झालेल्या पहिल्या मैदानी सराव सत्रात तो चांगल्या स्थितीत दिसला. तो भारत ‘अ’च्या इंग्लंड दौऱ्याचा देखील भाग होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे अंतिम संघातील दोन निश्चित खेळाडू आहेत.
लॉर्ड्समध्ये पहिल्यांदाच भारतीय फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागला आणि यावेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील फळी पुन्हा योग्य दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या कसोटीत ठसा उमटविता आलेला नसला, तरी गिलने मालिकेत 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि संघाच्या दृष्टिकोनातून त्याला पुन्हा मोठी धावसंख्या उभारण्याचे काम करावे लागेल. जोफ्रा आर्चरने कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन करताना यशस्वी जैस्वालला दोनदा बाद केले आणि हा युवा भारतीय डावखुरा फलंदाज इंग्लंडच्या सदर वेगवान गोलंदाजाच्या वेगाचा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार असेल. जैस्वाल हा धावा जमविण्याच्या बाबतीत संघाचा आघाडीचा फलंदाज आहे.
परंतु सहा डावांमध्ये खेळपट्टीवर सर्वांत आत्मविश्वासू दिसलेला खेळाडू हा के. एल. राहुल असून त्याने इंग्लंडमध्ये वरच्या फळीत फलंदाजीचा मास्टरक्लास सादर केलेला आहे. सामन्याच्या 48 तास आधीच्या सराव सत्राचा विचार करता रिषभ पंत त्याच्या बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि नेहमीप्रमाणे त्याला दुहेरी जबाबदारी पार पाडेल. जर नायरला आणखी एक संधी मिळाली, तर तो त्याच्या चांगल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यास उत्सुक असेल. सलग चार वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढलेला रवींद्र जडेजा मधल्या फळीत चांगला फलंदाज आहे, पण त्याच्याकडून गोलंदाजीत अधिक प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.
या देशातील इतर ठिकाणांच्या तुलनेत भारत येथे नियमितपणे खेळलेला नाही. कारण त्यांचा शेवटचा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे 2014 मध्ये झाला होता. या मैदानावर भारतीय संघातर्फे शेवटचे शतक 90 च्या दशकात सचिन तेंडुलकरने झळकावले होते. भारताला आता विजय मिळविणे आवश्यक आहे, कारण इंग्लंडने लॉर्ड्सवर मालिकेत आघाडी घेतली आहे. नेहमीप्रमाणे बेन स्टोक्सने सामन्यापूर्वी त्याचा अंतिम संघ निवडला आहे आणि त्यातील एकमेव बदल म्हणजे जखमी शोएब बशीरऐवजी लियाम डॉसनला संघात स्थान देण्यात आले आहे. सदर डावखुरा फिरकी गोलंदाज शेवटचा जुलै, 2017 मध्ये इंग्लंडसाठी खेळला होता.
संघ : भारत-शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, कऊण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), ऑली पोप (उपकर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.
पंत यष्टीरक्षण सांभाळेल : गिल
भारताचा कर्णधार शुभमन गिलने महत्त्वाच्या चौथ्या कसोटीत रिषभ पंतच्या यष्टीरक्षक म्हणून सहभागाची पुष्टी केली आहे. अष्टपैलू नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यासारख्या प्रमुख खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागल्याने पंतचे सावरणे हे भारतासाठी दिलासादायक आहे. रेड्डीला आता मालिकेच्या उर्वरित सामन्यांमधून वगळण्यात आले आहे, तर लॉर्ड्स कसोटीदरम्यान दुखापतीशी झुंजावे लागलेला आकाश ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीतून बाहेर पडला आहे. लॉर्ड्समध्ये बोटाला दुखापत झालेल्या पंतने सोमवारी येथे दोन तासांहून अधिक काळ सराव केला. दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत पंतने फक्त 35 षटके यष्टीरक्षण केले होते आणि ध्रुव जुरेलने उर्वरित सामन्यात ती जबाबदारी सांभाळली होती.
पावसाचे सावट
गेल्या आठवडाभरापासून मँचेस्टरमध्ये नियमितपणे पाऊस पडत आहे आणि पाच दिवसांपैकी बहुतेक दिवशी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. ओले हवामान लक्षात घेता पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांसाठी आवश्यक ओलावा असेल. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आणखी एक चुरशीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.