पहिल्या वनडेत भारताकडून द.आफ्रिकेचा धुव्वा
यजमान संघावर आठ गड्यांनी दणदणीत विजय : पदार्पणातच साई सुदर्शनचे नाबाद अर्धशतक : श्रेयस अय्यरचेही अर्धशतक
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
येथील न्यू वांडरर्स स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. प्रारंभी, अर्शदीप सिंग (37 धावांत 5 बळी) व आवेश खान (27 धावांत 4 बळी) यांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव 116 धावांत आटोपला. यानंतर साई सुदर्शन व श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 16.4 षटकांतच विजय मिळवला. दुसरा सामना मंगळवारी 19 रोजी होणार आहे.
अर्शदीप-आवेशची कमाल,यजमानांचे सगळेच फलंदाज फ्लॉप
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. पॉवरप्लेमध्येच त्यांनी 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर आफ्रिकेचा डाव सावरु शकला नाही. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी गोलंदाजीत कमाल केली. दोघांनी मिळून नऊ विकेट घेत आफ्रिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. डावाच्या दुसऱ्या षटकातच अर्शदीपने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्शदीपने रीझा हेंड्रिक्सला बोल्ड केले. रिझाला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी व्हॅन डर डुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो देखील शुन्यावर आऊट झाला. यानंतर टोनी डी जॉर्जीला (28) देखील अर्शदीपने बाद केले. हेनरिक क्लासेनही (6) अर्शदीपचा बळी ठरला. पहिल्या चार विकेट अर्शदीपने घेतल्या. अर्शदीपनंतर आवेश खानने दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले. 11 व्या षटकात आवेश खानची हॅट्ट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्करम (12) आणि व्हियान मुल्डरला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अँडिले फेहलुक्वायोने सर्वाधिक 33 धावा केल्या. इतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्याने आफ्रिकेचा डाव अवघ्या 27.3 षटकांत 116 धावांवर संपुष्टात आला. विशेष म्हणजे, आफ्रिकेची ही भारताविरुद्ध सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. भारताने यापूर्वी 2018 साली दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मातीत 118 धावांवर ऑलआऊट केले होते. पण यावेळी भारताच्या संघाने कमाल केली आणि आफ्रिकेचा डाव 116 धावांत संपवला.
साई सुदर्शन, अय्यरची अर्धशतके
117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (5) विकेट गमावली. पण यानंतर श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांच्यात 88 धावांची जलद भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने 45 चेंडूत 52 धावा केल्या. पदार्पणातच साई सुदर्शनने नाबाद अर्धशतकी खेळी साकारत विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 43 चेंडूत 55 धावा केल्या. तिलक वर्मा 1 धाव करून नाबाद राहिला. टीम इंडियाने विजयासाठीचे लक्ष्य भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 27.3 षटकांत सर्वबाद 116 (फेहलुक्वायो 33, जॉर्जी 28, मार्करम 12, अर्शदीप सिंग 37 धावांत 5 बळी, आवेश खान 27 धावांत 4 बळी).
भारत 16.4 षटकांत 2 बाद 117 (ऋतुराज गायकवाड 5, साई सुदर्शन नाबाद 55, श्रेयस अय्यर 52, तिलक वर्मा नाबाद 1, मुल्डर व फेहलुक्वायो प्रत्येकी एक बळी).
साई सुदर्शनची पदार्पणातच फिफ्टी
जोहान्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात साई सुदर्शनला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. वयाच्या 22 व्या वर्षी साईला आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 400 वा खेळाडू ठरला. पदार्पणाच्या सामन्यातच साईने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 9 चौकारासह नाबाद 55 धावा केल्या.
आफ्रिकेविरुद्ध 5 बळी घेणारा अर्शदीप भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीपने पाच बळी मिळवले आणि इतिहास रचला. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही वेगवान गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स मिळवता आले नव्हते. पण अर्शदीपने ही किमया आपल्या चौथ्याच वनडे सामन्यात करून दाखवली आहे. अर्शदीपच्या आधी आफ्रिकेविरुद्ध भारतीय फिरकी गोलंदाजांनी हा पराक्रम केला असला, तरी आजपर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाला ही कामगिरी करता आली नव्हती. आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये 5 बळी घेणारा अर्शदीप भारताचा चौथा गोलंदाज ठरला. याआधी युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा व सुनील जोशी या फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या आहेत.
यंदाच्या वर्षातील टीम इंडियाचा 26 वा विजय
भारताचा या वर्षातील वनडेतील हा 26 वा विजय आहे. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने 26 सामने जिंकले होते. याशिवाय, यंदाच्या वर्षात कांगारुंनी 30 सामने जिंकले आहेत. आफ्रिकन संघाचा पराभव करत भारताने मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. तसेच पाच वर्षांनंतर भारताने आफ्रिकेत वनडे सामना जिंकला आहे. याआधी टीम इंडियाने 2018 मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2022 मध्ये सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.