For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत आणि इंधन तेल

06:31 AM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत आणि इंधन तेल
Advertisement

इंधन तेल हे आधुनिक अर्थव्यवस्थेचे रक्त आहे. ज्याप्रमाणे रक्ताशिवाय शरीर चालत नाही, त्याचप्रमाणे या तेलरुपी रक्ताशिवाय अर्थव्यवस्थेचे शरीर चालणे अशक्य असते. याचे कारण असे, की, आजची अर्थव्यवस्था ही वाहतुकीवर अवलंबून आहे आणि जगातील 95 टक्क्यांहून अधिक वाहतूक ही इंधन तेलावर, अर्थात डिझेल किंवा पेट्रोलवर अवलंबून आहे. वाहतुकीसाठीचे सर्वात सोयीस्कर इंधन आज तेल हेच आहे. वाहतूक वीजेवरही केली जाऊ शकते. तथापि, वीज ही तेलाइतकी सोयीची नाही. हे इंधन तेल भूमीच्या गर्भात सापडते. त्याला अश्मीभूत तेल किंवा फॉसिल ऑईल असे म्हणतात. या तेलाला पर्याय शोधून काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. पण आजवर तरी इतका सोयीचा पर्याय शोधला गेलेला नाही. तसा शोध लागेपर्यंत हे खनिज तेलच अर्थव्यवस्थेचा तारणहार म्हणून मिरविणार आहे. भारतात या भूगर्भीय इंधन तेलाचे साठे अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे भारताला तेलाची आयात करावी लागते. त्यासाठी पाण्यासारखा पैसा, तोही डॉलर्सच्या स्वरुपात खर्च करावा लागतो. पण या स्थितीत आता सुधारणा होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे. कारण भारतात अनेक स्थानी खनिज तेलाचे साठे सापडण्यास प्रारंभ झाला आहे. भारतभूमी या तेलाच्या संदर्भात अगदीच काही कोरडी नाही, हे आनंददायक चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. याच  पार्श्वभूमीवर, भारत आणि इंधन तेल यांचा घेतलेला हा संक्षित आढावा...

Advertisement

थोडा इतिहास...

ड भारतात प्रथम तेलाचा शोध आसाममध्ये लागला. आसाममधील दिग्बोई येथे 1889 मध्ये प्रथम तेल विहीर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले. ते 1890 पर्यंत पूर्ण होऊन या विहिरीतून व्यापारी तत्वावर तेल बाहेर पडू लागले. ही विहीर आसाम रेल्वेज अँड ट्रेडिंग कंपनी या ब्रिटीश कंपनीने खोदली होती.

Advertisement

ड या प्रथम विहिरीनंतर म्हणाव्या तशा गतीने भारतात तेल सापडले नाही. स्वातंत्र्यानंतर पुन्हा तेलाचा शोध घेण्याचे अभियान हाती घेण्यात आले. तेव्हा मुंबई नजीकच्या समुद्रात बऱ्यापैकी मोठे तेलसाठे गवसले. ‘बाँबे हाय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रातून आजही तेल आणि नैसर्गिक वायू काढला जातो.

ड 1960 च्या आसपास भारतातील खासगी तेल कंपन्यांचे राष्ट्रीकरण करण्यात आले. तसेच नंतरच्या काळात ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) ही संस्था स्थापन झाली. या संस्थेने तेल संशोधनाचे कार्य चालू ठेवले. तथापि, म्हणावे तसे यश मिळाले नाही. ही संस्था विदेशातही तेलसंशोधन करते.

ड राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमालयातील तराई क्षेत्र, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आदी क्षेत्रांमध्ये तेलाचे साठे आहेत, ही माहिती पूर्वीपासून होती. तथापि, हे तेल शोधण्यासाठी बराच खर्च येणार होता. तसेच तेल सापडले तरी ते बाहेर काढण्यासाठी त्याहीपेक्षा अधिक खर्च होता. त्यामुळे प्रयत्न तोकडे पडले.

