नेपाळला हरवून भारत उपांत्य फेरीत
राज लिंबानीचे 13 धावात 7 बळी : नेपाळचा 10 गड्यांनी पराभव
वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यात वेगवान गोलंदाज राज लिंबानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय युवा संघाने नेपाळचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात राज लिंबानीने 13 धावात 7 गडी बाद केले. त्याचप्रमाणे अष्टपैलू अर्शिन कुलकर्णीने 5 षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेपाळचा डाव 22.1 षटकात 52 धावात आटोपला त्यानंतर भारताने 7.1 षटकात बिनबाद 52 धावा जमवित हा सामना 10 गड्यांनी जिंकला. उदय सहारणच्या नेतृत्त्वाखाली भारतीय युवा संघाचा प्राथमिक फेरीतील हा शेवटचा सामना होता. तर बाद फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला विजयाची नितांत गरज होती. भारतीय युवा संघाला या स्पर्धेत पाकिस्तानकडून 8 गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. नेपाळने आपले दोन्ही सामने गमविल्याने त्यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाले आहे.
बडोद्याचा 18 वर्षीय वेगवान गोलंदाज राज लिंबानीने आपल्या जबरदस्त स्वींग गोलंदाजीच्या जोरावर नेपाळच्या फलंदाजीला भगदाड पाडले. त्याच्या भेदक माऱ्यामुळे नेपाळच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कनिष्ठांच्या आशिया चषक स्पर्धेत लिंबानीला मात्र यापूर्वी केलेला इरफान पठाणचा विक्रम मागे टाकता आला नाही. 2004 साली लाहोरमध्ये झालेल्या कनिष्ठांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध इरफान पठाणने 16 धावात 9 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. इरफानचा हा विक्रम अद्याप अबादीत राहिला आहे. नेपाळच्या डावामध्ये हेमंत धामीने सर्वाधिक म्हणजे 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये अष्टपैलू अर्शिन कुलकर्णीने 5 उत्तुंग षटकारांसह नाबाद 43 धावा फटकाविल्या. या स्पर्धेतील अफगाण विरुद्धच्या सामन्यात अर्शिन कुलकर्णीने नाबाद 70 धावांची खेळी केली होती. तर गोलंदाजीत त्याने 3 गडी बाद केले होते.
संक्षिप्त धावफलक - नेपाळ 22.1 षटकात सर्व बाद 52 (हेमंत धामी 8, राज लिंबानी 7-13), भारत 7.1 षटकात बिनबाद 52 (अर्शिन कुलकर्णी 5 षटकारांसह नाबाद 43).