भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून
मालिकेची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने लढतीला महत्त्व, 2021 प्रमाणे मुसंडी मारण्याचे भारतापुढे आव्हान
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज शनिवारपासून गब्बाच्या खेळपट्टीवर खेळविण्यात येणार असून ऑस्ट्रेलियन संघाशी भारताचा सामना होईल तेव्हा रोहित शर्माची शैली आणि विराट कोहलीचा दर्जा यांची अंतिम ‘कसोटी’ लागेल. मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने ब्रिस्बेनमधील ही कसोटी मालिकेची दिशा आणि सध्याच्या जागतिक कसोटी स्पर्धेमध्ये रोहितच्या खेळाडूंचे आव्हान कायम राहील की नाही हे ठरविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
भारतासाठी ऑस्ट्रेलियाची डगमगती फलंदाजी ही सर्वांत मोठी आशा राहिली आहे. त्यामुळे ट्रॅव्हिस हेडसारखा कुणी विस्फोटक खेळी खेळला, तरच परिणाम होऊ शकतो. फलंदाजीचा फॉर्म विचारात घेतल्यास स्टीव्ह स्मिथची स्थिती सध्या कोहलीप्रमाणेच झालेली आहे. गोलंदाजीत भारताकडे जसप्रीत बुमराह असून मालिकेत इतर गोलंदाज त्याच्या तुलनेत अगदीच कमी प्रभावी दिसले आहेत. त्याला दुसऱ्या बाजूने निश्चितपणे चांगली साथ मिळण्याची गरज आहे. परंतु त्याहूनही अधिक त्याला रोहित आणि कोहली यांच्याकडून धावांची आवश्यकता आहे.
या जोडीच्या कमी होत चाललेल्या फॉर्मबद्दल टीकेची पातळी काही काळापासून वाढत चालली आहे. पूर्वी कधीही न पाहिलेला प्रतिकार 2021 मध्ये याच मैदानावर भारतीय संघाने दाखविला होता. या ठिकाणी हे दोन मेगास्टार आपली छाप उमटविण्याचा निर्धार करून निश्चितच उतरतील. त्यांची कामगिरी अलीकडे अर्थातच चांगली राहिलेली नाही. असे असले, तरी रोहित आणि कोहली हे असे दोन फलंदाज आहेत जे उसळणारा चेंडू आणि सीम मूव्हमेंट यांना पुरून उरू शकतात. त्यांच्याकडे कौशल्य आहे, परंतु फॉर्म या जोडीला मागील काही काळापासून सोडून गेला आहे.
भारताची सर्वांत मोठी समस्या म्हणजे गेल्या एका वर्षात मायदेशातील आणि बाहेरील अशा दोन्ही ठिकाणच्या सामन्यांमध्ये पहिल्या डावात 150 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्या त्यांनी सहा वेळा नोंदविली आहे आणि 2024-25 हंगामात रोहित आणि कोहलीची पहिल्या डावातील सरासरी अनुक्रमे 6.88 आणि 10 इतकी खराब आहे. कोहलीने पर्थच्या खेळपट्टीवर शतक झळकावून काही प्रमाणात दडपण दूर करण्यात यश मिळवले आहे. पण रोहितसाठी कर्णधारास साजेशी खेळी केवळ त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीच नव्हे, तर मार्ग दाखविणारा कर्णधार म्हणून त्याची छाप पाडण्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे.
हेझलवुडचे पुनरागमन, बोलँड बाहेर
पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना सामोरे जाताना हरवलेला फॉर्म पुन्हा मिळविणे सोपे नाही हे रोहित निश्चितच जाणून असेल. या कसोटीसाठी हेझलवूड परतला असून तो स्कॉट बोलँडच्या जागेवर खेळेल. रोहितचे कारकिर्दीत जरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व राहिलेले असले, तरी गब्बा येथे तो चांगली कामगिरी करू शकल्यास ते कायम आठवणीत राहील. पण त्यासाठी त्याला प्रथम फलंदाजीसाठी कुठल्या स्थानावर यायचे ते ठरवावे लागेल. तो सलामीला येणे चांगले आहे की, वरच्या फळीने संथपणे फलंदाजी केल्यास, जुन्या झालेल्या कुकाबुरा चेंडूवर हल्ला चढविण्याच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकावर येणे उपयुक्त आहे, या प्रश्नाचे उत्तर केवळ रोहितच देऊ शकतो.
दुसरीकडे, ऑफस्पिनर आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांची कामगिरी अपवादात्मक नसली, तरी स्थिर राहिली. पण भारताला फलंदाजीची ताकद वाढवायची असेल, तर रवींद्र जडेजा हा त्याच्या परदेशातील कामगिरीचा विचार करता एक सुरक्षित पर्याय आहे. वेगवान गोलंदाजीचा विचार करता आकाश दीपकडे अधिक कौशल्ये आहेत, परंतु कर्णधार रोहितला हर्षित राणा जास्त पसंत आहे असे दिसते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत त्यांची फलंदाजीही भारताप्रमाणे कमकुवत झालेली आहे. हेडचा दिवस असतो त्यावेळी तो रिषभ पंतसारखा जोरदार प्रभाव पाडून जातो. पण स्टीव्ह स्मिथचा फॉर्म चिंताजनक आहे. मार्नस लाबुशेनने अॅडलेडमध्ये अर्धशतक पूर्ण केले, परंतु अद्यापही त्याचा जुना फॉर्म दिसत नाही. नॅथन मॅकस्विनीने अॅडलेडमधील पहिल्या डावात धैर्य दाखवलेले असले, तरी त्याला संघात जम बसविण्यासाठी बराच पल्ला गाठावा लागेल.
पण ऑस्ट्रेलियाने जसप्रीत बुमराहवरील भारताचे अवलंबन चांगलेच ओळखले आहे. नवीन कुकाबुरा चेंडूवरील बुमराहचा पहिला स्पेल जास्त नुकसान न करता खेळून काढला, तर आपण इतर गोलंदाजांवर दबाव टाकू शकतो, हे यजमानांनी जाणले असल्याने या तंत्राचा ते पुन्हा उपयोग करू शकतात.
संघ : ऑस्ट्रेलिया अंतिम संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिच स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर. राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद, यश दयाल.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार पहाटे 5.50 वा.