भारत-ऑस्ट्रेलिया महिलांची आज उपांत्य लढत
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
नशिबाच्या जोरावर स्पर्धेत आव्हान जिवंत असलेला यजमान भारत आज गुऊवारी येथे होणाऱ्या महिला विश्वचषक उपांत्य फेरीत बलाढ्या ऑस्ट्रेलियाविऊद्ध लढणार असून यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या आठ वर्षांपूर्वीच्या महान खेळीची आठवण करून देणाऱ्या करामतीच्या शोधात ते असतील. 2017 मध्ये इंग्लंडमधील डर्बी येथे ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या उपांत्य फेरीत कौरने केलेली 115 चेंडूंत नाबाद 171 धावांची खेळी हा एक महत्त्वाचा क्षण होता, ज्याने महिला क्रिकेटला तळटीपेवरून थेट मथळ्यांत स्थान दिले होते.
सात वेळच्या विश्वविजेत्या संघावर विजय मिळविल्यास तो भारताच्या मोहिमेला केवळ उजळवूनच टाकणार नाही, तर आयसीसीचा प्रतिष्ठेचा किताब पटकावता येईल असा विश्वासही निर्माण करेल. आजचा सामना भारताला खेळातील सर्वांत प्रभावी संघांपैकी एकाला हरवण्याची संधी देतो. विश्वचषकाचे यजमान म्हणून भार वाहताना भारताची मोहीम कठीण राहिली आहे, विशेषत: सलग तीन पराभवांनंतर संघाची परिस्थिती बिकट झाली होती. त्यातून त्यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी जोरदार संघर्ष केला. परंतु नंतर त्यांनी प्रतीका रावलच्या रूपात एक महत्त्वाची फलंदाज दुखापतीमुळे गमावली.
आता चुकांसाठी जागा नाही, कारण भारत अशा रिंगणात आहे, जेथील प्रत्येक प्रतिस्पर्ध्याने साखळी फेरीत त्यांना हरवलेले आहे. परंतु मैदानात उतरण्यापूर्वी भारताला त्यांच्या संघरचनेला बळकटी देण्याच्या बाबतीत काही प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. भारताच्या योजनांमध्ये किंवा सहा राखीव खेळाडूंमध्येही समावेश नसलेली आक्रमक फलंदाज शफाली वर्माचा समावेश खरोखरच मजबुती देऊन जाईल. परंतु उपकर्णधार स्मृती मानधनासह तिने 25 डावांमध्ये 37.20 च्या सरासरीने 893 धावा जमविलेल्या असून रावल आणि मानधनाने सलामी जोडी म्हणून 23 डावांमध्ये 78.21 च्या सरासरीने काढलेल्या 1,799 धावांपेक्षा ही कामगिरी कमी आहे. भारताने शफालीची निवड केल्यास तिची आक्रमक शैली प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणू शकते आणि मानधनाच्या समृद्ध फॉर्मला ती पूरक ठरू शकते.
पण शफालीला ठेवावे की, सहाव्या गोलंदाजाला सामावून घेण्यासाठी हरलीन देओलला सलामीच्या जागेत स्थान द्यावे हा कदाचित ड्रेसिंग रूमसमोरील सर्वांत कठीण प्रश्न असेल. हरलीनने सात सामन्यांमध्ये 75.11 च्या सरासरीने अर्धशतकाशिवाय 169 धावा केल्या आहेत, पण क्रीझवर टिकून राहण्याची तिची प्रवृत्ती भारताला वरच्या फळीला मजबुती देऊ शकते आणि दुसऱ्या टोकाकडून रावलप्रमाणे मानधनाला मोलाचा आधार देऊ शकते. अवकाळी पावसाचा अंदाज असला, तरी खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघावर स्कोअरबोर्डचा दबाव फारसा पडणार नाही.
याव्यतिरिक्त भारताने डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादवला खेळवावे का हाही प्रश्न आहे. तिने मैदानात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि बांगलादेशविऊद्ध तिच्या गोलंदाजीत अचूकता होती. विशेषत: स्नेह राणाच्या तुलनेत तिचे पारडे जड दिसते. राणाने गेल्या तीन सामन्यांमध्ये एक बळी मिळवताना 201 धावा दिल्या आहेत. फलंदाजीत मोठ्या प्रमाणात अपयशी ठरलेली कौर आठ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियावर केलेल्या हल्ल्यातून प्रेरणा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण भारताला त्यांच्या सर्वांत कठीण प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी काही तरी खास योगदान लागेल यात शंका नाही. मानधनावर बरेच काही अवलंबून असेल. तिने भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदाच्या शोधात प्रमुख भूमिका बजावली आहे, ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत.