हॉकी : भारताची मलेशियावर मात मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
वृत्तसंस्था/ ओहोर बहरू (मलेशिया)
तीन वेळच्या विजेत्या भारताने मंगळवारी येथे सुलतान ऑफ जोहोर चषक कनिष्ठ पुऊष हॉकी स्पर्धेत यजमान मलेशियाचा 4-2 असा पराभव करत आपली अपराजित वाटचाल कायम ठेवली, मात्र बुधवारच्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले.
मलेशियाविरुद्ध विजयानंतर भारत नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर wपोहोचला होता, तर न्यूझीलंड पाच गुणांसह दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर होते. भारताकडून शारदानंद तिवारी (11 वे मिनिट), अर्शदीप सिंग (13 वे मिनिट), तालेम प्रियोबर्टा (39 वे मिनिट) आणि रोहित (40 वे मिनिट) यांनी गोल केले, तर मलेशियाकडून मोहम्मद दानिश आयमान (8 वे मिनिट) आणि हॅरिस उस्मान (9 वे मिनिट) यांनी गोल केले.
मात्र ऑस्ट्रेलियाने बुधवारी येथे 4-0 ने सामना जिंकून भारताची विजयी घोडदौड खंडित केली. भारताची फॉरवर्ड लाईन ऑस्ट्रेलियन बचाव मोडण्यासाठी संघर्ष करत असताना डेकिन स्टॅनगरने (33 वे, 39 वे व 53 वे मिनिट) हॅटट्रिक नोंदविली, तर पॅट्रिक अँड्य्रूने (29वे मिनिट) सलामीचा गोल केला. पराभवानंतरही भारताने गुणतालिकेत नऊ गुणांसह आघाडी कायम राखली आहे, तर ऑस्ट्रेलिया (7 गुण) हा आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडनंतर तिसऱ्या स्थानावर आहे.