कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-आसियान : नव्या विश्वाचा भक्कम आधार

06:02 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे भारत-आसियान शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे अध्यक्षपद मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी भूषविले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेले अभिभाषण म्हणजे आसियान शिखर परिषदेच्या भावी संपन्नतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हटले पाहिजे. आगामी शतक हे भारत-आसियान ऐक्याचे शतक आहे आणि भारत-आसियान यांचे ऐक्य म्हणजे भविष्यकाळात वैश्विक सामर्थ्याचा भक्कम आधार बनणार आहे, असे भाकीत करून पंतप्रधानांनी भू-राजनैतिक दृष्टीने भारत आसियान सामर्थ्याचा नवा सिद्धांत मांडला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थ लोकसंख्या ही आसियान प्रदेशात राहते आणि आसियान देशांनी परस्परांशी व्यापार-उदीम आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण भक्कमपणे केल्यास जगाच्या आर्थिक समृद्धीमध्ये आसियान देश महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असेही सूतोवाच त्यांनी केले. पंतप्रधानांचे हे भाषण म्हणजे नव्या युगाची नांदी ठरले आहे.

Advertisement

हिंद प्रशांत क्षेत्राचे महत्त्व

मुक्त आणि स्वतंत्र हिंद प्रशांत क्षेत्र हे जागतिक सत्ता समतोलासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. विशेषत: वर्तमान जगातील दोलायमान आणि अस्थिर अशा आर्थिक परिस्थितीमध्ये जगाला शांतता व स्थैर्य प्रदान करण्याचे कार्य आसियान राष्ट्र करू शकतात, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. आसियान राष्ट्रांमध्ये अकरा देशांचा समावेश होतो. विशेषत: यावर्षी तिमोर या एका नव्या सदस्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आसियान परिषदेच्या निमित्ताने मलेशियात क्वालालंपूर येथे होणाऱ्या विचारमंथनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हजेरी लावल्यामुळे या परिषदेतील चर्चा व विचारमंथनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

भू-राजेनैतिक दृष्टीने विचार करता दक्षिण आसियातील आणि विशेष करून आग्नेय आशियातील शांतता व स्थैर्याच्या दृष्टीने आसियान राष्ट्रांचा परस्पर समन्वय आणि सुसंवादित्व अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. विशेषत: भारताच्या

अॅक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे प्रभावशाली कृती करा, या धोरणामुळे भारताने आसियान राष्ट्रांना त्यांच्या विकासकार्यात आणि तेथील आपत्तीच्या प्रसंगी विशेषत्वाने मदत केली आहे आणि पुढेही भारत एक थोरला भाऊ या नात्याने या राष्ट्रांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. 21 वे शतक हे भारत आणि आसियान यांच्या प्रभुत्वाचे शतक असणार आहे, याची ग्वाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिली आहे.

भक्कम सांस्कृतिक संबंध

प्राचीन काळापासून भारत आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांमध्ये भक्कम सांस्कृतिक संबंधांचा सुवर्णबंध आहे. ऋषी कौंडिण्य यांनी समुद्र पर्यटन करून सुवर्णभूमीत पाऊल ठेवले. तेथील राजकन्येशी विवाह केला. पुढे दक्षिणेकडील हिंदू साम्राज्याने तेथे श्रीविजय घराण्याची स्थापना केली आणि मलायाची सुवर्णभूमी ही भारतीय संस्कृतीच्या विलक्षण प्रभावामुळे झपाटली गेली. त्यानंतर कंबुज ऋषींनी कंबोडिया या देशात पाऊल ठेवले. त्यांचे नाव कंबोडियाचा अविभाज्य भाग बनले आहे. आग्नेय आशियाई देशातील भारतीय शिल्पकला, स्थापत्य तसेच बौद्ध परंपरांचा विलक्षण प्रभाव पाहता आशियान देशांशी असलेले भारताचे सांस्कृतिक संबंध आता नव्याने दृढ होत आहेत. कला, स्थापत्य आणि भारतीय शिल्पकलेचा अनुपम असा ठेवा या देशाने जपला आहे. त्यामुळे भारत-आसियान देशांमध्ये पर्यटन प्रक्रियेला मोठी गती प्राप्त झाली आहे. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आग्नेय आशियाई देशांतील सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी भारताने विशेष पुढाकार घेतला, तेव्हापासून भारतीय पर्यटकांची संख्या या देशांना भेट देण्यासाठी सातत्याने वाढत आहे. कोडेस या फ्रेंच पुरातत्त्वज्ञाने आग्नेय आशियाच्या प्राचीन इतिहासाचे वर्णन भारतीयकरण या शब्दात केले आहे. त्यांच्या मते प्राचीन काळात चीनपेक्षा भारताचा आग्नेय आशियावर अधिक ठसा होता आणि वर्तमान भू-राजनैतिक परिस्थितीचा विचार करता आजही चीनपेक्षा या देशांशी भारताचे संबंध अधिक सक्रिय आणि तेवढेच रचनात्मक स्वरूपाचे आहेत.

