For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडला हरवून भारत अंतिम फेरीत

06:58 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडला हरवून भारत अंतिम फेरीत
Advertisement

सामनावीर मोहम्मद शमी : 57 धावांत 7 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

विक्रमवीर विराट कोहलीचे विश्वविक्रमी 50 वे वनडे शतक, श्रेयस अय्यरचे सलग दुसरे शतक, शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक, रोहित शर्मा व केएल राहुल यांची जोरदार फटकेबाजी आणि मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने उपांत्य लढतीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील त्यांचा हा सलग दहावा विजय आहे. 57 धावांत 7 बळी टिपणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीराचा बहुमान मिळाला. डॅरील मिचेलचे शतक व विल्यम्सनची अर्धशतकी खेळी मात्र वाया गेली.

Advertisement

भारताने प्रथम फलंदाजी करीत 50 षटकांत 4 बाद 397 धावांचा डोंगर उभा करीत न्यूझीलंडला 398 धावांचे कठीण आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे 39 धावांतच दोन गडी बाद झाले. पण कर्णधार केन विल्यम्सन व डॅरील मिचेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 181 धावांची भागीदारी करीत आशा कायम राखल्या होत्या. भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचाही त्यांना फायदा मिळाला. विल्यम्सन 73 चेंडूत 69 धावा काढून बाद झाल्यानंतर मिचेलला ग्लेन फिलिप्सकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. दोघांनी 75 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांना धावगती वाढल्याने अपेक्षापूर्ती करता आली नाही आणि त्यांचा डाव 48.5 षटकांत 327 धावांत आटोपल्याने मिचेल, विल्यम्सन, फिलिप्स यांची झुंज वाया गेली. मिचेलने कडवा प्रतिकार करीत 119 चेंडूत 9 चौकार, 7 षटकारांसह 134 धावा झोडपल्या. फिलिप्सने 33 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 41 धावा केल्या. बुमराह सिराज, कुलदीप यादव यांनी एकेक बळी मिळविले. येत्या रविवारी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजयी संघाविरुद्ध भारताची जेतेपदाची लढत होईल.

Advertisement
Tags :

.