भारत- बांगलादेश सामना पावसामुळे वाया
वृत्तसंस्था / मुंबई
यजमान भारत व बांगलादेश महिला क्रिकेट संघातील आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 28 वा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. आता या स्पर्धेत यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळविले जातील.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडीयमवर रविवारी भारत-बांगलादेश यांच्यातील प्राथमिक फेरीतील हा शेवटचा सामना होता. या सामन्यात पावसाचा वारंवार अडथळा आल्याने पंचांनी प्रत्येकी 27 षटकांचा सामना खेळविण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली.
बांगलादेशने 27 षटकात 9 बाद 119 धावा जमविल्या. शर्मीन अख्तरने 53 चेंडूत 4 चौकारांसह 36, शोभना मोस्तारीने 21 चेंडूत 4 चौकारांसह 26, मोनीने 1 षटकारासह 11 धावा जमविल्या. भारतातर्फे राधा यादवने 30 धावात 3 तर श्रीचरणीने 23 धावात 2, रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
भारताला विजयासाठी 27 षटकात 126 धावांचे उद्दीष्ट देण्यात आले होते पण भारताने 8.4 षटकात बिनबाद 57 धावा जमविल्या असताना पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. पंचानी पाऊस थांबण्याची वाट पाहिली. पण संततधार पावसामुळे पंचांनी हा सामना रद्द केल्याचे नंतर घोषित केले.
धावफलक- बांगलादेश 27 षटकात 9 बाद 119 (शर्मीन अख्तर 36, मोस्तारी 26, हैदर 13, मोनी 11, राधा यादव 3-30, श्रीचरणी 2-23, रेणुका सिंग, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर प्रत्येकी 1 बळी),
भारत-8.4 षटकात बिनबाद 57 (स्मृती मानधना नाबाद 34, अमनजोत कौर नाबाद 15, अवांतर 8).