चीनकडून भारत पराभूत
वृत्तसंस्था / बर्लिन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यात चीनने भारताचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या पराभवामुळे सदर स्पर्धेच्या गुणतक्त्यात सलीमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ 15 सामन्यांतून 10 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.
शनिवारच्या सामन्यात चौथ्या मिनिटाला भारतीय संघाला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताला त्याचा लाभ घेता आला नाही. 21 व्या मिनिटाला चेन यांगने चीनचे खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडले. 25 व्या मिनिटाला चीनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि झेंग यांगने चीनचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत चीनने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्यातील तिसऱ्या सत्रामध्ये चीनचा तिसरा आणि शेवटचा मैदानी गोल यु अनहुईने केला. शेवटच्या पाच मिनिटांच्या कालावधीत चीनला 10 खेळाडुंशी खेळावे लागले. कारण चीन संघातील चेनला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले होते. आता या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा शेवटचा सामना चीनबरोबर रविवारी होत आहे.