For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा विंडीजवर 115 धावांनी विजय

06:32 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा विंडीजवर 115 धावांनी विजय
Advertisement

वृत्तसंस्था / बडोदा

Advertisement

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान भारतीय क्रिकेट संघाने विंडीजचा 115 धावांनी दणदणीत पराभव करुन विजयी आघाडी घेतली. भारताने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघडी मिळवली आहे. वनडेमध्ये पहिले शतक झळकाविणाऱ्या हर्लीन देओलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

भारताने विंडीजला निर्णायक विजयासाठी 359 धावांचे कठीण आव्हान दिले आहे. भारताने 50 षटकात 5 बाद 358 धावा जमविल्या. हर्लीन देओलने वनडे क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकविले. तर स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी अर्धशतके नोंदविली. विंडीजचा डाव 46.2 षटकात 243 धावांत आटोपला. कर्णधार हिली मॅथ्यूजचे शतक (106) वाया गेले.

Advertisement

या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून विंडीजवर यापूर्वीच आघाडी मिळविली आहे. मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघातील खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला. भारतीय संघाने वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदविण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विंडीजच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई झाली.

फलंदाजीच्या फॉर्म मिळालेल्या उपकर्णधार स्मृती मानधनाने प्रतिका रावल समवेत 16.3 षटकात सलामीच्या गड्यासाठी 110 धावांची शतकी भागिदारी केली. मानधनाने 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 53 धावा जमविल्या. एकेरी धाव घेण्याच्या नादात ती 17 व्या षटकात धावचीत झाली. मानधना आणि रावल यांची वनडे क्रिकेटमधील सलामीच्या गड्यासाठीची ही सलग दुसरी शतकी भागिदारी आहे. रावलने 58 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तिचे हे वनडेमधील पहिले अर्धशतक आहे. मानधना बाद झाल्यानंतर रावल आणि हर्लीन देओल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली. जेम्सच्या गोलंदाजीवर रावल जोसेफकरवी झेलबाद झाली. रावलने 86 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 76 धावा झळकविल्या.

कर्णधार हरमनप्रित कौरकडून अधिक धावा होवू शकल्या नाहीत. हर्लीन देओल आणि कौर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भर घातली. फ्लेचरच्या गोलंदाजीवर कौरचा त्रिफळा उडाला. तिने 18 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. हर्लीन देओलला रॉड्रिग्जकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 116 धावांची शतकी भागिदारी केल्याने भारताला 350 धावांचा टप्पा ओलांडता आला.  देवलने आपले अर्धशतक 62 चेंडूत 5 चौकारांचे मदतीने तर शतक 98 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने झळकविले. 48 व्या षटकात जोसेफने देवलला झेलबाद केले. तिने 103 चेंडूत 16 चौकारांसह 115 धावा झळकविल्या. रॉड्रिग्जने 36 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 52 धावांची खेळी केली. ती 49 व्या षटकात झेलबाद झाली. घोष 2 चौकारांसह 13 तर दिप्ती शर्मा 4 धावांवर नाबाद राहिल्या. भारताच्या डावामध्ये 4 षटकार आणि 45 चौकार नोंदविले गेले. भारताच्या डावात दोन शतकी भागिदाऱ्या नोंदविल्या गेल्या. भारताला 23 अवांतर धावा मिळाल्या. रॉड्रिग्जने कॉनेलच्या एका षटकात 4 चौकार झोडपले. भारताने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 66 धावा जमविल्या. विंडीजतर्फे डॉटीन, फ्लेचर, जेम्स आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीची जोसेफ दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर रावल करवी झेलबाद झाली. तिने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या क्रेफ्टॉन तितास साधूच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. साधूने हा झेल अप्रतिम टिपला. तिने 17 चेंडूत 3 चौकारांसह 13 धावा जमविल्या. प्रिया मिश्राने विलियमसला खाते उघडण्यापूर्वीच पायचित केल्याने विंडीजची स्थिती 10.4 षटकात 3 बाद 40 अशी केविलवाणी झाली होती. मात्र एका बाजुने कर्णधार मॅथ्युज चिवटपणे फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येत भर घालत होती. रेणूकासिंग ठाकुरने डॉटीनला त्रिफळाचित केली. डॉटीनने 21 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. 20 षटकाअखेर विंडीजने 4 बाद 99 धावा जमविल्या होत्या. कॅम्पबेल आणि मॅथ्यूज यांनी पाचव्या गड्यासाठी 112 धावांची शतकी भागिदारी केली. पण कॅम्पबेल बाद झाल्यानंतर विंडीजला भारताचे आव्हान पेलवले नाही. साधूने कॅम्पबेलला झेलबाद केले. तिने 48 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावा जमविल्या. दिप्ती शर्माने अॅलेनिला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. कर्णधार मॅथ्यूज रावलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. रॉड्रिग्जने तिचा अप्रतिम झेल टिपला. मॅथ्यूजने 109 चेंडूत 13 चौकारांसह 106 धावा झळकाविल्या. जेम्सने 3 चौकारांसह 25 तर फ्लेचरने 3 चौकारांसह 22 धावा केल्या. विंडीजचा डाव 46.2 षटकात 243 धावांवर आटोपल्याने भारताने हा सामना 115 धावांच्या फरकाने जिंकला. भारतातर्फे प्रिया मिश्राने 3 तर दिप्ती शर्मा, तितास साधू आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रेणुकासिंग ठाकुरने 1 बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक: भारत 50 षटकात 5 बाद 358 (हर्लीन देओल 115, स्मृती मानधना 53, प्रतिका रावल 76, हरमनप्रित कौर 22, रॉड्रिग्ज 52, घोष नाबाद 13, दिप्ती शर्मा नाबाद 4, अवांतर 23, डॉटीन, फ्लेचर, जेम्स, जोसेफ प्रत्येकी 1 बळी), विंडीज 46.2 षटकात सर्व बाद 243 (मॅथ्यूज 106, कॅम्पबेल 38, जेम्स 25, फ्लेचर 22, जोसेफ 15, क्राफ्टन 13, अवांतर 7, प्रिया मिश्रा 3-49, दिप्ती शर्मा 2-40, साधू 2-42, प्रतिका रावल 2-37, रेणुकासिंग ठाकुर 1-41).

Advertisement
Tags :

.