भारत-बांगलादेश आज अंतिम फुटबॉल लढत
वृत्तसंस्था/ थिंपू
17 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत सोमवारी येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. भारतीय युवा फुटबॉल संघाला या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
नऊ दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या स्पर्धेला भारतीय युवा फुटबॉल संघाने विजयाने शानदार प्रारंभ केला. प्राथमिक गटातील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 1-0 असा निसटता विजय मिळविला होता. गेल्या वर्षी भारताच्या 16 वर्षाखालील फुटबॉल संघाने प्राथमिक गटातील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला होता. आणि त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणून विजेतेपद हस्तगत केले होते. सोमवारच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा फुटबॉल संघ गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील निकालाची पुनरावृत्ती करतील अशी आशा संघाचे प्रमुख प्रशिक्षक इश्फाक अहमद यांनी व्यक्त केली.
सॅफ चॅम्पियनशिप पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेच्या विविध वयोगटातील लढतीमध्ये आतापर्यंत भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामन्यात 4 वेळा गाठ पडली असून त्यापैकी 3 वेळा भारताने बांगलोशचा पराभव करत विजेतेपद मिळविले आहे. 2019 साली 18 वर्षाखालील वयोगटात, 2022 साली 20 वर्षाखालील वयोगटात तर 2023 साली 16 वर्षाखालील वयोगटातील सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा भारताने जिंकली होती. मात्र 2015 साली 16 वर्षाखालील सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद बांगलादेशने पटकाविले होते.
थिंपूमधील सुरु असलेल्या या स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला. तर बांगलादेशने दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.