भारत-इंग्लंड पहिली ‘वनडे’ लढत आज
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका
वृत्तसंस्था/ नागपूर
इंग्लंडविऊद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेस आज गुऊवारी येथे प्रारंभ होणार असून त्यानिशी भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करेल. मात्र या टप्प्यावर संघापुढे अनुभवी स्टार खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस याविषयी प्रश्न उभे झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर या मालिकेतून काही विशिष्ट जागांवर योग्य संतुलन साधण्याचे उद्दिष्ट संघापुढे राहील.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंवर क्रिकेटच्या मोठ्या स्वरुपामधील निराशाजनक कामगिरीनंतर प्रचंड टीका होत आहे. गेल्या महिन्यात रणजी ट्रॉफीमध्ये पण निराशाजनक कामगिरी केल्यानंतर अनेक वर्षांपासून ज्यावर वर्चस्व गाजविलेले आहेत त्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखविण्यावर त्यांचे लक्ष केंद्रीत झालेले असेल. 2023 च्या विश्वचषकात ते अव्वल दोन धावा काढणारे फलंदाज राहिले होते. त्यात कोहलीने 765 आणि रोहितने 597 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेविऊद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत तेवढे ते खेळले. त्यात रोहितने दोन अर्धशतके झळकावली, तर कोहलीची कामगिरी चांगली झाली नाही.
19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लंडविऊद्धची एकदिवसीय मालिका ही भारतासाठी एकमेव संधी आहे. टी-20 मधून आधीच निवृत्त झालेल्या वरील दोन दिग्गजांसाठी आठ संघांची ही स्पर्धा आव्हान देणारी ठरू शकते. तथापि, केवळ त्यांचा फॉर्म हा संघासाठी एकमेव चिंतेचा विषय नाही. यष्टिरक्षकाने फलंदाजीस येण्याचे स्थान हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. के. एल. राहुल आणि रिषभ पंत यांच्यापैकी कोणाला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात स्थान मिळावे हा गहन प्रश्न झाला आहे. कर्णधार रोहित आणि उपकर्णधार शुभमन गिल हे सलामीची येण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोहली, श्रेयस लायर आणि हार्दिक पंड्या यांचा क्रमांक लागून यष्टिरक्षक-फलंदाज पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.

2023 च्या विश्वचषकात पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षण करणाऱ्या राहुलने उत्तम कामगिरी केली होती व 452 धावा केल्या होत्या. परंतु मधल्या षटकांमध्ये त्याचे ‘स्ट्राइक रोटेशन’ हा अजूनही चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, डावखुरा पंत टॉप ऑर्डरमध्ये विविधता आणतो. याव्यतिरिक्त सहज आक्रमणाची क्षमता त्याचे पारडे जड करते. भारतीय थिंक टँक दोघांनाही संघात ठेवू शकतो, परंतु तशा परिस्थितीत अय्यरला बसवावे लागेल.
या मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्या तयारीचीही चाचणी होईल. या दोघांनाही दुखापतींना सामोरे जावे लागलेले आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ते भारताच्या यशाची गुऊकिल्ली ठरू शकतात. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह या मालिकेसाठी उपलब्ध राहणार नाही हे स्पष्ट होते. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समावेशाच्या दृष्टीने आपला दावा मजबूत केलेला फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्तीला या मालिकेतून पदार्पण करण्याची संधी मिळण्याची आपेक्षा आहे.
संघ व्यवस्थापनाचीही फिरकी टाकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची निवड करताना कसोटी लागेल. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर एकही एकदिवसीय सामना न खेळलेला रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे सर्व जण या स्थानासाठीच्या शर्यतीत आहेत.
दीड वर्षानंतर रुटचा सहभाग
दुसरीकडे, इंग्लंडने सामन्याच्या पूर्वसंध्येला त्यांच्या संघाची घोषणा केली आहे आणि ज्यो रूट 2023 च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय संघात परतला आहे. हा 34 वर्षीय अनुभवी खेळाडू पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. यजमानांप्रमाणेच इंग्लंड देखील त्यांच्यासमोरील अडचणी या मालिकेतून दूर करण्याचा मजबूत प्रयत्न करेल. परंतु हे काम सोपे नाही, कारण त्यांनी ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजविऊद्धच्या सलग दोन एकदिवसीय मालिका गमावलेल्या आहेत.
भविष्याबद्दल बोलण्यास रोहितचा नकार

भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या भविष्याबद्दलच्या अटकळी फेटाळून लावल्या. तो म्हणाला की, इंग्लंडविऊद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांवर आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर लक्ष केंद्रीत झालेले असताना त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलणे अप्रासंगिक होईल. तीन एकदिवसीय सामने आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी असताना मी माझ्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणे किती प्रासंगिक ठरेल ? माझ्या भविष्याबद्दलची वृत्ते झळकणे अनेक वर्षांपासून चालू आहे आणि मी त्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी येथे आलेलो नाही, असे रोहितने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्यासाठी इंग्लंडविऊद्धचे तीन सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. माझे लक्ष त्यांच्यावर आहे आणि त्यानंतर काय होते ते मी पाहेन, असे भारतीय कर्णधार पुढे म्हणाला.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस लियर, के. एल. राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वऊण चक्रवर्ती.
इंग्लंड : बेन डकेट, फिल सॉल्ट, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार) लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशिद आणि साकिब मेहमूद.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.,
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, डिस्ने हॉटस्टार.