भारत-ऑस्ट्रेलिया महिलांची पहिली वनडे आज
तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजांचा कस लागणार, वनडेतील वर्चस्व कायम राखण्यास यजमान संघ उत्सुक
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
आज गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बलाढ्या ऑस्ट्रेलियाविऊद्ध लढताना पुढील वर्षीच्या महिला विश्वचषकापूर्वी आपल्या फलंदाजीतील त्रुटी दूर करण्याचे आणि संघरचना निश्चित करण्याचे लक्ष्य भारतासमोर असेल. न्यूझीलंडविरुद्ध 2-1 ने मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियातील मैदानांत उतरणार आहे.
मात्र भारताची फलंदाजी अव्वल फॉर्ममध्ये नसल्याचे दिसून आले आले. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना भारताने फॉर्ममध्ये नसलेली सलामीवीर शफाली वर्माला संघातून वगळले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना करणे हे खूप कठीण आव्हान असेल याची पुरेपूर जाणीव आहे. भारताची ऑस्ट्रेलियातील कामगिरी निराशाजनक आहे. सोळा एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त चार त्यांना जिंकता आलेले आहेत. 2021 मध्ये झालेल्या मागील मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 असा पराभव केला होता.
या मालिकेमुळे कर्णधार कौर आणि प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करण्याची उत्तम संधी मिळेल. ऑस्ट्रेलिया गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेली नियमित कर्णधार अॅलिसा हिलीशिवाय उतरेल. याव्यतिरिक्त यजमान मार्चपासून एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत आणि त्यामुळे शैथिल्य दूर करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.
भारतासाठी स्मृती मानधना दमदार सुऊवात करण्याची जबाबदारी उचलेल. दोन एकेरी आकड्यातील धावसंख्येचा अपवाद वगळता ही दमदार सलामीवीर यंदाच्या वर्षी उत्तम फॉर्ममध्ये राहिलेली आहे. तिने गेल्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे 75 च्या प्रभावी सरासरीने 448 धावा केल्या आहे. कौरचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. तिला सातत्य राखण्यासाठी धडपडावे लागत आहे. टी-20 विश्वचषकातून भारत लवकर बाहेर पडल्यानंतर तिचे नेतृत्व आणि फलंदाजी दोन्हीविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मागील एकदिवसीय मालिकेत दुहेरी आकड्यातील धावसंख्या नोंदविण्यात अपयशी ठरल्याने तिच्यावरचा दबाव वाढेल.
जेमिमा रॉड्रिग्ज व दीप्ती शर्मा यासारख्या खेळाडूही मोठी धावसंख्या उभारण्यास उत्सुक असतील. महिला बिग बॅश लीगमध्ये मनगटाला दुखापत झालेल्या यास्तिका भाटियाची संघाला उणीव भासणार आहे. तिच्या जागी संघात घेतलेल्या युवा उमा चेत्रीला तिच्या पदार्पणाच्या वनडे मालिकेत छाप पाडण्याची इच्छा स्वाभाविकपणे असेल. हरलीन देओल, तितास साधू आणि मिन्नू मणी यांच्याप्रमाणे फटकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषही संघात परतली आहे
दीप्तीने न्यूझीलंडविऊद्ध 3.6 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली होती आणि ही कामगिरी तशीच पुढे चालू ठेवण्याची तिची इच्छा असेल. राधा यादवसाठीही किवीविरुद्धची मालिका चांगली गेली होती आणि तो फार्म येथेही ती कायम ठेवू पाहील. न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केलेली आक्रमक वेगवान गोलंदाज सायमा ठाकूरही आपल्या कामगिरीने छाप सोडण्यास उत्सुक असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची मॅकग्रा प्रथमच संपूर्ण मालिकेत राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हिलीची जागा फलंदाज पदार्पण करणाऱ्या जॉर्जिया वॉलकडे सोपविण्यात आली आहे, तर अनुभवी एलिस पेरी या मालिकेतून वनडेमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठण्याकडे लक्ष देईल. कारण ती फक्त 42 धावा दूर आहे. हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
संघ-भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, उमा चेत्री, रिचा घोष, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितस साधू, अरुधती रेड्डी, रेणुकासिंह ठाकूर, सायमा ठाकूर
ऑस्ट्रेलिया : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), अॅश्ले गार्डनर (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेरहॅम.
सामन्याची वेळ : (भारतीय वेळेनुसार) सकाळी 8.50 वा.