For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची कांगारूंवर 44 धावांनी मात

06:58 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारताची कांगारूंवर 44 धावांनी मात
Advertisement

सामनावीर यशस्वी जैस्वाल, इशान किशन, गायकवाड यांची चमकदार अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ थिरुवनंतपूरम

सामनावीर यशस्वी जैस्वालने आपल्या गुणवत्तेला न्याय देत तडकावलेले जलद अर्धशतक, ऋतुराज गायकवाड व इशान किशन यांनी चमकदार अर्धशतके नोंदवत त्याला दिलेली उत्तम साथ, कर्णधार सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांची फटकेबाजी आणि रवी बिश्नोई व प्रसिद्ध कृष्णा यांचा भेदक मारा यांच्या बळावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 4 बाद 235 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 9 बाद 191 धावांवर रोखत शानदार विजय साकार केला. ऑस्ट्रेलियाने जोरदार सुरुवात करीत 3 षटकात 35 धावा फटकावल्या होत्या. शॉर्ट बाद झाल्यानंतर त्यांच्या गळतीला सुरुवात झाली आणि आठव्या षटकांत त्यांची स्थिती 4 बाद 58 अशी झाली. टिम डेव्हिड व स्टोईनिस यांनी 81 धावांची भागीदारी करीत थोडाफार डाव सावरला होता. डेव्हिड 22 चेंडूत 37 धावा काढून बाद झाला तर स्टोईनिसने 25 चेंडूत 45 धावा फटकावल्या. कर्णधार मॅथ्यू वेडने तन्वीर सांघासमवेत शेवटच्या गड्यासाठी अभेद्य 36 धावांची भर घातल्याने ऑस्ट्रेलियाला दोनशेच्या जवळपास मजल मारता आली. वेडने 23 चेंडूत 1 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 42 धावा काढल्या. बिश्नोईने 32 धावांत 3, कृष्णाने 41 धावांन 3 बळी मिळविले. अर्शदीप, अक्षर पटेल, मुकेश कुमार यांनी एकेक बळी मिळविला.

Advertisement

जैस्वाल-गायकवाडची वेगवान सुरुवात

स्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी दिली. पण यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड यांनी प्रारंभापासूनच फटकेबाजी सुरू करीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढविला. विशेषत: जैस्वाल जास्त आक्रमक मूडमध्ये होता. 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये भारताने 77 धावा झोडपल्या. चेंडू बॅटवर सावकाश येत होता, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी स्वैर मारा केल्याने भारतीय फलंदाजांनी त्याला पुरेपूर लाभ घेतला. जैस्वालने सीन अॅबॉटवर जोरदार हल्ला चढविला. त्याने वेग कमी केला असला तरी लाईन व लेंग्थमध्ये तो अचूक नव्हता. चौथ्या षटकात जैस्वालने अॅबॉटला शिक्षा करताना 3 चौकार, 2 षटकारांसह एकूण 24 धावा झोडपल्या. त्याने दोन स्क्वेअरकट, एक लेटकट व दोन पुलचे फटके मारले. जैस्वाल व गायकवाड यांनी मॅक्सवेलच्या पहिल्या षटकात 13 धावा वसूल केल्या. जैस्वालने केवळ 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर तो जास्त वेळ टिकला नाही. नाथन एलिसच्या थोडासा वाईड ठरू शकणाऱ्या चेंडूवर त्याने स्लॅश केले. पण बॅकवर्ड स्क्वेअरलेगनजीक झॅम्पाने त्याचा झेल टिपला. त्याने 25 चेंडूत 53 धावा फटकावल्या.

इशानची टोलेबाजी

गायकवाडला नंतर इशान किशननेही चांगली साथ दिली. इशानने सलग दुसरे अर्धशतक नोंदवत दुसऱ्या गड्यासाठी 87 धावांची भागीदारी केली. जैस्वाल बाद झाल्यानंतर भारताची धावगती कमी होईल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियन्सनी केली होती. पण डाव्या-उजव्या जोडीने त्यांना स्थिरावण्याची संधीच दिली नाही. 10 षटकांतर भारताने 1 बाद 101 धावा जमविल्या होत्या. डावाच्या मधल्या षटकांत भारताने 11.5 धावांच्या गतीने धावा फटकावल्या. जलद गोलंदाजांच्या तुलनेत झॅम्पा व तन्वीर सांघा या स्पिनर्सनी बऱ्यापैकी मारा केला. गायकवाडनेही 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर इशान किशनने यासाठी केवळ 29 चेंडू घेतले. इशानही अर्धशतकानंतर जास्त वेळ टिकला नाही. स्टोईनिसच्या वाईडिश चेंडूवर षटकार मारताना त्याचा तोल गेला आणि डीपमध्ये सीमारेषेनजीक एलिसने त्याचा सोपा झेल टिपला. इशानने 32 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 52 धावा फटकावल्या.

कर्णधार सूर्यकुमार यादवही 10 चेंडूत 2 षटकारांसह 19 धावा काढून बाद झाला तर गायकवाड शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याआधी 19 व्या षटकात रिंकू सिंगने जबरदस्त टोलेबाजी करीत 25 धावा काढल्या. अॅबॉटने केवळ 3 षटकातच 56 धावा दिल्या. रिंकूने नेहमीप्रमाणे कॅमिओ इनिंग खेळत केवळ 9 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. तिलक वर्मा दोन चेंडूत 7 धावांवर नाबाद राहिला.. नाथन एलिसला 45 धावांत 3, स्टोईनिसला एक बळी मिळाला.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 4 बाद 235 : यशस्वी जैस्वाल 53 (25 चेंडूत 9 चौकार, 2 षटकार), गायकवाड 58 (43 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), इशान किशन 52 (32 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), सूर्यकुमार 19 (10 चेंडूत 2 षटकार), रिंकू सिंग नाबाद 31 (9 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), तिकल वर्मा नाबाद 7 (2 चेंडूत 1 षटकार), अवांतर 15. गोलंदाजी : एलिस 3-45, स्टोईनिस 1-27.

ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 9 बाद 191 : स्मिथ 16 चेंडूत 19, शॉर्ट 10 चेंडूत 19, मॅक्सवेल 8 चेंडूत 12, स्टोईनिस 25 चेंडूत 45 (2 चौकार, 4 षटकार), टिम डेव्हिड 22 चेंडूत 37 (4 चौकार, 2 षटकार), मॅथ्यू वेड 23 चेंडूत नाबाद 42 (1 चौकार, 4 षटकार), अवांतर 10. गोलंदाजी : बिश्नोई 3-32, पी. कृष्णा 3-41, अक्षर पटेल 1-25, मुकेश कुमार 1-43, अर्शदीप 1-46.

Advertisement
Tags :

.