भारताने नाकारले मालदीवसंबंधीचे वृत्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांना पदच्युत करण्यासाठी मालदीवच्या अधिकाऱ्यांनी भारताकडे 60 लाख डॉलर्सचे आर्थिक साहाय्य मागितले होते, असे अमेरिकेच्या काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त धादांत खोटे आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील काही घटक सातत्याने आणि हेतुपुरस्सर भारताविरोधात अपप्रचार करीत असतात. हे वृत्त याच अपप्रचाराचा भाग आहे, असे भारताच्या विदेश व्यवहार विभागाने शुक्रवारी प्रतिपादन केले आहे.
हे वृत्त वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. ते एका लेखाच्या स्वरुपात होते. हा लेख मालदीवच्या संदर्भात होता. तथापि, त्यात भारताला गोवण्यात आले होते. अशाच प्रकारचा आणखी एक लेख याच वृत्तपत्रात पाकिस्तानसंदर्भात प्रसिद्ध झाला होता. पाकिस्तानानील अनेक दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या म्होरक्यांचा गेल्या दोन वर्षांमध्ये गूढ मृत्यू झाला आहे. त्यासंबंधातही या वृत्तपत्रातील लेखात भारताकडे बोट दाखविण्यात आले होते. मात्र, अशा प्रकारच्या लेखांमध्ये कोणतेही तथ्य नसून तो काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी चालविलेल्या भारतविरोधी अभियानाचा भाग असल्याचा पलटवार भारताने केला आहे.
आरोप काय होता...
मालदीवच्या काही अधिकाऱ्यांनी मुईझ्झू यांना पदच्युत करण्याचा कट रचला होता. मुईझ्झू यांना पदच्युत करायचे असेल तर, त्यांच्या पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींना लाच द्यावी लागेल. त्यासाठी भारताने 60 लाख डॉलर्स द्यावेत, अशी मागणी भारताकडे करण्यात आली होती, असे या लेखाचे म्हणणे आहे. या कटात भारताच्या रॉ या संस्थेचा एक अधिकारीही समाविष्ट होता असेही लेखकाचे प्रतिपादन आहे. मात्र, भारताने ही रक्कम दिली की नाही, यासंबंधी लेखात स्पष्टता नाही. यावरुनच हा लेख भारताविरोधात अपप्रचार करण्यासाठीच प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. अन्य लेख पाकिस्तानसंबंधी आहे. त्या लेखात पाकिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवाद्यांच्या गूढ मृत्यूंसंबंधी आशय आहे. पाकिस्तानातील या घटनांचा भारताशी काहीही संबंध नसून हा पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचाच परिणाम आहे. ज्यांनी आपल्या घरात साप पाळले आहेत, ते त्यांनाच चावल्यावाचून राहणार नाहीत, अशी खोचक टिप्पणीही भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्त्याने केली आहे.