न्यूझीलंडला नमवून भारत उपांत्य फेरीत
सामनावीर स्मृती मानधना, प्रतीका रावल यांची दमदार शतकांसह द्विशतकी भागिदारी, न्यूझीलंड 53 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/मुंबई
सामनावीर व उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांच्या वैयक्तिक शतकांसह नोंदविलेल्या द्विशतकीय भागिदारीच्या जोरावर यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. गुरूवारी येथे झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा डकवर्थ-लेविस पद्धतीनुसार 53 धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी न्यूझीलंडला विजयासाठी 44 षटकात 325 धावांचे उद्दिष्ट दिले होते. पण न्यूझीलंडने 44 षटकात 8 बाद 271 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच समाप्त झाले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. डी.वाय.पाटील स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असल्याने त्याचा पुरेपूर लाभ स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी उठविला. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 33.2 षटकात 212 धावांची द्विशतकी भागिदारी केली. न्यूझीलंडने ही जोडी फोडण्यासाठी 7 गोलंदाजांचा वापर केला. पण त्यांना लवकर यश मिळू शकले नाही. वनडे क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी अनेक नवे विक्रम नोंदविले आहेत.
मानधनाचे विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी सर्वाधिक शतकांचा विक्रम केलेली ऑस्ट्रेलियाची फलंदाज मेग लेनिंगच्या विक्रमाशी स्मृती मानधनाने बरोबरी केली आहे. तसेच एका वर्षाच्या क्रिकेट हंगामात सर्वाधिक शतके नोंदविण्याचा विक्रम करणारी द.आफ्रिकेची तझमीन ब्रिट्सची स्मृतीने बरोबरी केली आहे. मानधनाने हे दोन्ही विक्रम या सामन्यात नोंदविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता ऑस्ट्रेलियाची लेनिंग आणि स्मृती मानधना यांनी प्रत्येकी समान 17 शतके नेंदविली आहेत. मानधनाने वनडे क्रिकेटमध्ये 14 शतके, कसोटीत 2 शतके आणि टी-20 प्रकारात 1 शतक नोंदविले आहे. लेनिंगने वनडेमध्ये 15 तर टी-20 मध्ये 2 शतके झळकविली आहेत. डावखुरी मानधना सध्या सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणारी फलंदाज असून तिने 6 डावांत 55.16 धावांच्या सरासरीने 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा 331 धावा जमविल्या आहेत. मानधनाने द. आफ्रिकेच्या ब्रिट्स हिच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. वर्षभराच्या क्रिकेट हंगामात ब्रिट्सने 5 शतके तसेच मानधनानेही 5 शतके नोंदविली आहेत. मानधनाने 2024 साली चार शतके झळकविली होती.
महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके नोंदविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची लेनिंग 15 शतकांसह पहिल्या, मानधना 14 शतकांसह दुसऱ्या, न्यूझीलंडची बेट्स 13 शतकांसह तिसऱ्या, इंग्लंडच्या बिमॉन्ट आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी अनुक्रमे 12, 10 शतके नोंदवित चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. मानधनाने वर्षभराच्या क्रिकेट हंगामात सर्वाधिक षटकार नोंदविण्याचा विक्रम केला आहे. 2025 मध्ये मानधनाने 29 षटकार वनडे क्रिकेटमध्ये नोंदविले आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन सामन्यात अर्धशतके नोंदविणारी मानधना ही भारताची दुसरी फलंदाज आहे. कर्णधार हरमनप्रित कौरने 2017 साली असा विक्रम केला होता. मानधना आणि प्रतीका रावल या भारतीय जोडीने आता महिला क्रिकेटच्या इलाईट यादीत प्रवेश केला असून त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क आणि लिसा नाईटली यांच्या वर्षभरातील क्रिकेट हंगामात सर्वाधिक शतकी भागिदारी करणाऱ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या दोन्ही जोड्यांनी आतापर्यंत पाच शतकी भागिदाऱ्या केल्या आहेत. रावल आणि मानधना यांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्याही गड्यासाठी नोंदविलेली ही सर्वोंच्च भागिदारी आहे.
भारत 49 षटकात 3 बाद 340 ( प्रतिका रावल 122, स्मृती मानधना 109, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद 76, हरमनप्रित कौर 10, रिचा घोष नाबाद 4, अवांतर 19, अॅमेलिया केर व बेट्स प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड : (44 षटकात विजयासाठी 325 धावांचे उद्दिष्ट), न्यूझीलंड 44 षटकात 8 बाद 271 (हॅलिडे 81, इसाबेला गेझ नाबाद 65, अॅमेलिया केर 45, प्लिमेर 30, ग्रीन 18, जेस केर 18, डिव्हाईन 6, अवांतर 6, रेणूका सिंग, क्रांती गौड प्रत्येकी 2 बळी, स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा, प्रतीका रावल प्रत्येकी 1 बळी).