भारताचे अमेरिकेवर 201 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ ब्लोमफाऊंटन
आयसीसीच्या यू-19 पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारच्या सामन्यात भारतीय युवा संघाने अमेरिकेवर 201 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
भारताने 50 षटकात 5 बाद 326 धावा जमविल्या. सलामीच्या अर्शिन कुलकर्णीने शानदार शतक तर मुशिर खानने अर्धशतक झळकवले. या स्पर्धेत भारताने यापूर्वी आपल्या गटातील पहिले 2 सामने जिंकले आहेत. रविवारच्या तिसऱ्या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली.
सलामीचा डावखुरा फलंदाज अर्शिन कुलकर्णीने 3 षटकार आणि 8 चौकारांसह 118 चेंडूत 108 धावा झळकाविल्या तर मुशिर खानने 76 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 73 धावा झोडपल्या. कुलकर्णी आणि मुशिर खान यांनी 155 धावांची भागिदारी केली. कर्णधार उदय शरणने 27 चेंडूत 35 धावा जमविल्या. सचिन धासने 20, प्रियांशु मोलियाने नाबाद 27 तर अवानिशने नाबाद 12 धावा जमविल्याने भारताला 50 षटकात 5 बाद 326 धावांपर्यंत मजल मारता आली. अमेरिकेतर्फे अतेंद्र सुब्रह्मनियानने 45 धावात 2 तर ऋषी रमेशने आणि गर्गने प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर अमेरिकेला 50 षटकांत 8 बाद 125 धावांवर रोखत भारताने विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक - भारत 50 षटकात 5 बाद 326 (अर्शिन कुलकर्णी 108, मुशिर खान 73, उदय शरण 35, सचिन धास 20, मोलिया नाबाद 27, सुब्रह्मनियन 2-45). अमेरिका 50 षटकांत 8 बाद 125.