भारताची केनियावर मात
वृत्तसंस्था/ मस्कत
एफआयएच हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धेत उत्तम सिंगने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताच्या पुरुष संघाने 5-8 व्या स्थानासाठी झालेल्या लढतीत केनियाचा 9-4 अशा गोलफरकाने पराभव केला.
उत्तम सिंगने 5, 25, 26 व्या मिनिटाला गोल नोंदवले तर मनजीत (6 वे मिनिट), पवन राजभर (10 वे मिनिट), मनदीप मोर (15 वे मिनिट), मोहम्मद राहील (17 व 25 वे मिनिट), गुरजोत सिंग (28 वे मिनिट) यांनी भारताचे उर्वरित गोल केले. केनियासाठी मोजेस अडेम्बा (12, 14, 27 वे मिनिट), कर्णधार इव्हान लुडियाली (24 वे मिनिट) यांनी गोल नोंदवले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने सामन्यावर नियंत्रण मिळविले आणि प्रारंभीच्या काही मिनिटांतच केनियाच्या गोलपोस्टपर्यंत भारताने अनेकदा धडक मारली. केनियानेही प्रतिआक्रमण करीत भारतीय हद्दीत प्रवेश मिळविला तरी भारताने आक्रमक खेळ पुढे चालू ठेवला. उत्तम सिंग व मनजीत यांनी भारताला सर्वप्रथम आघाडीवर नेले. आक्रमण कायम ठेवत भारताने केनियाच्या बचावफळीला सतत दडपणाखाली ठेवले होते आणि राजभरने भारताचा तिसरा गोल नोंदवण्यात यश मिळविले. मात्र मोजेस अडेम्बाने झटपट दोन गोल नोंदवत भारताची आघाडी कमी केली. मनदीपने आणखी एक गोल नोंदवत मध्यंतराला भारताची आघाडी 4-2 अशी केली.
उत्तरार्धात राहीलने प्रतिहल्ला करीत गोल नोंदवून भारताची आघाडी वाढवली. केनियाला मुसंडी मारण्याची संधी मिळू नये यासाठी भारताने जलद पासेस देण्याचे व चेंडू जास्तीत जास्त वेळ आपल्या ताब्यात ठेवण्याचे धोरण अवलंबले. अशा स्थितीतही केनियाचा कर्णधार लुडियालीने गोल नोंदवला आणि अडेम्बाने आपली हॅट्ट्रिकही पूर्ण करीत संघाचा चौथा गोल नोंदवला. राहील, उत्तम सिंग व गुरजोत सिंग यांनी भारताची आघाडी वाढवत विजय निश्चित केला. 5 व 6 व्या स्थानासाठी भारताची पुढील लढत होणार आहे.