For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत - ऑस्ट्रेलिया ‘टी-20’ मालिका आजपासून

06:58 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारत   ऑस्ट्रेलिया ‘टी 20’ मालिका आजपासून
Advertisement

कर्णधार सूर्यकुमार यादवसमोर विश्वचषकातील पराभव विसरून जबाबदारी पेलण्याचे आव्हान 

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आज गुरूवारपासून येथे सुरू होत असून त्यात सूर्यकुमार यादवला बलाढ्या ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध युवा खेळाडूंच्या चमूचे नेतृत्व सांभाळावे लागणार आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाची निराशा हृदयात दडपून टाकून त्याला या मालिकेस सामोरे जावे लागणार आहे. विश्वचषकातील पराभवाचे घाव खूप खोल आहेत आणि त्या जखमा भरून येण्यासाठी वेळ लागेल.

Advertisement

विश्वचषक संपल्यानंतर फक्त 96 तासांनी सूर्यकुमारला या मालिकेस सामोरे जावे लागत असून क्रिकेटचा आपला आवडता प्रकार खेळण्यासाठी सज्ज व्हावे लागले आहे. त्यामुळे त्याला आत्मपरीक्षणाची संधी मिळालेली नाही. संघाचा कर्णधार या नात्याने त्याला केवळ मालिका जिंकायचीच नाही, तर क्रिकेटच्या सर्वांत लहान प्रकारातील काही सर्वोत्तम युवा भारतीय खेळाडूंनाही पडताळून पाहायचे आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिकेत (वेस्ट इंडिज आणि अमेरिका) होणाऱ्या ‘टी20’ विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने त्यांची चाचणी या मालिकेत होणार आहे.

युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि फारसा तरूण नसलेला मुकेश कुमार यांनी गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु त्यांची पहिली खरी कसोटी ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाविरूद्ध लागेल, ज्यात सलामीवीर ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, लेगस्पिनर अॅडम झॅम्पा आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यासारखे त्यांचे विश्वचषकातील काही नायक समाविष्ट आहेत. त्याशिवाय मार्कस स्टॉइनिस, नॅथन एलिस, टिम डेव्हिड यांसारखे ‘आयपीएल’मध्ये खेळलेले काही खेळाडू या संघात आहेत. मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखालील हा टी-20 संघ प्रमुख वेगवान गोलंदाजांशिवाय उतरत असला, तरी निश्चितच बलवान दिसत आहे.

2022 मधील टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुल यांचा क्रिकेटच्या सर्वांत लहान प्रकारासाठी विचार केला जात नसल्यामुळे पुढील वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने राष्ट्रीय निवड समितीने निवडलेल्या खेळाडूंच्या क्षमतेची खरी कल्पना या मालिकेतून येईल. रिंकूने भारताच्या वतीने त्याच्या छोट्या कारकिर्दीत आतापर्यंत प्रभावशाली कामगिरी केली आहे. यशस्वी, तिलक आणि मुकेश यांच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे. तर जितेशने हांगझाऊमध्ये पदार्पण केलेले असले, तरी इशान किशनच्या उपस्थितीमुळे त्याला संधीची प्रतीक्षा करावी लागेल.

आशियाई क्रीडास्पर्धेत वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि काही ’ब’ दर्जाच्या संघांचा सामना केलेला असल्यामुळे या युवा खेळाडूंसाठी ही एक आगळीवेगळी चाचणी ठरेल. त्यांची या मालिकेदरम्यान आणि दक्षिण आफ्रिका (परदेशी) व अफगाणिस्तानविरुद्धच्या (मायभूमीत) मालिकांत मिळणाऱ्या संधींचा फायदा घेऊन छाप पाडण्याची इच्छा असेल. केन रिचर्डसन, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट आणि डावखुरा जेसन बेहरेनडॉर्फ यांचा समावेश असलेली ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी ही भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ज्या माऱ्याचा सामना केलेला आहे त्यांच्या तुलनेत गुणवत्तेच्या दृष्टीने खूपच चांगली आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वी आयपीएल होणार असून त्यापूर्वी 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने भारतीय खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने या युवा खेळाडूंसाठी विश्वचषकासाठीच्या संघातील आपले स्थान आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतील. अंतरिम प्रशिक्षक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण फलंदाजीची क्रमवारी कशी आखतात हे पाहणे रंजक ठरेल. कारण शुभमन गिलसारखा खेळाडू दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या मालिकेत पुनरागमन करणे निश्चित आहे. ऋतुराज गायकवाड आणि जैस्वाल किंवा इशान किशन हे सलामीला येतील अशी अपेक्षा आहे. सूर्यकुमार तिसऱ्या की चौथ्या क्रमांकावर येईल ते संघ व्यवस्थापन जैस्वाल व किशन या दोघांनाही खेळवण्याचा निर्णय घेते की नाही यावर अवलंबून राहील. एकदिवसीय संघाच्या विपरित ‘टी20’ संघात सात डावखुरे फलंदाज आहेत. या मालिकेत सर्वांत मोठी कसोटी गोलंदाजांची लागेल. रवी बिश्नोईला संधी मिळू शकते, कारण निवड समितीला यजुवेंद्र चहलच्या पलीकडे पाहायचे आहे. प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांनाही खेळवून पाहिले जाईल. दुखापतीतून सावरलेला अक्षर पटेल पाचही सामने खेळेल अशी अपेक्षा आहे.

संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर (केवळ शेवटचे दोन सामने)

ऑस्ट्रेलिया-मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

Advertisement
Tags :

.