अमेरिकेत ‘वाहन’ हल्ल्यात 12 ठार
चालकाकडून जमावाच्या दिशेने गोळीबार : 30 जखमी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्समध्ये भरधाव वाहनाने अनेक जणांना जाणूनबुजून चिरडत मोठी जीवितहानी घडविण्यात आली आहे. नववर्षानिमित्त जल्लोष करणाऱ्या लोकांवरच चालकाने वाहन चढविले असून या घटनेत कमीतकमी 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे 3.15 वाजता बोरबन स्ट्रीट आणि इबर्विलेच्या चौकात घडली असून हा भाग स्वत:चे नाइटलाइफ आणि वायब्रेंट कल्चरसाठी प्रसिद्ध आहे. एफबीआयने या वाहन हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरु केली असून स्थानिक पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याची टिप्पणी केली आहे.
वाहनाने अनेक लोकांना चिरडल्यावर चालकाने जमावाच्या दिशेने गोळीबार देखील केला आहे. घटनास्थळावरून प्राप्त व्हिडिओत रस्त्यावर लोक कोसळलेल्या स्थितीत दिसून येतात. तसेच गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. या घटनेत अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. तर न्यू ऑर्लियन्स पोलिसांनी संशयितांवर केलेल्या गोळीबारात तो मारला गेल्याचे समजते. तर घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाहन हल्ला तसेच गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये पोलिसांची वाहने, रुग्ण्वाहिका दिसून येत आहेत. तर स्थानिक अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरू करत या हल्ल्यात आणखी कुणाचा हात होता का हे पडताळून पाहत आहेत.
प्रारंभिक अहवालांनुसार एका वाहनाने लोकांना जाणूनबुजून चिरडले आहे. परंतु यात नेमकी किती जीवितहानी झाली हे आताच सांगणे अवघड आहे असे न्यू ऑर्लियन्स पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. हजारो लोक नववर्ष साजरे करण्यासाठी बोरबन स्ट्रीट भागात जमले होते. तर वाहन हल्ल्यानंतर सध्या या क्षेत्रात प्रवास करणे टाळण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले आहे.