भारत-चीन करार हे सकारात्मक पाऊल
रशियन राजदूताची टिप्पणी : ब्रिक्स समावेशक व्यासपीठ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-चीनदरम्यान सीमा मुद्द्यावर झालेला करार हा द्विपक्षीय संबंधांच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे वक्तव्य भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी सोमवारी केले आहे. अलिकडेच रशियाच्या कजानमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेच्या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीचेही त्यांनी स्वागत केले. ब्रिक्स शिखर परिषद हे एक समावेशक व्यासपीठ असल्याचा दावा अलीपोव्ह यांनी केला.
ब्रिक्स पाश्चिमात्यविरोधी नाही. तर बिगरपाश्चिमात्य देशांचा समूह आहे. 35 देशांच्या प्रतिनिधींसोबत विस्तारित प्रारुपात पार पडलेली ही पहिलीच ब्रिक्स शिखर परिषद होती. ग्लोबल साउथसाठी हे एक समर्पित व्यासपीठ राहिले आहे. वर्तमान वास्तविकतांचे प्रतिबिंब ब्रिक्समध्ये दिसून येते. 40 हून अधिक देशांनी या समूहात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे रशियाच्या राजदूतांनी सांगितले आहे.
सीमा मुद्द्यावर झालेला करार हा भारत-चीन द्विपक्षीय संबंधांच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त आणि सैनिकांच्या माघारीवरून करार झाला होता.