जो छेडतो, त्याला भारत सोडत नाही!
पहलगाम हल्ल्याप्रकरणी योगींचा पाकिस्तानला इशारा
वृत्तसंस्था/ .लखीमपूर खीरी
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खीरी येथे शनिवारी शारदा नदीवरील विकासकामांची पाहणी केली. यानंतर उपस्थित समुदायाला संबोधित करताना योगींनी आम्हाला जो छेडणार, त्याला आम्ही सोडणार नाही असे पहलगाम हल्ल्यासंबंधी म्हटले आहे. जो भारताला छेडतो, त्याला भारत सोडत नाही. शत्रूला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजाविले जाईल असे उद्गार योगींनी काढले आहेत.
देशाच्या विविध राज्यांमधून काश्मीरमध्ये गेलेल्या लोकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आम्ही संवेदना व्यक्त करतो. दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले आहे. सभ्य समाजात दहशतवादाला कुठलेच स्थान नाही. अराजकतेला कुठलेच स्थान असू शकत नाही. भारत सरकारची सुरक्षा, सेवा ही विकासावर आधारि आहे. गरिबांच्या कल्याणावर आधारित आहे. परंतु कुणी या सुरक्षेला धक्का पोहोचविण्याचे दुस्साहस करेल, तर त्याला शून्य सहिष्णूतेच्या धोरणासोबत प्रत्युत्तर देण्यास भारत तयार असल्याचे योगींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील हा नवा भारत कुणाला त्रास देत नाही, परंतु जर कुणी छेड काढली तर त्याला सोडत देखील नाही. आज याच शून्य सहिष्णूतेच्या धोरणाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात आम्ही उत्तरप्रदेशला माफिया आणि अराजकतेपासून मुक्त केले आहे. विकासाला प्राथमिकता देत उत्तरप्रदेशला अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात आघाडीवर आणल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.