For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-कॅनडा संबंध नागमोडी वळणावर

04:22 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत कॅनडा संबंध नागमोडी वळणावर
Advertisement

कॅनडामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांनी समंजस भूमिका घ्यावी. पक्षीय राजकारणासाठी भारत विरोधी पवित्रा घेणे म्हणजे दीर्घकालीनदृष्टीने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे. पुढील वर्षाच्या निवडणुकीत जनतेने ट्रुडो यांना इंगा दाखविला म्हणजे ते आपोआप जमिनीवर येतील आणि भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होतील.

Advertisement

भारत-कॅनडा संबंध सध्या एका नव्या नागमोडी वळणावर पोहोचले आहेत. 1974 पासून 2024 पर्यंतच्या संबंधांचा आढावा घेतला असता असे दिसते, की हे संबंध सध्या कॅनडाच्या चुकांमुळे आलेखाच्या खालच्या बिंदूवर आहेत. खरेतर, कॅनडाने प्रथमत: फुटीरतावादी अतिरेक्यांना पाठीशी घालणे बंद केले पाहिजे. त्यांना आवरण्याऐवजी ते भारताकडे बोट दाखवून भारतीय अधिकाऱ्यांना परत पाठविण्याच्या चुकीच्या पावित्र्यात आहेत. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा दुटप्पीपणा आणि आडमुठेपणा या प्रकरणात अधिक चिंता निर्माण करीत आहे. विशेषत: ते गेल्या दोन वर्षांपासून ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यांचे हे वर्तन कुठल्याही लोकशाही राष्ट्राच्या प्रमुखास शोभणारे नाही. विशेषत: भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची प्रतिमा लावून त्यांचा अपमान तेथील अल्पसंख्यांक अतिरेक्यांनी केला. त्याचप्रमाणे भारताच्या वाणिज्य दूतवासासमोर निदर्शने केली. या सर्व बाबींमध्ये ट्रुडो सरकारने त्यांना मोकळीक दिली आहे. त्यामुळे भारत विरोधी वातावरण तापविण्याचे राजकारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जस्टीन ट्रुडो करीत आहेत काय? असा प्रश्न बहुतेक निरीक्षकांचा आहे. कारण आता तेथील निवडणुका एक वर्षाच्या कालावधीत समीप येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारत-कॅनडा संबंधाचे विश्लेषण करताना अनेकविध पैलूंनी आकलन केले पाहिजे.

भूराजनैतिक महत्त्व?

Advertisement

पश्चिम गोलार्धात अमेरिकेच्या सीमेवर असलेल्या कॅनडाचे भूराजनैतिक महत्त्व आहे. त्यांचे अमेरिकेशी व सर्व लोकशाही राष्ट्रांशी स्नेहाचे संबंध आहेत. स्वातंत्र्यानंतर भारत, कॅनडा दोघांचीही व्यापार, उद्योग व शिक्षणात विकासात्मक भागीदारी आहे. कॅनडा हा अमेरिकेच्या शेजारी असलेला लोकशाही प्रधान देश आहे. विस्तीर्ण भूप्रदेश आणि विपुल नैसर्गिक साधनसामुग्रीमुळे तेथील विकासात भारतीयांनी मोठा वाटा उचलला आहे. अगदी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रकरणामध्ये तेथील भारतीयांनी भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूने लढ्यात उडी घेतली. आता स्वातंत्र्योत्तर काळात तेथील शीख डायस्फोरा 1975 पर्यंत भारताच्या विकासातील आपला वाटा यथार्थपणे उचलत होता. परंतु पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळात पृथकतावादी चळवळ पाकिस्तानने फूस लावल्यामुळे सुरू झाली आणि तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1984 साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई करावी लागली. त्यामुळे बिथरलेल्या अतिरेक्यांनी कितीतरी उलटसुलट प्रयत्न करून संबंध बिघडविण्याचा प्रयत्न केला. परंतु खुद्द स्वदेशातील ही चळवळ केव्हाच संपली आहे. आता ती केवळ विदेशातील पाठिंब्यामुळे कशीबशी तग धरून आहे.

कॅनडामध्ये 7,71,790 एवढा शीख समुदाय आहे. तसेच एकूण भारतीय समुदायाचा विचार करता, ही संख्या 18,60,000 एवढी आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांमध्ये दक्षिण भारतीय समुदाय आहेत. तसेच गुजरातातून व्यापार उदीम करण्यासाठी गेलेल्या लोकांचाही सहभाग आहे. बहुसंख्यांना भारताच्या प्रगतीचा व वाढत्या वैभवाचा अभिमान वाटतो आणि आपण भारतामध्ये राहणे हे अधिक श्रेयस्कर व हितावह आहे याची त्यांना खात्री पटली आहे. परंतु मूठभर नेत्यांच्या उपद्व्यापामुळे तेथील समुदाय अस्वस्थ आहे.

सकारात्मक भूमिकेची गरज?

