भारताची उरुग्वेवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,मलेशिया, चिली यांचेही विजय
वृत्तसंस्था/ सांतियागो, चिली
गोलरक्षक निधीने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणामुळे भारतीय महिला हॉकी संघाने उरुग्वेचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव करीत एफआयएच महिला कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत नवव्या स्थानाच्या आशा कायम ठेवल्या. अटीतटीने खेळला गेलेला हा सामना निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत राहिला होता.
नियमित वेळेत मनीषाने 19 व्या मिनिटाला भारताचा गोल नोंदवला तर 60 व्या मिनिटाला जस्टिना अॅरेगुइने गोल नोंदवत उरुग्वेला बरोबरी साधून दिली. 9 ते 12 व्या स्थानासाठी या लढती सुरू आहेत. पूर्वार्धातील पहिला सत्रावर भारताने वर्चस्व राखत अनेक संधी निर्माण केल्या होत्या. मात्र पाचव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला तो उरुग्वेने. पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. 18 व्या मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. यावेळी नेहमीच्या खेळत बदल करीत चेंडू साक्षी राणाकडे दिला. तिने गोलच्या दिशेने जोरदार फटका मारला होता. पण उरुग्वेच्या गोलरक्षकाने तो अचूक थोपवला. मात्र पुढच्याच मिनिटाला मनीषाने थोड्याशा दूरवरून गोलपोस्टचा अचूक वेध गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली.
शेवटच्या सत्रात उरुग्वेने जास्त आक्रमक खेळ केला आणि दोन मिनिटे शिल्लक असताना गोलरक्षकाला त्यांनी आऊटफील्ड खेळाडू म्हणून पुढे घेतले आणि याचा त्यांना फायदाही झाला. सामन्याचे दोन सेकंद बाकी असताना त्यांना पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर जस्टिनाने अचूक गोल नोंदवत बरोबरी साधली. पेनल्टी शूटआऊटमध्ये पूर्णिमा यादव, इशिका व कनिका सिवाच यांनी भारताचे गोल नोंदवल तर गोलरक्षक निधीने उरुग्वेचे तीन गोल थोपवत भारताला विजयी केले. 9 व 10 व्या स्थानासाठी भारताची पुढील लढत स्पेनविरुद्ध गुरुवारी होणार आहे.
अन्य सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा 2-0 असा पराभव करून नववे स्थान मिळविले तर माजी चॅम्पियन्स ऑस्टेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 4-2 अससा पराभव करून 11 वे स्थान घेतले. 13 व 14 व्या स्थानासाठी झालेल्या लढतीत मलेशियाने जपानवर 3-0 अशी पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली होती. यजमान चिलीने 15 वे स्थान मिळविताना स्वित्झर्लंडचा 2-1 अससा पराभव केला.