भारत-इंग्लंड पहिली युवा कसोटी अनिर्णीत
शेखचे शतक, बेन मायेस, थॉमस यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ बेकेनहॅम, इंग्लंड
भारत यू-19 व इंग्लंड यू-20 संघांतील पहिली युवा कसोटी चौथ्या व शेवटच्या दिवशी अनिर्णीत राहिली. कर्णधार हामझा शेखने आघाडीवर राहत झुंजार शतक केल्याने भारताला विजयापासून वंचित ठेवण्यात इंग्लंडला यश आले.
इंग्लंड युवा संघाला 350 धावांचे विजयाचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी 63 षटकांत 7 बाद 270 धावा जमवित सामना अनिर्णीत राखला. भारत युवा संघाने पहिल्या डावात 540 व दुसऱ्या डावात 248 धावा जमविल्या तर इंग्लंड युवा संघाने पहिल्या डावात 439 धावा जमविल्या होत्या. भारताने विजय मिळवित मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण हामझा शेखने 140 चेंडूत 11 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 112 धावा जमवित भारताच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. त्याला बेन मायेस (82 चेंडूत 51), यष्टिरक्षक फलंदाज थॉमस ऱ्यू (35 चेंडूत 8 चौकारांसह 50) यांच्याकडून चांगली साथ मिळाली.
14 व्या षटकांत इंग्लंडची स्थिती 3 बाद 62 अशी झाली तेव्हा भारत हा सामना जिंकण्याच्या मार्गावर होता. पण शेखने महत्त्वाच्या भागीदारी करीत भारताला विजयापासून दूर ठेवले. शेवटचा तास बाकी असताना भारताने शेख व एकांश सिंग या दोघांना धावचीत करून विजयाच्या दिशेने आगेकूच केली. पण राल्फी अल्बर्ट (37 चेंडूत नाबाद 9) व जॅक होम (36 चेंडूत नाबाद 7) यांनी भारताकडून दबाव असूनही संयमी खेळ करीत संघाचा पराभव टाळण्यात यश मिळविले.
त्याआधी भारताच्या दुसऱ्या डावात विहान मल्होत्राने 85 चेंडूत 63 धावा जमविल्या. 3 बाद 171 अशा स्थितीवरून भारताची 6 बाद 187 अशी घसरण झाली. अंबरीशने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत 71 चेंडूत 53 धावा जमवित महत्त्वाचे योगदान दिले. तो शेवटच्या गड्याच्या रूपात बाद झाल्याने भारताचा डाव 248 धावांत संपुष्टात आला. भारत युवा संघाने याआधी झालेली पाच सामन्यांची वनडे मालिका 3-2 अशी फरकाने जिंकली आहे.
संक्षिप्त धावफलक : भारत यू-19 संघ 540 व 248, इंग्लंड यू-19 संघ 439 व 63 षटकांत 7 बाद 270.