भारत-बांगलादेश पहिली कसोटी लढत आजपासून
फिरकीविरुद्ध फलंदाजीत अलीकडे दिसलेले कच्चे दुवे दूर करण्यावर भारताचा भर, बांगलादेशकडूनही प्रतिकार अपेक्षित
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताच्या क्रिकेट मोसमाला आज गुऊवारपासून येथे सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ होणार आहे. हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणात एकतर्फी स्पर्धा खेळलेल्या भारताला बांगलादेशचा सामना करताना फिरकीविऊद्धची फलंदाजीतील दुर्बलता दूर करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
पाकिस्तानला नुकतेच 2-0 ने पराभूत केल्यान बांगलादेशचा उत्साह वाढलेला आहे आणि यावेळी तो सहज पराभूत करता येण्याजोगा संघ दिसत नाही. यामुळे भारताच्या चिंतेमध्ये भर पडेल. भारत या दीर्घ मोसमात 10 कसोटी सामने खेळणार असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधीही त्यांना आहे. गेल्या दशकभरातील भारताचा 40 विजय-4 पराजय हा घरच्या भूमीवरील विक्रम विस्मयकारक आहे. परंतु त्याला एक लहानसा तडा गेलेला असून तो गेल्या तीन वर्षांत अधिक स्पष्ट होत चाललेला आहे.
विशेषत: स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बाबतीत तो अधिक जाणवत आहे. 2015 पासून घरच्या मैदानावर भारताने उभारलेल्या मोठ्या धावसंख्यांमध्ये कोहलीचे भरीव योगदान राहिले होते. पण 2021 पासून फिरकीविऊद्धची त्याची धावसंख्या कमी झाली आहे. या कालावधीत 15 कसोटींमध्ये त्याची सरासरी 30 इतकी राहिलेली आहे. याबाबतीत सदर चॅम्पियन क्रिकेटर नक्कीच सुधारणा करू पाहील.
कर्णधार रोहित शर्मा देखील 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविऊद्ध सलामीवीर म्हणून पदोन्नती मिळाल्यापासून फिरकीवर हल्ला चढविण्यात अग्रेसर राहिला होता आणि त्याची सरासरी 90 पेक्षा जास्त होती. परंतु 2021 पासूनच्या 15 सामन्यांमध्ये ती सरासरी घसरून 44 वर आलेली आहे. के. एल. राहुल फिरकी आणि वेगवान गोलंदाजीविऊद्ध तितकाच निपुण असला, तरी गेल्या तीन वर्षांत तो घरच्या मैदानावर जे पाच कसोटी सामने खेळलेला आहे त्यात फिरकीविरुद्ध त्याची सरासरी 23.40 इतकी राहिलेली आहे.
ही आकडेवारी कमी होत चाललेल्या कौशल्यांचे संकेत तर देतेच शिवाय फिरकी खेळण्याची कला परिपूर्ण करण्यावर पुन्हा लक्ष पेद्रीत करण्याची गरजही दाखवून देते. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेच्या फिरकीपटूंविऊद्ध भारताचा 0-2 असा पराभव झाल्यानंतर साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी या मुद्यावर भर दिला होता. रिषभ पंत (पाच सामने, सरासरी 70), शुभमन गिल (10 सामने, सरासरी 56) व यशस्वी जैस्वाल (पाच सामने, सरासरी 115) यांची कामगिरी चमकदार राहिलेली असली, तरी जैस्वाल आणि गिल यांच्या कामगिरीत या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या इंग्लंडविऊद्धच्या मालिकेतील आकडेवारीचा बराच वाटा आहे. परंतु इंग्लंडकडे अनुभवी फिरकी आक्रमण नव्हते.
याउलट, बांगलादेशकडे डावखुरा शाकिब अल हसन, तैजुल इस्लाम आणि ऑफस्पिनर मेहिदी हसन मिराझ यासारखे अधिक प्रभावी फिरकीपटू आहेत. पाहुण्यांच्या फिरकी माऱ्याला तोंड देण्याच्या दृष्टीने भारत रिषभ पंतवर बराच अवलंबून राहणार असून 2022 मधील भीषण कार अपघातानंतर तो आपली पहिली कसोटी खेळण्याची अपेक्षा आहे. गोलंदाजीच्या विभागात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा हे पहिल्या अकरामध्ये स्थान मिळवतील हे निश्चित आहे आणि परिस्थिती कसलीही असली, तरी हा मजबूत विभाग आहे.
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर लाल मातीची खेळपट्टी वाट्याला येऊ शकते. त्यामुळे कुलदीप यादवच्या रुपाने तिसरा फिरकीपटू मैदानात उतरवायचा की, आकाश दीप वा यश दयाल यापैकी एकाला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळवायचे यावर भारताला विचार करावा लागेल. भारत अक्षर पटेलच्या पर्यायावर देखील विचार करू शकतो. त्यामुळे तळाकडील फलंदाजीला मजबुती मिळू शकेल. बांगलादेशकडे नाहिद राणा आणि हसन महमूद हे दोन वेगवान गोलंदाज आहेत.
नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोरही एक छोटे, परंतु महत्त्वाचे वैयक्तिक उद्दिष्ट असू शकते. श्रीलंकेतून मर्यादित षटकांच्या मालिकांत 1-1 अशा कामगिरीसह परतल्यानंतर पहिल्या कसोटी मालिकेत विजय नोंदविण्याचे ध्येय त्याच्यासमोर निश्चितच राहील. हंगामातील पुढील वाटचालीला मजबुती देण्याच्या दृष्टीने या मालिकेतील भारताच्या प्रयत्नांना निश्चितच महत्त्व आहे.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.