For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर.अश्विनसमोर बांगलादेशचे लोटांगण

06:58 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आर अश्विनसमोर बांगलादेशचे लोटांगण
Advertisement

पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 280 धावांनी विजय : सामनावीर अश्विनचे 6 तर जडेजाचे 3 बळी  

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत तब्बल 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 234 धावांत ऑलआऊट झाला. आर. अश्विन व रविंद्र जडेजाच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशलच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले. चेपॉक स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरी कसोटी दि. 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवली जाईल.

Advertisement

चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेला पहिला कसोटी सामना टीम इंडियाने मोठ्या सहजतेने जिंकला. भारताच्या विजयात आर अश्विनची भूमिका महत्त्वाची होती. आर अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावत भारताचा डाव सावरला आणि दुस्रया डावात विक्रमी 6 विकेट्स घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अश्विन-जडेजाची फिरकी, बांगलादेशची भांबेरी

बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतोने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चांगलाच चुकीचा ठरला. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या, प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांत ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर रिषभ पंत व शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसरा डाव 4 बाद 287 धावांवर घोषित केला व बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य दिले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने 4 बाद 158 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन त्यांनी चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली.

नजमुल आणि शाकिबने डाव पुढे नेला. दिवसाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या तासात दोन्ही खेळाडूंनी संयमी फलंदाजी करत भारताला विकेट घेऊ दिली नाही. मात्र, दुसऱ्या तासात शाकिबला (25) अश्विनने जैस्वालच्या हाती झेलबाद केल्यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले. जडेच्या गोलंदाजीवर लिटन दास (1) बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला. यानंतर अश्विनने मेहदी हसन मिराजला (8) बाद करून डावातील आपली पाचवी विकेट घेतली. जडेजाच्या गोलंदाजीत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नजमुल हुसैन बुमराहच्या हाती झेलबाद झाला. त्याने सर्वाधिक 127 चेंडूत 82 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश राहिला. यानंतर अश्विनची जादू कायम राहिली आणि त्याने तस्किन अहमदलाही (5) बाद केले. हसन मेहमूदला बाद करून जडेजाने शेवटची विकेट घेतली. बांगलादेश संघ 62.1 षटकांत 234 धावांवर ऑलआऊट झाला.

संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 376 व दु.डाव 4 बाद 287 घोषित

बांगलादेश प.डाव 149 व दुसरा डाव 62.1 षटकांत सर्वबाद 234 (झाकीर हसन 33, शादमान इस्लाम 35, नजमुल शांतो 82, शाकीब हसन 25, मोमीनल हक 13, रहीम 13, आर.अश्विन 6 बळी, जडेजा 3 तर बुमराह 1 बळी).

अश्विनचा विक्रमांचा पाऊस

भारत व बांगलादेश यांच्यात चेन्नईत झालेला पहिला कसोटी सामना फिरकीपटू आर. अश्विनसाठी विक्रमी ठरला. पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात 6 बळी घेत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. या सामन्यात अश्विनने ऑस्ट्रेलियाचा महान माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या विक्रमाशी बरोबरी केली. वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत 37 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनने या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अश्विन आता श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे. याशिवाय, कसोटी सामन्यात शतक आणि पाच बळी घेणारा अश्विन हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त इयान बोथम आहे. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम पाच वेळा केला आहे. तर अश्विनने आतापर्यंत चार वेळा अशी कामगिरी केली.

कसोटीत एका डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 67
  • रविचंद्रन अश्विन (भारत) - 37
  • शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 37
  • रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड) - 36

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतच नंबर 1!

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत 280 धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाने आपले अव्वलस्थान आणखी मजबूत केले आहे. चेन्नई कसोटीतील पराभवामुळे बांगलादेश संघ सहाव्या स्थानावर घसरला आहेत. ही मालिका सुरू होण्यापूर्वी बांगलादेशचा संघ गुणतालिकेत इंग्लंड आणि श्रीलंकेच्या वर होता पण आता तो या दोघांच्याही खाली घसरला आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या तर इंग्लंड पाचव्या स्थानी आहे.

580 सामने अन् 92 वर्षे

चेन्नई कसोटीत विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. भारतीय संघाने 1932 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून भारताने एकूण 580 सामने खेळले आहेत. 92 वर्षांच्या इतिहासात प्रथमच टीम इंडियाने पराभवापेक्षा जास्त विजयाचा आकडा गाठला आहे. बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील 179 वा विजय संपादन केला आहे. तर, संघाला 178 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 222 सामने अनिर्णित तर एक सामना रद्द झाला आहे. कसोटीमध्ये पराभवापेक्षा जास्त विजय नोंदवणारा भारत हा जगातील पाचवा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या संघांनी अशी कामगिरी केली आहे.

कानपूर कसोटीसाठी टीम इंडिया जैसे थे

चेन्नई कसोटीतील दणकेबाज विजयानंतर बीसीसीआयने 27 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताने या कसोटी सामन्यासाठी तोच संघ कायम ठेवला आहे, जो पहिल्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आला होता. पहिल्या कसोटीत भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजासह उतरला होता. आता कानपूरची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने रोहित शर्मा प्लेईंन 11 मध्ये काही बदल करतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारत मायदेशात सलग 17 मालिकांपासून अजिंक्य आहे. टीम इंडियाने 2012 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही, हे विशेष. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाने 12 वा कसोटी विजय मिळवला. उभय संघात आजवर 14 सामने झाले, यातील दोन सामने रद्द तर 12 सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशविरुद्ध धावांच्या बाबतील सर्वात मोठा विजय मिळवला.

आमच्यासाठी विजय महत्वाचा

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीतील विजय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. फिरकी आर.अश्विन, रविंद्र जडेजा, रिषभ पंत व शुभमन गिल यांच्यामुळे आम्हाला मोठा विजय मिळवता आला. चेन्नईतील लाल मातीची खेळपट्टी कठीण होती, अशा ठिकाणी तुम्हाला फार संयम दाखवावा लागतो. आता, कानपूर कसोटी जिंकत मालिका विजय मिळवणे हे लक्ष्य असेल.

रोहित शर्मा, भारतीय कर्णधार

भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात आमच्याकडून चुका झाल्या. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली पण फलंदाज सपशेल अपयशी ठरले. आता, दुसऱ्या कसोटीत आम्हाला सातत्य राखावे लागेल.

नजमूल हुसेन शांतो, बांगलादेश कर्णधार

आश्वासक सुरुवात

भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर खूप आनंदी आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले. पहिली कसोटी जिंकल्यानंतर गंभीरने रोहित शर्मा आणि अश्विनसह सर्व खेळाडूंचे कौतुक केले. आश्वासक सुरुवात, सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन! अशा आशयाची पोस्ट गंभीरने सोशल मीडियावर करत संघाचे कौतुक केले आहे.

-भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर

Advertisement
Tags :

.