बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताने जिंकली मालिका
दुसऱ्या टी 20 सामन्यात 86 धावांनी विजय : सामनावीर नितीश कुमार रे•ाr-रिंकू सिंगची तुफानी फटकेबाजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत दुसरा टी 20 सामनाही जिंकला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 86 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, नितीश कुमार रेड्डी व रिंकू सिंगच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 221 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 9 बाद 135 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह भारतीय संघाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 12 रोजी हैदराबाद येथे होईल.
प्रारंभी, बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन (10), अभिषेक शर्मा (15) व कर्णधार सूर्यकुमार यादव (8) स्वस्तात बाद झाले. यामुळे भारताची 3 बाद 41 अशी स्थिती झाली होती. पण, नितीश कुमार रेड्डी व रिंकू सिंग यांनी तुफानी फटकेबाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 48 चेंडूत 108 धावा करत भारताला सामन्यात परत आणले. नितीशने 34 चेंडूत 74 धावा केल्या, ज्यात त्याने 4 चौकार आणि 7 षटकार मारले. दुसरीकडे रिंकूने 29 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 53 धावा केल्या.
हे दोघे बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने पुन्हा एकदा आक्रमक खेळताना 19 चेंडूत 32 तर रियान परागने 6 चेंडूत 15 धावा फटकावल्या. 19 व्या षटकापर्यंत टीम इंडियाने 213 धावा केल्या होत्या आणि भारतीय संघ 230 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात एकूण 3 विकेट पडल्या, त्यामुळे टीम इंडियाला स्कोअरबोर्डवर 221 धावा करता आल्या. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
बांगलादेशचे सपशेल लोटांगण
बांगलादेश भारताच्या 222 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली खरी, पण त्यांना या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. अर्शदीप सिंगने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने इमनला बोल्ड केले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरनेही कर्णधार नजमूल शांतोला (11) धावांवर बाद केले. यानंतर इतर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या, तो 39 चेंडूंत तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला. इतर फलंदाजांनीही निराशा केल्यामुळे बांगलादेशला 20 षटकांत 9 बाद 135 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून नितीश कुमार रेड्डी व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तसेच अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.