इच्छाशक्तीचा अभाव

ड भारताच्या भूमीवर किंवा भारताचे कार्यक्षेत्र असलेल्या समुद्री भागांमध्ये तेल ओसंडून वाहते आहे, अशी स्थिती नाही. तथापि, ज्या प्रमाणात ते आहे, ते शोधण्यासाठी आणि उपसण्यासाठी धोरणात्मक आणि राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. तिचा अभाव मध्यल्या पाच दशकांमध्ये होता. त्यामुळे तेलाच्या आयातीवरच भर देण्यात आला. यामुळे भारताचे इंधन क्षेत्रातील परावलंबित्व वाढीस लागले. प्रारंभी जागतिक बाजारात स्वस्तात तेल उपलब्ध होते. त्यामुळे देशात ते शोधण्यासाठी खर्च करण्यापेक्षा बाहेरुन घेतलेले बरे, असा विचार करण्यात आला. पण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर भडकू लागले, तसे या परावलंबित्वाचे असहनीय चटके बसू लागले आहेत. मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीची भर त्यात पाडून तेलाचे दर आणखीनच भडकल्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडू लागला.

नव्या जोमाने शोधकार्य

ड 2014 मध्ये देशात सत्तांतर होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार स्थानापन्न झाले. या सरकारचे धोरण ‘आत्मनिर्भरता’ हे असल्याने ऊर्जा आणि इंधनाच्या क्षेत्रातही देश स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झाला पाहिजे, हा विचार राजकीय क्षेत्रात पुन्हा बळकट होऊ लागला. त्यामुळे देशाची भूमी आणि देशाची सागरी सीमा यांच्यात तेलाचा शोध नव्याने घेतला जाऊ लागला आहे.

ड त्यापूर्वीच्या सरकारांच्या काळातही तेलाच्या शोधाचे प्रयत्न अगदीच बंद पडले होते, अशी स्थिती नव्हती. भारतातच नव्हे, तर ओव्हरसीज ऑईल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून इतर देशांमध्येही तेल शोधकार्याची आणि उत्खननाची कंत्राटे मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता. पण चीनने भारतापेक्षा मोठी आघाडी आर्थिक बळाच्या जोरावर मिळविल्याने भारताची पिछेहाट झाली होती.

काही प्रमाणात यश...

ड 2014 पासून नव्या जोमाने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. नवी तेलक्षेत्रे आढळून येत आहेत. जुन्या तेलक्षेत्रांमध्ये नव्याने खोदलेल्या विहिरींनाही तेल लागताना दिसत आहे. त्यामुळे भारताचा उत्साह वाढला आहे. विशेषत: मुंबईच्या सागरातील तेल कमी होत असताना, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि अंदमानचा सागर येथे नवे अधिक मोठे तेलसाठे सापडल्याने आशेला नवी पालवी फुटल्याचे दिसून येत आहे.

अंदमानचा जॅकपॉट

ड नुकताच अंदमान येथे सागर क्षेत्रात भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा तेलसाठा गवसल्याचे वृत्त आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही घोषणा करताना, येथे गयाना येथे सापडलेल्या तेल साठ्याइतका मोठा साठा सापडल्याची माहिती दिली. येथे 2 लाख कोटी लिटर पेट्रोलियम किंवा खनिज तेल हाती लागू शकते. याची आजच्या बाजारभावाने किंमत साधारणत: दीड कोटी कोटी रुपये, अर्थात, भारताच्या यंदाच्या अर्थसंकल्पाच्या आकाराच्या तिप्पट तेल मिळू शकेल, अशी स्थिती दिसून येते. इतकेच नव्हे. तर अंदमानच्या सागर क्षेत्रातील 3 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात तेल असण्याची शक्यता असून अनेक ‘गयाना’ मावतील इतके विस्तृत हे तेलक्षेत्र असू शकते, अशीही माहिती त्यांनी दिल्याने एक नवी सनसनाटी निर्माण झाली असून तो चर्चेचा विषय झाला आहे.

अन्यत्रही तेललक्ष्मीच्या पाऊलखुणा...

ड अंदमानच नव्हे, तर भारतात अन्यत्रही तेलाची चिन्हे दिसू लागली आहेत. उत्तर प्रदेशच्या बलिया क्षेत्रातील 3 हजार 500 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तेल सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या भागातही तेल सापडण्याची शक्यता बळावली असून तेथे आतापर्यंत काही तेलविहिरी खोदल्या गेल्या आहेत. त्यांच्यात तेल मिळालेही आहे.

