For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा न्यूझीलंडवर 214 धावांनी विजय

06:58 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा न्यूझीलंडवर 214 धावांनी विजय
Advertisement

शतकवीर मुशीर खान सामनावीर, आदर्श सिंगचे अर्धशतक,  सौमी पांडेचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्लोमफौंटेन (दक्षिण आफ्रिका)

आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील येथे सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीतील सामन्यात मुशीर खानचे दमदार शतक तसेच आदर्श सिंगचे अर्धशतक आणि सौमी पांडेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय युवा संघाने न्यूझीलंडचा 214 धावांनी दणदणीत पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली.

Advertisement

प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 8 बाद 295 धावा जमवित न्यूझीलंडला विजयासाठी 296 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 28.1 षटकात 81 धावात संपुष्टात आला. या स्पर्धेत भारतीय युवा संघाने सलग तीन सामने 200 धावांच्या फरकाने जिंकण्याचा विक्रम केला आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मुशीर खानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या स्पर्धेत भारतीय युवा संघाने प्राथमिक फेरीतील आपले सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकून विजयी घोडदौड कायम राखली. या स्पर्धेतील भारताचा हा चौथा सामना असून त्यामध्येही भारताने पुन्हा विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असल्याने त्याचा लाभ भारतीय फलंदाजांनी घेतला. आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी या सलामीच्या जोडीने 28 धावांची भागिदारी केल्यानंतर 5 व्या षटकात कुलकर्णी क्लार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यांने 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला मुशीर खानने आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर दिला. त्याने धावफलक सातत्याने हालता ठेवला. त्याचे पूल आणि कव्हर ड्राईव्हचे फटके अप्रतिम होते. आदर्श सिंग आणि मुशीर खान यांनी दुसऱ्या गड्यासाठी 77 धावांची भागिदारी केली. भारताने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 61 धावा जमविताना 1 गडी गमविला. आदर्श सिंगने आपले अर्धशतक 57 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने झळकविले. त्यानंतर मुशीर खानने आपले अर्धशतक 61 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. भारताचे शतक 97 चेंडूत तर दीड शतक 173 चेंडूत फलकावर लागले. कमिंगने आदर्श सिंगला झेलबाद केले. त्याने 58 चेंडूत 6 चौकारांसह 52 धावा झळकविल्या. मुशीर खान एकाबाजूने खेळपट्टीवर आत्मविश्वासाने फटकेबाजी करीत होता. कर्णधार उदय सहारन आणि मुशीर खान यांनी तिसऱ्या गड्यासाठी 87 धावांची भर घातली. तेवातियाने सहारनला झेलबाद केले. त्याने 57 चेंडूत 2 चौकारांसह 34 धावा जमविल्या. भारताचे द्विशतक 222 चेंडूत नोंदविले गेले. भारताने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात 2 गडी गमविताना 145 धावा जमविल्या. मुशीर खानने आपले शतक 109 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या स्पर्धेतील मुशीर खानचे हे दुसरे शतक आहे. अविनाशने 2 षटकारांसह 17, मोलीयाने 10, सचिन धसने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. भारताने तिसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या शेवटच्या 10 षटकात 5 गडी गमविताना 89 धावा जमविल्या. मुशीर खान 6 व्या गड्याच्या रूपात बाद झाला. त्याने 126 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांसह 131 धावा जमविल्या. भारताच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅसन क्लार्कने 62 धावात 4 तर सोरगेस, स्क्रूडर, कमिंग आणि तेवातिया यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 28.1 षटकात 81 धावात आटोपला. न्यूझीलंडच्या डावाला पहिल्या चेंडूपासूनच गळती लागली. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर लिंबानीने जोन्सचा त्रिफळा उडविला. त्यानंतर लिंबानीने आपल्या या षटकातील 5 व्या चेंडूवर स्नेहीत रे•ाrला खाते उघडण्यापूर्वी पायचित केले. न्यूझीलंडचे हे दोन फलंदाज संघाचे खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतले होते. सौमी पांडेने स्टॅकपोलचा 5 धावावर त्रिफळा उडविला. पांडेने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना नेल्सनला पायचित केले. त्याने 1 चौकारासह 10 धावा केल्या. नमन तिवारीने तेवातियाला 7 धावावर त्रिफळाचित केले. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 5 बाद 39 अशी केविलवाणी होती. कर्णधार जॅक्सनने 38 चेंडूत 2 चौकारांसह 19 तर कमिंगने 1 चौकारांसह 16 आणि थॉमसनने 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 3 फलंदाजांना आपले खाते उघडता आले नाही. न्यूझीलंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 27 धावा जमविताना 4 गडी गमविले. न्यूझीलंडचे अर्धशतक 100 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडच्या डावात 8 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे सौमी पांडेने 19 धावात 4 तर राज लिंबानी आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी 2, नमन तिवारी व अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - भारत 50 षटकात 8 बाद 295 (मुशीर खान 131, आदर्श सिंग 52, उदय सहारन 34, अविनाश 17, मोलिया 10, सचिन धस 15, अवांतर 18, क्लार्क 4-62, सोरगेस, स्क्रूडर, तेवातिया आणि कमिंग प्रत्येकी 1 बळी).

न्यूझीलंड 28.1 षटकात सर्वबाद 81 (जॅक्सन 19, कमिंग 16, थॉमसन 12, नेल्सन 10, पांडे 4-19, लिंबानी 2-17, मुशीर खान 2-10, तिवारी 1-19,  कुलकर्णी 1-13).

Advertisement
Tags :

.