भारत बनला आयफोन निर्यातीत अव्वल, जगभरात डंका
दीड लाख कोटींच्या आयफोन्सची निर्यात :पीएलआयचा अॅपलला लाभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अॅपल या आयफोन निर्मात्या कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1 लाख 50 हजार कोटी रुपयांच्या मूल्याचे आयफोन्स निर्यात केले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत कंपनीने 76 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. पीएलआय योजनेचे सहकार्य घेत कंपनीने आपली कामगिरी अधिक उंचावली आहे. यायोगे अॅपलने भारतातून आयफोन्सची सर्वाधिक निर्यात करत जगातच डंका वाजवला आहे.
अमेरिकेने अलीकडेच भारतासह इतर देशांवर कर आकारणी केली असताना अॅपलने ही स्पृहणीय कामगिरी केलीय. या शुल्कामुळे भारतातून होणाऱ्या निर्यातीबाबत अनिश्चिततेचे ढग तयार झाले आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 85 हजार कोटी रुपयांच्या मूल्याच्या आयफोन्सची निर्यात करण्यात आली होती. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने पीएलआय योजनेंतर्गत 74,900 कोटी रुपयांच्या मूल्याच्या आयफोन्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. आयसीइएच्या नुसार भारतातून होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या एकंदर निर्यातीत अॅपलचा वाटा 75 टक्के इतका असणार आहे.
2 लाख कोटींचे स्मार्टफोन्स होणार निर्यात
भारतातून जवळपास 2 लाख कोटींच्या मूल्याचे स्मार्टफोन्स निर्यात होण्याचा अंदाज आयसीइएने व्यक्त केलाय. मागच्या आर्थिक वर्षात प्रत्येक महिन्याला सरासरी 12,500 कोटी रुपयांच्या मूल्याचे आयफोन्स निर्यात करण्यात आले होते. तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा आकडा 7083 कोटी रुपये इतका होता.
जानेवारीपासूनची निर्यात
कंपनीने आर्थिक वर्ष 2025 च्या शेवटच्या तिमाहीत नवा किर्तीमान रचला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत 55 हजार कोटी रुपयांच्या मूल्याच्या आयफोन्सची निर्यात करण्यात कंपनीने मोठे यश मिळवले आहे. जानेवारीत 18 हजार कोटी आणि फेब्रुवारीत 17,500 कोटी रुपयांच्या मूल्याच्या आयफोन्सची निर्यात केली होती. अमेरिकेतून करात वाढ केली जाण्याच्या शक्यतेनंतर अॅपलने निर्मितीत वाढ केली.
आयफोन्सचा वाटा अधिक
आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्मार्टफोन्सची एकंदर निर्यात आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेत (1 लाख 30 हजार कोटी) 53 टक्के अधिक दिसून आली आहे. भारतातून होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या निर्यातीत आयफोन्सचा वाटा अधिक राहिला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये आयफोन्सच्या निर्यातीत हिस्सेदारी 66 टक्के इतकी होती तर आर्थिक वर्ष 2025 मध्ये ही हिस्सेदारी 75 टक्यांवर पोहचेल असे म्हटले जात आहे.