ड राजस्थानच्या वाळवंटी भागात तेल आहे, हे साठ वर्षांपूर्वीपासूनच ज्ञात होते. आता तेथे नव्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यांना यश मिळताना दिसते. राजस्थानातही जवळपास दीड हजार चौरस किलोमीटरचे तेलक्षेत्र असू शकते, असे तज्ञांचे मत आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे नेमके किती तेल आहे, हे अद्याप स्पष्ट नसले तरी, ते अगदीच कमी नाही, असे संशोधक म्हणतात.

शोधकार्य नाही सोपे

ड भूमीखाली किंवा सागरतळाखाली तेल शोधणे हे सोपे काम नाही. अनेक संभाव्य स्थानी खोदून पहावे लागते. निश्चितपणे ते कोठे सापडेल, हे वरुन समजत नाही. उपग्रहीय तंत्रज्ञानही तेथे तोकडेच पडते. त्यामुळे प्रत्यक्ष ‘ड्रीलींग’ करणे हाच उपाय असतो. खोदलेल्या प्रत्येक विहिरीला तेल लागलेच असे नाही. 100 विहिरी खोदल्या जातात, तेव्हा 15 विहिरींना तेल लागते, असे जागतिक प्रमाण असल्याची अनधिकृत माहिती मिळते. केवळ तेल लागून चालत नाही. ते पुरेसे असावे लागते. तरच केलेली गुंतवणूक लाभदायक ठरते. अन्यथा पैसे अक्कलखाती जमा होतात.

ड तेलाच्या खाणी जमिनीच्या किंवा सागर तळाच्या खाली 3 ते 4 हजार मीटर्सवर (तीन ते चार किलोमीटर) असतात. तेथपर्यंत ड्रीलींग करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. हे तंत्रज्ञान फारच कमी देशांकडे आहे. भारताच्या सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांनी ते विकसित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक तेलविहीर खोदण्यास 40 लाख डॉलर्स (साधारणत: 35 कोटी रुपये) खर्च येतो. त्यामुळे खोदलेल्या विहिरी, त्यांच्यापैकी तेल लागलेल्या विहिरी इत्यादी खर्च लक्षात घेता तेल लागलेल्या एका विहिरीतून किमान 350 कोटी रुपयांचे तेल सापडावे लागते.

खासगी कंपन्यांना मुक्तद्वार...

ड तेल संशोधनासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि अवाढव्य खर्च पाहता, केवळ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर विसंबून न राहण्याचा योग्य निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 10 वर्षांपूवीच घेतला आहे. परिणामी, अनेक खासगी कंपन्या आज या क्षेत्रात आहेत. त्यामुळे शोधकार्य आणि मिळणारे यश यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. 2014 पर्यंत खासगी क्षेत्राला तेल संशोधनात विशेष प्रवेश नव्हता. नैसर्गिक वायू क्षेत्रातही मोजक्याच खासगी कंपन्या होत्या. आता ही स्थिती न राहिल्याने झपाट्याने संशोधन केले जात आहे.

ड सध्या भारताच्या तेलसंशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या महत्वाच्या खासगी कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत...

  1. रिलायन्स इंडस्ट्रीज - ही कंपनी गेल्या पन्नास वर्षांपासून तेलक्षेत्रात आहे. या क्षेत्रात गुंतवणूक केलेली ही भारतातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. ती तेलविहिरी खोदणे आणि तेल शुद्धीकरण या दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

ड नायारा एनर्जी - पूर्वी एस्सार ऑईल नावाने ओळखली जाणारी ही कंपनी तेलशुद्धीकरण क्षेत्रातली भारतातील सर्वात मोठी खासगी कंपनी मानली जाते. ही कंपनी रोसनेफ्ट, ट्राफिगुरा आणि युसीपी यांच्यासह या क्षेत्रात कार्यरत आहे.

ड वेदांना इंडस्ट्रीज - पूर्वी ही कंपनी केर्न इंडिया या नावाने ओळखली जात होती. ही कंपनी राजस्थानातील तेल संशोधन आणि तेलाचा तसेच नैसर्गिक वायूचा उपसा करण्यात कार्यरत असून अलिकडे तिला मोठे यश मिळाले आहे.

