भारत - पाकिस्तान आज पुन्हा भिडणार
सूर्यकुमार यादवचा संघ पुन्हा वर्चस्व गाजविण्यास सिद्ध, अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीविषयी थोडी चिंता
प्रतिनिधी/ दुबई
दुबई येथे आज रविवारी होणाऱ्या आशिया चषकातील सुपर 4 च्या तीव्र आणि तणावपूर्ण सामन्यात पाकिस्तानवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजविण्यासाठी भारत सज्ज होत असताना कर्णधार सूर्यकुमार यादव त्यासाठी त्याच्या फिरकी गोलंदाजांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमध्ये यापूर्वी अनेकदा तणावपूर्ण परिस्थिती दिसलेली आहे. परंतु गेल्या रविवारी सूर्यकुमार आणि त्याच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन न करण्याच्या निर्णयानंतर वादळ निर्माण झालेले असले, तरी या सामन्यावेळी नेहमीसारखा तणाव दिसून आला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ या रविवारीही शेजाऱ्यांविऊद्धचे ते धोरण कायम ठेवण्याची शक्यता आहे आणि हस्तांदोलन हे महत्त्वाचे राहणार नसले, तरी पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांचे समर्थक या सामन्याकडे उट्टे काढण्याची संधी म्हणून पाहत आहेत. रविवार हा नेहमीच सर्वांत आरामदायी दिवस नसतो आणि मागील सामन्यात सात गडी राखून विजय मिळविताना भारताने केलेल्या लक्ष्याच्या पाठलागात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या कर्णधार सूर्यकुमारला त्याची अनुभूती येईल. या स्पर्धेत सूर्यकुमारकडून सर्वोत्तम फलंदाज, रणनीतीच्या दृष्टीने प्रतिभाशाली कर्णधार आणि देशाचा सक्षम प्रतिनिधी ठरण्याची अपेक्षा आहे.
ओमानविऊद्ध झेल घेण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेलच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे तो आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर थोडे चिंतेत असतील. पण क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी चिंता कमी करताना हा अष्टपैलू खेळाडू ठीक असल्याचे आपल्याला वाटते, असे म्हटले आहे. पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यापूर्वी सूर्या संघातील सर्व महत्त्वाच्या खेळाडूंची तंदुरुस्ती तपासून पाहण्याची इच्छा बाळगेल आणि हे स्पष्ट आहे की, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या आणि फारशा माहित नसलेल्या ओमानच्या 43 वर्षीय आमिर कलीम आणि हम्माद मिर्झा या फलंदाजांनी या लयीत नसलेल्या जोडीला चांगलेच झोडपून काढले.
तथापि, रविवारी जसप्रीत बुमराह पाहायला मिळेल आणि वऊण चक्रवर्तीसह संघातील त्याची उपस्थिती सहकाऱ्यांचा उत्साह वाढवून जाईल. दोघांनाही मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील खेळपट्टी संथ गोलंदाजांना मदत करत आलेली आहे आणि पुन्हा एकदा कुलदीप यादव (स्पर्धेत आतापर्यंत आठ बळी), अक्षर आणि वऊण यांच्यावर भारताच्या बाजूने निर्णायक भूमिका बजावण्याची जबाबदारी असेल. जर अक्षर तंदुरुस्त नसल्याचे आढळले, तर वॉशिंग्टन सुंदर किंवा रियान परागला त्याच्या जागी खेळविण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
पाकिस्तान संघ अनिश्चिततेने घेरलेला असून सध्याच्या संघात आश्चर्यकारकपणे गुणवत्तेचा अभाव आहे. विशेषत: फलंदाजी विभागात हा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे, जिथे कोणताही खेळाडू फिरकी गोलंदाजांचा मारा नीट ओळखू शकलेला नाही. गेल्या काही वर्षांत जावेद मियांदाद, इंझमाम उल हक, सलीम मलिक आणि इजाज अहमदसारखे खेळाडू निर्माण करणाऱ्या देशाच्या दृष्टीने सध्याचे संघाचे तंत्र खूपच खराब आहे. सलग दोन वेळा शून्यावर बाद झालेला डावखुरा सलामीवीर सैम अयूब हा फलंदाजीऐवजी गोलंदाजीत अधिक प्रभाव पाडल्याने उपहासाचा विषय बनला आहे. ‘सैम अयुबला सईद अन्वर बनण्याची महत्त्वाकांक्षा होती, पण तो सईद अजमलमध्ये बदलत आहे’, असे या स्पेशलिस्ट ओपनरवर विनोद केले जात आहे. कारण त्याने स्पर्धेत धावांपेक्षा जास्त बळी घेतले आहेत.
साहिबजादा फरहान आणि हसन नवाज हे दोन फलंदाज अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सर्वांना आश्चर्य वाटेल, पण फक्त शाहीन शाह आफ्रिदी हा संघातील सर्वोत्तम फलंदाज असल्यागत चित्र दिसत आहे. सध्या असे दोनच खेळाडू आहेत जे त्यांना लढण्याच्या दृष्टीने मदत करू शकतात. त्यापैकी फखर जमान हा संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि शाहीन हा अभिषेक शर्माविऊद्ध अधिक चांगला पहिला स्पेल टाकण्याची इच्छा बाळगून असेल. भारताविऊद्धच्या मागील सामन्यात पाकिस्तानने डावखुरा गोलंदाज सुफियान मुकीमला तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळवले होते, तर आज रविवारी वेगवान गोलंदाज हरिस रौफला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्याने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात यूएईविऊद्ध प्रभावी कामगिरी केलेली आहे.
संजू सॅमसनने ओमानविऊद्ध अर्धशतक झळकावले, परंतु फलंदाज शुभमन गिल लवकर बाद झाला, तरी तो पाकिस्तानविऊद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याची शक्यता कमी आहे. कर्णधार सूर्यकुमार पुन्हा एकदा त्याच्या नेहमीच्या स्थानावर परतेल. जर अभिषेक पॉवरप्लेमध्ये बाद झाला, तर डावखुरा तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. भारताला गिलकडून धावा आणि हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्याकडून दर्जेदार फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालेली नाही. परंतु पाकिस्तानी गोलंदाजांना सहज तोंड देण्याच्या दृष्टीने भारताच्या पहिल्या चार फलंदाजांवर विश्वास ठेवता येईल.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वऊण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंग, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
पाकिस्तान : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयूब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.