ब्राझीलला नमवून भारत उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था / चेन्नई
येथे सुरू असलेल्या 2025 च्या विश्व चषक स्क्वॅश स्पर्धेत ब गटातील झालेल्या सामन्यात यजमान भारताने ब्राझीलचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताच्या वेलावन सेंथिलकुमारने ब्राझीलच्या मॉमेटोचा 7-5, 7-2, 7-2 अशा गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत सहभागी झालेली सर्वात तरुण महिला स्क्वॅशपटू 17 वर्षीय अनाहत सिंगने ब्राझीलच्या लॉरा सिल्व्हाचा 7-4, 7-0, 7-2 अशा 3-0 गेम्समध्ये पराभव करत भारताची आघाडी वाढविली. भारताचा टॉपसिडेड पुरूष स्क्वॅशपटू अभय सिंगने ब्राझीलच्या दियागो गोब्बीवर 7-3, 7-1, 7-1 असा फडशा पाडत भारताला 3-0 अशी बढत मिळवून दिली. शेवटच्या सामन्यात भारताच्या अनुभवी जोश्ना चिन्नापाला ब्राझीलच्या खेळाडूने पुढे चाल दिल्याने अंतिम गुण मिळाला. त्यामुळे भारताने ही लढत 4-0 अशी एकतर्फी जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत भारतीय स्क्वॅश संघाने आतापर्यंत एकही पराभव स्वीकारलेला नाही. सदर स्पर्धेतील पहिल्या लढतीत भारताने स्वीसचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला होता. सदर स्पर्धेमध्ये 16 संघांचा समावेश असून ते चार गटात विभागण्यात आले आहेत. आता भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना द. आफ्रिकेबरोबर होत आहे. 1996 साली विश्व चषक स्क्वॅश स्पर्धेला प्रारंभ झाला. ऑस्ट्रेलियाने मलेशियातील पहिली विश्वचषक स्क्वॅश स्पर्धा जिंकली. त्यानंतर 1999 साली इंग्लंडने, 2011 साली चेन्नईमधील तसेच 2023 साली झालेल्या स्पर्धांमध्ये इजिप्तने अजिंक्यपद मिळविले आहे.