सहकार्याची नवी क्षेत्रे

भारत-आसियान राष्ट्रांमध्ये संस्कृती, पर्यटन तसेच विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण इत्यादी अनेक क्षेत्रांत सहकार्याची नवीन दालने विकसित होत आहेत. आसियान राष्ट्रांना केंद्रबिंदू मानून भारत मजबूत भागीदारी विकसित करत आहे. सर्वसमावेशक शाश्वतता हे यावर्षीच्या आसियान परिषदेचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार भारत पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि साधनसामग्रीच्या न्याय्य, उचित वापरासाठी सदैव सहकार्याचा हात पुढे करत आहे. सर्व संकटांच्या प्रसंगी भारत आसियान राष्ट्रांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. सागर सुरक्षा आणि नील व्यापार क्षेत्रांमध्ये या राष्ट्रांचे सहकार्य मोठे आहे. 2026 हे वर्ष सागरी सहकार्याचे नवे वर्ष म्हणून पुढे येत आहे. आरोग्य, हरित ऊर्जा आणि पर्यावरण रक्षण या शिक्षण, संशोधन अशा अनेक क्षेत्रांत भारत-आसियान पुढे वाटचाल करत आहेत. आसियान विकास दृष्टी 2045 आणि विकसित भारत 2047 उभयतांची स्वप्ने समसमान आहेत. प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत लोकसंपर्क हा भारत-आसियान संबंधांचा आत्मा आहे. भविष्यकाळात संपूर्ण मानव समुदायासाठी संपन्न उज्वल कालखंडाची निर्मिती करणे, हे उभयतांचे समान स्वप्न आहे. प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी भारत व आसियान देश दमदार वाटचाल करत आहेत.

भावी आव्हाने कोणती?

आसियान देश मुक्त व्यापार कराराचा विचार करता भारताला किती लाभप्रत आहेत, याचा अधिक समतोल दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. कारण अजूनही भारताचा या देशांशी असलेला व्यापार समतोल आपणास साध्य करावयाचा आहे. या सर्व देशांतून चीन आपल्या वस्तू भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचे मागल्या दाराचे तंत्र वापरत आहे. त्यावर अंकुश कसा ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे. इतर पाश्चात्य राष्ट्रांशी व्यापार करण्याऐवजी आग्नेय आशियाई देशांनी भारताशी विविध व्यापार संधींचा लाभ सकारात्मक दृष्टीने घेतला तर सध्याच्या दोलायमान जागतिक परिस्थितीत भारत व आसियान देश परस्परपूरक कार्य करू शकतात. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आसियान परिषदेच्या निमित्ताने विविध राष्ट्रप्रमुखांशी केलेली चर्चा ही सुद्धा फलदायी ठरली आहे. त्यांनी हिंद प्रशांत क्षेत्रातील समस्यांबाबत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या नेत्यांशी सुद्धा समर्पक चर्चा केली आहे. त्यांनी अमेरिकेच्या धुर्त व मतलबी राजकारणापासून आसियान राष्ट्रांना सावध केले आहे. दहशतवाद हा या देशांतील लोकशाहीसाठी समान शत्रू आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. आपण कंबोडिया व थायलंडमधील संघर्ष थांबविला, हा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे. शिवाय त्यांनी अनेक आसियान राष्ट्रांबरोबर करार-मदारही केले आहेत. साधनसामग्रीच्या दृष्टीने हे जरी लाभाप्रत असले तरी बड्या राष्ट्रांच्या मतलबी प्रभुत्वामुळे अनेक प्रश्न उभे राहतात, ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे.

मौलिक संदेश काय?

22 व्या भारत-आसियान शिखर परिषदेचा मौलिक संदेश काय असेल तर उद्याच्या जगाचे सामर्थ्य आसियानमध्ये आहे. त्यासाठी भारत व आसियान राष्ट्रांनी एकत्र येऊन सर्वसमावेशक शाश्वत विकासासाठी संकल्प केला आहे. 1992 यावर्षी या संघटनेची स्थापना झाली, तेव्हापासून हे सदस्य देश आजपर्यंत सामायिक लोकशाही मूल्ये आणि सामुदायिक विकास निकषांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक धोरणात्मक वचनबद्धतेच्या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

भारत-मलेशिया सहकार्याप्रमाणेच आसियान देशांनी क्वालालंपूर येथे प्रकाशित केलेल्या संयुक्त निवेदनात 15 कलमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पर्यटन सांस्कृतिक आदान-प्रदान तसेच शाश्वत पर्यावरण, आर्थिक गुंतवणुकीस चालना, व्यापार-उदीम यावर भर देण्यात आला आहे. पर्यटनाप्रमाणेच डिजिटल तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान तसेच सामाजिक, सांस्कृतिक शाश्वतता, पर्यावरण संतुलन, प्रदूषण नियंत्रण, आर्थिक विकासातील आदान-प्रदान आणि शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न यांवर भर देण्यात आला आहे.

विशेषत: पर्यटनवृद्धी, सामाजिक-सांस्कृतिक शाश्वतता तसेच आर्थिक सहकार्याची नवी क्षेत्रे, माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, पायाभूत संस्थात्मक विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. अशा प्रकारे भारत-आसियान सर्वांगीण सहकार्यावर भर देणारी ही शिखर परिषद अनेक दृष्टीने निर्णायक व दिशादर्शक ठरली आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article