For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना आज

06:58 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत   ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना आज
Advertisement

रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कामगिरीवर राहील लक्ष, एकदिवसीय कर्णधार या नात्याने शुभमन गिलचीही कसोटी

Advertisement

वृत्तसंस्था/ पर्थ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज रविवारी येथे होणार असून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या पुनरागमनाची या मालिकेवर जास्त छाप राहणार असली, तरी पूर्णवेळ एकदिवसीय कर्णधार म्हणून शुभमन गिलची ही पहिलीच कामगिरी असल्याने त्याकडेही सर्वांचे तितकेच लक्ष राहील.

Advertisement

मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्यानंतर कोहली आणि रोहित राष्ट्रीय संघात परतले आहेत आणि या सात महिन्यांत भारतीय क्रिकेटची गतिशीलता निश्चितपणे बदलली आहे. या काळात कोहली आणि रोहितच्या दीर्घ अनुपस्थितीत टिकून राहण्यास संघ किमान दोन स्वरूपांत शिकला आहे. आता या दोन अनुभवी फलंदाजांना संघास काय देता येईल या प्रश्नात उतरण्यापूर्वी हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, कोहली आणि रोहित हे कुठल्याही युगाचा विचार करता आणि कोणत्याही मापदंडानुसार सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजांमध्ये गणले जातील. त्यांनी या मालिकेसाठी कठोर सराव देखील केलेला आहे. रोहितने काही किलो वजन कमी केले आहे आणि कोहली लंडनमध्ये एका खासगी प्रशिक्षकासह घाम गाळत होता. पण या दोन्ही दिग्गजांसमोर  आयपीएलनंतर आलेली सुस्ती झटकून टाकण्याचे आव्हान असेल. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत ज्या संघाचा प्रभाव राहिला त्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत पुनरागमन ही त्यांच्यासाठी एक शुभ घडामोड असू शकते. ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका त्यांचे वैयक्तिक ध्येय आणि एकाच स्वरूपातील खेळाडू म्हणून ते किती पुढे जाऊ पाहतात ते दाखवून देईल. कोहलीच्या विपरित रोहितला फक्त एक वरिष्ठ खेळाडू म्हणून खेळण्याच्या त्याच्या नवीन भूमिकेशी जुळवून घ्यावे लागेल. रोहितचे मागील टी-20 आणि एकदिवसीय सामने संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर विजयोत्सवानिशी संपले होते आणि मेलबर्नमध्ये मागील कसोटी तो जेव्हा खेळला तेव्हाही तो संघाचे नेतृत्व करत होता.

जर कोहली नेहमीप्रमाणे उत्कृष्ट खेळी करू शकला आणि रोहितने  वरच्या फळीत जबरदस्त फटकेबाजी केली, तर हे दोन्ही दिग्गज दीर्घकाळ टिकून राहण्याची आशा करू शकतात. या मालिकेत मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे पुन्हा एकदा ‘रो-को’ जोडीला आळा घालण्याचा प्रयत्न करतील तेव्हा मैदानावरील जुने वैर पुन्हा जिवंत होताना दिसेल आणि ते पाहणे रंजक ठरेल. या प्रसिद्ध क्रिकेटपटूंना हे स्पष्टपणे माहित असेल की, त्यांच्याकडे आता नेतृत्वाची भूमिका किंवा भरपूर वेळही नाही. कारण निवड समितीला आणि संघ व्यवस्थापनाला भविष्य लक्षात घेऊन, विशेषत: 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेताना कोणताही पश्चात्ताप होणार नाही.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही तसेच संकेत दिले आहेत. रोहित आणि कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघाचा भाग आहेत. त्यांची चाचणी चाललेली नाही. एकदा त्यांनी खेळायला सुऊवात केली की, मग तुम्ही मूल्यांकन करा. पण आमच्याकडे काही कल्पना आहेत, असे आगरकर ’एनडीटीव्ही वर्ल्ड समिट’दरम्यान म्हणाले होते. गिलकडूनही भविष्याला आकार दिला जाण्याची अपेक्षा आहे. पण त्याच्यावर नेहमीच कोहली आणि रोहितच्या कारकिर्दीचे सावट असेल. या 26 वर्षीय खेळाडूने इंग्लंडविऊद्धच्या मालिकेत फलंदाज म्हणून कोहलीच्या वारशाचे पालन करण्यास तो सक्षम आहे हे आधीच दाखवून दिले आहे. आता गिलला एकदिवसीय कर्णधार म्हणून रोहितने केलेल्या कामगिरीचा स्तर गाठावा लागेल.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताची विजयाची सरासरी 75 टक्के राहिली. देशाच्या एकदिवसीय इतिहासातील ती सर्वोच्च आहे. गिलला आवडो किंवा न आवडो, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितच्या कामगिरीशी तुलना करून गिलचे मूल्यांकन केले जाईल आणि मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया त्याच्यासमोर प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीतही एक कठीण आव्हान उभे करेल. जर तो या परीक्षेत यशस्वी होऊ शकला, तर कर्णधार म्हणून त्याच्या आत्मविश्वासासाठी ते खूप चांगले ठरेल.

व्यवस्थापन यशस्वी सलामीवीर रोहित आणि गिल यांच्या जोडीला तोडेल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वालला राखीव पर्याय म्हणून ठेवण्यात येईल. याचा अर्थ कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि त्याच्या मागे श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल येतील. राहुल यष्टिरक्षक या नात्याने दुहेरी भूमिका बजावेल. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या संघाचा भाग नसल्याने नितीशकुमार रे•ाrला अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत त्याचा पहिला एकदिवसीय सामना खेळायला मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना साहाय्यकाच्या भूमितकेतील वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी हर्षित राणा व प्रसिद्ध कृष्णा यांच्यात स्पर्धा असेल. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी विभागाची धुरा सांभाळू शकतात. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाला आशा असेल की, कूपर कॉनोली, मार्नस लाबुशेन, मॅथ्यू रेनशॉ इत्यादी खेळाडू मार्शला पुरेशी साथ देतील. त्याशिवाय भारताला सदैव सतावणारा ट्रॅव्हिस हेड आहेच.

संघ-भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, के. एल. राहुल, नितीशकुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वा.

Advertisement
Tags :

.