महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजय‘दशमी’सह भारत जेतेपदासमीप

06:58 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताची न्यूझीलंडवर 70 धावांनी मात, कोहली-अय्यरची शतके, सामनावीर शमीचे 7 बळी, गिलचे नाबाद अर्धशतक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

विराट कोहलीने नोंदवलेले वनडेमधील विश्वविक्रमी 50 वे शतक, श्रेयस अय्यरचे सलग दुसरे शतक, शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक, कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल यांनी केलेली आक्रमक फटकेबाजी आणि मोहम्मद शमीची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी अशा सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. 57 धावांत 7 बळी टिपणारा शमी सामनावीराचा मानकरी ठरला.

भारताने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 397 धावांचा डोंगर रचत किवीजसमोर कठीण आव्हान ठेवले. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कोणत्याही संघाने नोंदवलेली ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानंतर न्यूझीलंडला 48.5 षटकांत 327 धावांत गुंडाळत विजय साकार केला आणि मागील वर्ल्ड कप उपांत्य फेरीतील पराभवाची परतफेडही केली. कर्णधार केन विल्यम्सन (73 चेंडूत 69), डॅरील मिचेल (119 चेंडूत 134), फिलिप्स (33 चेंडूत 41) यांचा प्रतिकार मात्र अपुरा पडला. विल्यम्सन-मिचेल यांनी 181 धावांची भागीदारी करीत भारतावर दडपण आणले होते. पण ही जोडी शमीने फोडल्यानंतर भारताचा विजय सोपा झाला. भारताचे काही वेळा गचाळ क्षेत्ररक्षण झाले. पण यष्टिरक्षक राहुल व जडेजा यांनी प्रत्येकी 3 झेल टिपत गोलंदाजांना पूरक साथ दिली.

शमीने वर्ल्ड कपमध्ये केवळ 17 डावांत 50 बळींचा टप्पा गाठला. या विश्वचषक स्पर्धेत शमीने चौथ्यांदा 5 बळी मिळवित असा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज होण्याचा मानही मिळविला.

कोहली-अय्यरची शतके

कोहली व रोहित या दोन सुपरस्टार्सनी न्यूझीलंडच्या माऱ्याची धुलाई केल्यानंतर श्रेयस अय्यरनेही धडाकेबाज शतक नोंदवले. त्यांच्या हल्ल्यामुळे न्यूझीलंडचे गोलंदाज सुमार दर्जाचे वाटत होते आणि यजमान संघाचे फलंदाज अगदी सहजतेने चौकार, षटकार मारत होते. वनडे फलंदाजीत कोहलीने अत्युच्च शिखर गाठत स्पर्धेतील तिसरे शतक नोंदवले. त्याने 113 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 117 धावा फटकावल्या. या ओघात त्याने एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (673 धावा, 2003) विक्रमही मागे टाकला. ‘या महान खेळाडूने माझे अभिनंदन केले, हे मला स्वप्नवत वाटते. आमच्यासाठी हा मोठा आणि महत्त्वाचा सामना होता. मी माझी भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे माझ्यासोबत असणारे सहकारी मोकळेपणाने खेळू शकतील,’ असे कोहली म्हणाला.

सचिनसह मान्यवरांची उपस्थिती

त्याचा हा पराक्रम पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरसह महान फलंदाज सुनील गावसकर, विंडीजचे महान खेळाडू व्हिवियन रिचर्ड्स आणि इंग्लंडचे महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमही उपस्थित होते. कोहलीला पूरक ठरणारी खेळी अय्यरने केली. त्याने केवळ 70 चेंडूत 105 धावा झोडपल्या. त्यात 8 षटकार व 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्या फटपेबाजीमुळे न्यूझीलंड संघ हताश झाल्याचे दिसून आले. कोहली व गिल यांना मोकळेपणाने खेळता आले ते सुरुवातीला फियरलेस रोहितने केलेल्या आक्रमक फटकेबाजीमुळे. रोहितने केवळ 29 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 47 धावा तडकावल्या. विल्यम्सनने त्याचा अप्रतिम झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याच्या हल्ल्यामुळे किवी गोलंदाजीतील हवाच निघून गेली आणि त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. रोहित-गिल यांनी 8.2 षटकांतच 71 धावांची भागीदारी केली. गिलने नंतर कोहलीसमवेत 14.2 षटकांत 93 धावांची भागीदारी केली.

अर्धशतक नोंदवणाऱ्या गिलला क्रँपचा त्रास होऊ लागल्याने तो 79 धावांवर निवृत्त झाला आणि सूर्यकुमार चौथ्या गड्याच्या रूपात बाद झाल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीस आला. एका धावेची भर घालत 80 धावांवर तो नाबाद राहिला. 66 चेंडूंच्या खेळीत त्याने 8 चौकार, 3 षटकार मारले. केएल राहुलनेही जोरदार फटकेबाजी करीत केवळ 20 चेंडूत नाबाद 39 धावा झोडपल्या. त्यात 5 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडच्या टिम साऊदीने 100 धावा देत 3 बळी मिळविले तर बोल्टने 86 धावांत 1 बळी टिपला.

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 4 बाद 397 : रोहित शर्मा 47 (29 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), गिल नाबाद 80 (66 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार), विराट कोहली 117 (113 चेंडूत 9 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर 105 (70 चेंडूत 4 चौकार, 8 षटकार), केएल राहुल नाबाद 39 (20 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), सूर्यकुमार 1, अवांतर 8. गोलंदाजी : साऊदी 3-100, बोल्ट 1-86.

न्यूझीलंड : 48.5 षटकांत सर्व बाद 327 : कॉनवे 15 चेंडूत 13, रचिन रवींद्र 22 चेंडूत 13, विल्यम्सन 73 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 69, मिचेल 119 चेंडूत 9 चौकार, 7 षटकारांसह 134, फिलिप्स 33 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 41, सँटनर, साऊदी प्रत्येकी 9, अवांतर 29. गोलंदाजी : शमी 7-57, बुमराह 1-64, सिराज 1-78, कुलदीप 1-56.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#social media#SportNews
Next Article