पावसाचा व्यत्यय, तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द भारत
बांगलादेश दुसरी कसोटी तिसरा दिवस, ओलसर मैदानामुळे पंचांनी घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ कानपूर
भारत व बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या व शेवटच्या कसोटीच्या सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या अडथळ्यामुळे खेळ होऊ शकला नाही. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवर पाणी साचले होते. त्यामुळे उशिरा खेळ सुरू केला जाणार होता. दुपारी 2 च्या सुमारास स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता आणि पाण्याचे पॅचेसही नव्हते. तरीही पंच व सामनाधिकाऱ्यांनी दिवसाचा खेळ रद्द केल्याची घोषणा केली.
सतत पडणाऱ्या पावसामुळे सुमारे आठ सत्रांचा खेळ वाया गेला असून सामन्याचा रविवारी तिसरा दिवस होता. मैदानावरील ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित काम करीत नसल्याने त्याबद्दल प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 बाद 107 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारपर्यंत खेळ होऊ शकलेला नाही. दुसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही तर तिसऱ्या दिवशीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा खेळ झाला होता. भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप व फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांनी बांगलादेशचे तीन बळी मिळविले आहेत. भारताने या मालिकेतील पहिली कसोटी 280 धावांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली असून हा सामना अनिर्णीत राहिल्यास मालिकेत भारत विजयी ठरणार आहे.