खरेतर, भारत-कॅनडा संबंधात सकारात्मक भूमिका घेऊन काम करण्याची गरज आहे. असे करताना दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे. तसेच प्रगत विज्ञान तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी संशोधन या क्षेत्रातही देवाण घेवाण चांगली होऊ शकते. उभय देशांमध्ये शिक्षणाच्या आदानप्रदानाची मोठी संधी आहे. सुमारे 6 लाख भारतीय विद्यार्थी कॅनडातील विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. संबंध बिघडले तर त्याचा मोठा फटका कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. संबंध ताणल्यामुळे विद्यार्थ्यांचे हे प्रमाण कमी होईल आणि उभय देशातील सांस्कृतिक व शैक्षणिक आदानप्रदानाला मोठे ग्रहण लागेल. परंतु पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा आडमुठेपणा आणि तेथील सत्ताधारी व विरोधी पक्षातील संघर्ष यामुळे ट्रुडो भारत विरोधी पावित्रे घेत आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या या पापांचे प्रायश्चित्त त्यांना तेथील लोक नक्की देतील आणि ट्रुडो हे सत्तेवरून दूर झाले की कॅनडामधील वातावरण हळूहळू शांत होऊ लागेल. एका सर्वेक्षणानुसार, ट्रुडो यांची लोकप्रियता अशा प्रकारामुळे 28 टक्क्यांनी कमी झाली आहे व त्यांची लोकप्रियता घसरत आहे. तसेच इप्सो पाहणीनुसार, फक्त 26 टक्के कॅनेडियन लोक ट्रुडो यांना भावी काळात पंतप्रधानपदाचे समर्थ उमेदवार मानतात. तसेच पुराणमतवादी (कन्झर्व्हेटिव्ह) नेत्यापेक्षा 19 टक्क्यांनी ते मागे पडले आहेत. अलीकडच्या काळात ट्रुडो यांचे स्थान लोकप्रियतेच्यादृष्टीने खालच्या पातळीवर आहे. सर्व प्रश्नांवर काळ हा उपाय असतो असे म्हणतात. तसेच भारत-कॅनडा संबंधांच्या बाबतीतसुद्धा आहे. ट्रुडो हे सत्तेवरून पायउतार झाले म्हणजे उभय देशांतील आर्थिक, व्यापारी, शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध सुधारण्यास मदत होईल असे वाटते. कारण ट्रुडो यांच्या पूर्वी सत्तेत असलेले पुराणमतवादी (कन्झर्व्हेटिव्ह) या पक्षाचे कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या काळात भारत-कॅनडा संबंध निरोगी होते, व्यापारही तेजीत होता, शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा ओघही कॅनडाकडे वाढत होता. पण ट्रुडो यांच्या तिरक्या चालीमुळे संबंधांचे गणित बिघडले आहे.

उफराटे प्रचार तंत्र?

पृथकतावादी कार्यकर्ता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येबाबत आमच्याकडे सबळ पुरावे नाहीत. पण गुप्तचर यंत्रणेच्या अहवालावरून आम्हाला असे वाटते, की त्यात नवी दिल्लीचा हात आहे अशा प्रकारचा युक्तिवाद ट्रुडो करीत आहेत. अर्थातच, हा युक्तिवाद आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे या प्रकरणात भारताची भूमिका अधिक उजवी आहे. जे काही झाले त्याचे खापर भारतावर फोडून आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत आपली डाळ शिजविण्याचा ट्रुडो यांचा प्रयत्न आहे. परंतु जगातील विश्लेषक आणि बहुसंख्य प्रतिष्ठित माध्यमे ही ट्रुडो यांच्या विरोधात आहेत. ट्रुडो यांनी भारतीय प्रसार माध्यमांवरही आगपाखड केली आहे आणि भारतातील प्रसार माध्यमे कॅनडाविरोधी प्रचार करीत आहेत असा शोधही लावला आहे. या बाबतीत फर्स्ट पोस्ट वाहिनीचा अहवाल डोळ्यात अंजन घालणारा आहे. खरेतर, मुक्त लोकशाही देशात प्रसार माध्यमे ही निर्भयपणे काम करतात आणि ती न्यायाने खरे खोटे यातील फरक करीत असतात, हे ट्रुडो यांच्या कसे लक्षात येत नाही? भविष्यकाळाचा विचार करता, दोन्ही देशांतील समंजस, बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी नेत्यांनी उभय देशातील संबंध सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही देशांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल असे वाटते. कुठलेही आरोप जेव्हा राजकीयदृष्टीने प्रेरीत असतात तेव्हा त्यात सत्याचा आधार दाखविण्याऐवजी केवळ आरोप करीत राहणे असाच प्रयत्न असतो. त्यामागे तर्क किंवा सबळ पुरावा याची शहानिशा न करता आरोप करीत राहणे हे तंत्रविवेकी वाटत नाही. अनेकवेळा रेटून खोटे बोलले म्हणजे ते खरे आहे असा भास होतो. असाच काहीसा प्रयत्न जस्टीन ट्रुडो करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नास जगातील प्रसार माध्यमांकडून व अन्य लोकशाही देशांकडून फारसे समर्थन मिळत नाही. त्यामुळे घरचे आणि दारचे दोन्हीही वासे फिरलेले असल्यामुळे ट्रुडो यांचे भवितव्य अंध:कारमय आहे असे वाटते.

मुत्सद्यांची हकालपट्टी प्रथम कॅनडाने सुरू केली. भारतालाही चोख प्रत्युत्तर द्यावे लागले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जैस्वाल यांच्या मते, कॅनडाने भारत आणि भारतीय मुत्सद्यांवर केलेल्या गंभीर आरोपांच्या समर्थनार्थ आम्हाला कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. केवळ गुप्तचर अहवालाच्याआधारे असे आरोप किती सत्य मानावयाचे, असा प्रश्न पडतो. भारत-कॅनडा संबंध कधी नव्हे ते आलेखाच्या खालच्या बिंदूवर आले आहेत. पण त्यासाठी भारत जबाबदार नसून कॅनडातील राजकारण जबाबदार आहे. मागील निवडणुकीत चीनचा ट्रुडो यांना गुप्त पाठिंबा होता असे म्हटले जाते. पुढील वर्षाच्या निवडणुकीत जनतेने ट्रुडो यांना इंगा दाखविला म्हणजे ते आपोआप जमिनीवर येतील आणि भारत-कॅनडा संबंध पुन्हा निवळतील आणि पूर्ववत होतील असे म्हणता येईल.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.