ड दीप इंडस्ट्रीज - ही कंपनी तेलविहिरींचे ड्रीलींग, तेल क्षेत्रासाठी उपयुक्त सेवा पुरविणे, वर्कओव्हर, तेलकर्मचारी प्रशिक्षण, तेलक्षेत्रांचे सर्वेक्षण करणे. उपकरणे निर्माण करणे आणि कन्सल्टेशन आदी क्षेत्रांमध्ये 10 वर्ष कार्यरत आहे.

ड हिंदुस्थान ऑईल एक्स्प्लोरेशन कॉर्पेरेशन - तेल आणि नैसर्गिक वायू संशोधन आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. विषेशत: ही कंपनी कमी क्षमतेच्या तेलविहिरी दुय्यम क्षेत्रांमध्ये शोधण्याच्या कार्यात व्यग्र आहे.

ड सेलन एक्स्प्लोरेशन टेक्नॉलॉजी - ही कंपनी विशेषत्वाने गुजरात भागात तेल आणि नैसर्गिक वायू संशोधनाच्या कामात मग्न आहे. तेल उत्पादनाचे तंत्रज्ञानही या कंपनीकडे आहे. या कंपनीला गुजरात भागात स्पृहणीय यश आले आहे.

ड इतर खासगी कंपन्या - टाटा पेट्रोडाईन, शेल आंतरराष्ट्रीय कंपनी, एबीआर पेट्रोप्रॉडक्टस् लिमिटेड, एएनझेड ऑईलफिल्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अलकेमी गॅसेस अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड अशा काही कंपन्याही आहेत.

अर्थव्यवस्था वीस ट्रिलियन डॉलरची?

ड भारताच्या सर्व संभाव्य तेलक्षेत्रांमध्ये यश मिळाले, तर भारत पेट्रोल आणि डिझेल उत्पादनात आत्मनिर्भर होईल, हे निश्चित आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी तेलाच्या जोरावर भारत 20 ट्रिलियन डॉलर्स किंवा 20 लाख कोटी डॉलर्स (18 कोटी कोटी रुपये) इतकी मोठी, अर्थात सध्याच्या चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठी अर्थव्यवसा होईल, असे महत्वाकांक्षी भाकित केले आहे.

ड तथापि, हे होण्यासाठी भारतात आणखी मोठे तेलसाठे सापडण्याची आवश्यकता आहे. तसेच तेलाप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, यंत्रसामग्री, कृषी इत्यादी क्षेत्रांमध्येही भारताला मोठ्या प्रमाणात प्रगती करावी लागणार आहे. मात्र, एक खरे आहे, की तेल क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यास भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित होईल आणि देशाचा फार मोठा पैसा वाचून त्यामुळे प्रगती होईल.

निष्कर्ष

ड तेलसंपन्नतेच्या बळावर 20 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था हे सध्यातरी स्वप्नच आहे. तेलक्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यास ते प्रत्यक्षात उतरण्याचा प्रारंभ होईल.

ड आज जरी तेल आघाडीवर आशादायक वातावरण असले तरी प्रत्यक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात तेल मिळण्यास प्रारंभ होईल, तेव्हाच आशा सत्यात उतरणार आहे.

ड गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने तेल संशोधन आणि उत्खननात 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्या तुलनेत यशही मिळाल्याचे दिसून येत आहे.

ड भारताची पूर्ण तेलक्षमता धुंडाळण्यासाठी याहीपेक्षा कितीतरी अधिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे. तसेच यशासाठी संयम, सातत्याची आवश्यकता.

ड तथापि, तेलसंशोधन गुंतवणुकीच्या संदर्भात धोरण सातत्याची आवश्यकता आहे. तेथे राजकीय वादविवाद उपयोगाचे नाहीत, हे पथ्य सर्वांनी पाळायचे आहे.

ड सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे खासगी क्षेत्राला मुक्तद्वार देण्याचे धोरण पुढे त्याच उत्साहात चालविण्याची आवश्यकता असून सातत्यपूर्ण प्रयत्न करणे अनिवार्य.

संकलन  - अजित दाते

Advertisement
Tags :

.