भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 गड्यांनी विजय
स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांची अर्धशतके : साधूचे 4 बळी
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शुक्रवारी येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार अर्धशतके झळकविताना सलामीच्या गड्यासाठी 92 चेंडूत 137 धावांची शतकी भागिदारी केली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघाने यजमान भारताला विजयासाठी 142 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे लिचफिल्ड आणि इलेसी पेरी यांनी चिवट फलंदाजी केली तर भारतातर्फे तितास साधूने 17 धावात 4 गडी बाद केले. श्रेयांका पाटील आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. या जोडीने 92 चेंडूत 137 धावांची शतकी भागिदारी केली. स्मृती मानधनाने 52 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 54 धावा झोडपल्या तर शेफाली वर्माने 44 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 64 धावा झळकविल्या. रॉड्रिग्जने 11 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 6 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी शिस्तबद्ध नव्हती. त्यांनी भारताला अवांत्तराच्या रूपात 21 धावा दिल्या. पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात भारताने 59 धावा जमविल्या. भारताचे अर्धशतक 32 चेंडूत, शतक 69 चेंडूत नोंदविले गेले. शेफालीने आपले अर्धशतक 32 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने तर मानधनाने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 50 चेंडूत झळकविले. भारताच्या डावात 4 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे वेरहॅमने 1 गडी बाद केला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार हिली आणि मुनी यांनी सलामीच्या गड्यासाठी 23 चेंडूत 28 धावांची भागिदारी केली. साधूने बेथ मुनीला झेलबाद केले. तिने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 17 धावा केल्या. रेणुकासिंग ठाकुरने कर्णधार हिलीला झेलबाद केले. तिने 1 चौकारांसह 8 धावा केल्या. ताहिला मॅकग्रा खाते उघडण्यापूर्वीच साधूच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. साधूने यानंतर स्वत:च्याच गोलंदाजीवर गार्डनरला टिपले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहाव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर साधूने हे बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 6 षटकात 4 बाद 33 अशी होती. लिचफिल्ड आणि पेरी यांनी संघाचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केली. लिचफिल्डने 3 षटकार आणि 4 चौकारांसह 32 चेंडूत 49 धावा तर पेरीने 30 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 37 धावा जमविल्या. सुदरलँडने 1 षटकारासह 12 धावा केल्या. 19.2 षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव 141 धावात आटोपला. त्यांच्या डावात 7 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 33 धावा जमविताना 4 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 52 चेंडूत तर शतक 77 चेंडूत फलकावर लागले. भारतातर्फे साधूने 17 धावात 4 तसेच श्रेयांका पाटील आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर अमनज्योत कौरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 19.2 षटकात सर्वबाद 141 (लिचफिल्ड 49, पेरी 37, मुनी 17, सुदरलँड 12, अवांत्तर 11, साधू 4-17, पाटील -19, दिप्ती शर्मा 2-24, अमनज्योत कौर 1-23, रेणुकासिंग ठाकुर 1-24). भारत 17.4 षटकात 1 बाद 145 (स्मृती मानधना 54, शेफाली वर्मा नाबाद 64, रॉड्रिग्ज नाबाद 6, अवांत्तर 21, वेरहॅम 1-20).