भारत, बांगलादेश अंतिम फेरीत दाखल
19 पुरुष आशिया चषक क्रिकेट : भारताची लंकेवर, बांगलादेशची पाकवर मात
वृत्तसंस्था/ शारजाह
युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने नोंदवलेल्या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या बळावर भारताच्या युवा संघाने लंकन युवा संघाचा 7 गड्यांनी पराभव करून यू-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. अन्य एका उपांत्य सामन्यात बांगलादेश युवा संघाने पाक युवा संघावरही 7 गड्यांनी मात करीत अंतिम फेरी गाठली आहे. भारत व बांगलादेश यांच्यात रविवारी जेतेपदाची लढत होईल.
भारताला 174 धावांचे उद्दिष्ट मिळाले होते. 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूत 67 धावा झोडपताना 5 षटकार व 6 चौकार मारत भारताला 170 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवून दिला. लंकेने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर भारताच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव 46.2 षटकांत 173 धावांत आटोपला. लकविन अबेयसिंघेने 69 व शारुजन षण्मुगनाथनने 42 धावा जमविल्या. भारताच्या चेतन शर्माने 34 धावांत 3, किरण चोरमाळेने 32 धावांत 2 व आयुष म्हात्रेने 37 धावांत 2 बळी मिळविले. नंतर उद्दिष्टाचा पाठलाग करताना आयुष म्हात्रे (28 चेंडूत 34) व सूर्यवंशी यांनी 91 धावांची दमदार सलामी देत विजयाचा पाया रचला. सूर्यवंशीने लंकन गोलंदाजांना आपल्या फटकेबाजीने हैराण केले होते. त्याने सिगेराला सलग षटकार व चौकार मारून सुरुवात केली. त्याच्या पहिल्या षटकांत तब्बल 31 धावा त्याने वसूल केल्या. म्हात्रेनेही दुसऱ्या बाजूने फटकेबाजी केली आणि 8 षटकांतच बिनबाद 87 धावांची भागीदारी केली. विहास थ्यूमिकाने लंकेला पहिले यश मिळवून देताना म्हात्रेला बाद केले. सहकारी बाद झाला तरी सूर्यवंशीने विचलित न होता फटकेबाजी सुरूच ठेवताना सी. आंद्रे सिद्धार्थसह महत्त्वाची भागीदारी केली. सिद्धार्थने 22 धावा केल्या. कर्णधार मोहमद अमानने नाबाद 25 व केपी कार्तिकेयने नाबाद 11 धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : यू-19 लंका 46.2 षटकांत सर्व बाद 173 : अबेयसिंघ 69, षण्मुगनाथन 42, चेतन शमा 3-34, किरण चोरमाळे 2-32, आयुष म्हात्रे 2-37. यू-19 भारत 21.4 षटकांत 3 बाद 120 : सूर्यवंशी 67, म्हात्रे 34, मोहम्मद अमान नाबाद 25.
बांगलादेशचीही पाकवर मात
पाकने 37 षटकांत 116 धावा जमवित बांगलादेशला 117 धावांचे माफक आव्हान दिले होते. त्यांनी ते 22.1 षटकांत 3 बाद 120 धावा जमवित विजय साजरा केला. पाकच्या डावात मोहम्मद रियाजुल्लाहने 28 तर फरहान युसूफने सर्वाधिक 32 धावा जमविल्या. बांगलादेशचा इकबाल हुसेन इमोन त्यांचा कर्दनकाळ ठरला. त्याने 24 धावांत 4 बळी टिपले तर मारुफ मृधाने 2 बळी मिळविले. अझिझुल हकिमच्या (42 चेंडूत नाबाद 61) नाबाद अर्धशतकाने बांगलादेशचा विजय सोपा झाला. याशिवा मोहम्मद शिहाब जेम्सने 26, झेड. अब्रारने 17 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : यू-19 पाकिस्तान 37 षटकांत सर्व बाद 116 : रियाजुल्लाह 28, फरहान युसूफ 32, साद बेग 18, इकबाल हुसेन इमोन 4-24, मृधा 2-23. यू-19 बांगलादेश 22.1 षटकांत 3 बाद 120 : अझिझुल हकिम नाबाद 61, मोहम्मद जेम्स 26, अली रझा 1-40, नावीद अहमद खान 1-13.