भारत-बांगलादेश अ संघांचा आज उपांत्य सामना
वृत्तसंस्था/डोहा
येथे सुरु असलेल्या रायझिंग स्टार्स आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळविला जाईल. या सामन्यात विजय मिळविण्यासाठी भारत अ संघातील वरच्या फळीतील खेळाडूंना फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. त्याचप्रमाणे शुक्रवारी या स्पर्धेत पाकिस्तान शाहिन्स आणि श्रीलंका यांच्यात दुसरा उपांत्य सामना रात्री खेळविला जाईल. भारत अ संघातील सलामीचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने या स्पर्धेत आत्तापर्यंत 201 धावा जमवित सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरा क्रमांक घेतला आहे. या टी-20 प्रकारातील स्पर्धेत त्याने आक्रमक शतक तसेच 45 धावा जमविल्या आहेत. पण शुक्रवारच्या महत्त्वाच्या सामन्यात वैभवला कर्णधार जितेश शर्मा, नमन धीर, प्रियांष आर्या आणि नेहल वधेरा यांच्याकडून साथ मिळणे गरजेचे आहे. वधेराकडून या स्पर्धेत आत्तापर्यंत म्हणावी तशी आक्रमक फलंदाजी झालेली नाही. बांगलादेश अ संघ निश्चितच दर्जेदार असून या संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय अ संघ करणार नाही.
या स्पर्धेत बांगलादेश अ संघाच्या खेळाडूंनी बलाढ्या अफगाण अ संघाला केवळ 78 धावांत गुंडाळले होते. तसेच या स्पर्धेतील प्राथमिक साखळी सामन्यात बांगलादेश अ संघाने लंकन अ संघाला शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी झगडविले होते. बांगलादेश अ संघाकडे वेगवान गोलंदाज रिपॉन मोंडल तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज रकिबुल हसन यांच्यावर गोलंदाजीची फिस्त राहिल. या स्पर्धेमध्ये भारत अ ची गोलंदाजी आतापर्यंतच्या सामन्यात समाधानकारक झाली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज गुरुजपनीत सिंगने 3 सामन्यातून 5 गडी बाद केले आहेत. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबे तसेच सूयश शर्मा यांची बऱ्यापैकी साथ मिळत आहे. दुबे आणि शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले आहेत. हर्ष दुबे हा उपयुक्त फलंदाज असून त्याने ओमान विरुद्ध अर्धशतक झळकाविले होते. त्याला फलंदाजीत चौथ्या स्थानावर बढती देण्यात आली होती. बांगलादेश अ संघाकडे कर्णधार अकबर अली, हबीबुर रेहमान, यासिर अली, अरिफुल इस्लाम यांच्यावर फलंदाजीची फिस्त राहिल. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारत अ संघाला शुक्रवारी बांगलादेश अ संघावर विजयाची नितांत गरज आहे.
►भारत अ संघ : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वधेरा, नमन धीर, सूर्यांश शेडगे, जितेश शर्मा (कर्णधार), रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकुर, गुर्जपनीत सिंग, विजयकुमार विशाख, युद्धवीरसिंग चरक, अभिषेक पोरेल आणि सुयश शर्मा.
►बांगलादेश अ संघ : अकबर अली (कर्णधार), हबीबुर रेहमान, यासीर अली, झिशान आलम, अरिफुल इस्लाम, रकिबुल हसन, मेहमुदुल अनकोण, टी. अहमद रयान, एम. चौधरी, मेहरोब हसन, रिपॉन मोंडल, अबू हिदार रोनी, मोहम्मद इस्लाम, झेवाद अब्रार, मोहम्मद अब्दुल गफर.
सामन्याची वेळ : दु. 3 वा.