भारत अ ची विजयी सलामी
वृत्तसंस्था / मस्कत
येथे सुरू झालेल्या विश्वचषक सांघिक स्नूकर स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारत अ संघाने ओमान अ संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र भारत ब संघाला पहिल्याच सामन्यात बलाढ्या फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला
फ गटातील पहिल्याच सामन्यात भारत अ संघातील पंकज अडवाणीने ओमान अ संघाच्या ओमर सुलतानाचा 80-4 असा पराभव केला. भारत अ संघातील आणखी एक अव्वल स्नूकरपटू आदित्य मेहताने ओमान अ च्या अहमद अलखुसाईबीचा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिसऱ्या लढतीत पंजक अडवाणी आणि ब्रिजेश दमणी यांनी ओमान अ च्या सुलतान व अलखुसाईबी यांचा 62-20 असा पराभव करत ओमानचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.
अ गटातील झालेल्या एका लढतीमध्ये फ्रान्सने भारत ब चा पराभव करत विजयी सलामी दिली. भारत ब गटामध्ये धिवज हरीया आणि नवोदित हुसेन खान यांना फ्रान्सच्या बेझीन आणि मॉर्टेक्स यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यामध्ये भारत ब संघातील हरीयाने फ्रान्सच्या बेझिनचा 134-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या मॉर्टिक्सने हुसेन खानचे आव्हान 71-10 असे संपुष्टात आणले. दुहेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या बेझिंग आणि मॉर्टेझ यांनी भारत ब संघातील जोडीचा पराभव करत फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दरम्यान शेवटच्या सामन्यात फ्रान्सच्या मॉर्टेक्सने हरियाचा 79-49 असा पराभव करत भारत ब चे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले.