भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी रंगतदार वळणावर
महिलांची एकमेव कसोटी, तिसरा दिवस : टीम इंडियाच्या पहिल्या डावात 406 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे स्टेडियमवर एकमेव कसोटी सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन महिला संघाने दुसऱ्या डावात खेळताना 90 षटकांत 5 बाद 233 धावा केल्या आहेत. ऑसी संघाकडे आता 46 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस अनाबेल सदरलँड 12 तर अॅश्ले गार्डनर 7 धावांवर खेळत आहेत. याआधी टीम इंडियाचा पहिला डाव 406 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाला 187 धावांची आघाडी मिळाली होती. सामन्याचे दोन दिवस बाकी असून रंगतदार अवस्थेत पोहोचललेया या कसोटीत आज चौथ्या दिवशी टीम इंडियाकडे विजयाची संधी असणार आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 219 धावांवर सर्व विकेट्स गमावल्यानंतर भारताने मात्र 406 धावांपर्यंत मजल मारली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 7 बाद 376 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पण अवघ्या 30 धावांची भर घातल्यानंतर पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 126.3 षटकांत 406 धावांवर आटोपला. भारताकडून स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज व रिचा घोष यांनी शानदार अर्धशतके झळकावली. पूजा वस्त्राकारने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्ले गार्डनरने सर्वाधिक 4 बळी घेतले तर अनाबेल सदरलँड व किम गर्थ यांनी प्रत्येकी दोन गड्यांना बाद केले. पहिल्या डावात टीम इंडियाला 187 धावांची आघाडी मिळाली
कसोटी रंगतदार वळणावर
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाज बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. सलामीवीर मुनीने 37 चेंडूत 7 चौकारासह 33 धावांचे योगदान दिले. मुनीला रिचा घोषने धावबाद केले. मात्र ती या सामन्यात ज्याप्रकारे बाद झाली, तो चर्चेचा विषय ठरला आहे. डावातील 12 व्या षटकात स्नेह राणा गोलंदाजी करण्यासाठी आली होती. पाचव्या चेंडूवर बेथ मुनी पुढे आली आणि तिने बचावात्मक फटका खेळला. यष्टीरक्षकासह गोलंदाज आणि इतर भारतीय खेळाडूंनी पायचीतचे अपील केले परंतु शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या रिचा घोषचे लक्ष फक्त क्रिजच्या पुढे आलेल्या मुनीवर होते. रिचाने वेळ न दवडता चेंडू थेट स्टंपवर फेकला आणि बेल्स उडाल्या. यानंतर पाठोपाठ फोबी लिचफिल्ड 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली.
मॅकग्राथचे अर्धशतक, पेरीची संयमी खेळी
सलामीची जोडी बाद झाल्यानंतर अनुभवी एलिस पेरीने 5 चौकारासह 45 धावांचे योगदान दिले. ताहलिया मॅकग्राने 10 चौकारासह 73 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. पेरी-ताहलिया जोडीने 84 धावांची भागीदारी केली. ही भागिदारी स्नेह राणाने तोडली. तिने पेरीला झेलबाद केले. यानंतर मॅकग्राने कर्णधार एलिसा हिलीला सोबत घेत सावध भागिदारी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने ताहलिया आणि हिलीला बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. एलिसा हिलीने 32 धावा केल्या. हरमनप्रीतने ताहलिया मॅकग्राला बोल्ड केले तर हिली पायचीत झाली. यानंतर अनाबेल सदरलँड व गार्डनर यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसअखेरीस ऑसी संघाने 90 षटकांत 5 बाद 233 धावा केल्या होत्या. भारताकडून स्नेह राणा आणि हरमनप्रीत कौर यांनी दोन दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव 219 व दुसरा डाव 90 षटकांत 5 बाद 233 (बेथ मुनी 33, एलिसा पेरी 45, मॅकग्राथ 73, सदरलँड खेळत आहे 12, गार्डनर खेळत आहे 7, हरमनप्रीत व स्नेह राणा प्रत्येकी दोन बळी).
भारत 126.3 षटकांत सर्वबाद 406
दीप्ती-पूजाची आठव्या गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी, 37 वर्षा पूर्वीचा विक्रम काढला मोडीत
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या एकमेव कसोटीतील पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर 187 धावांची आघाडी घेतली. यादरम्यान, टीम इंडियाच्या दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर या दोघींच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा या दोघांनी आठव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी साकारली. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात कसोटी सामन्यात आठव्या विकेटसाठी किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर खेळताना झालेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम मिनोती देसाई आणि शुभांगी कुलकर्णी यांच्या नावावर होता. 1986 साली इंग्लंडविरुद्ध त्यांनी आठव्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली होती.