महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-द.आफ्रिका दुसरी वनडे लढत आज

06:58 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार, रिंकू सिंग वा रजत पाटीदारला संधी मिळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ गकेबरहा (पोर्ट एलिझाबेथ)

Advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा दुसरा एकदिवसीय सामना आज मंगळवारी होणार असून त्यावेळी मालिकेचे जेतेपद मिळविण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरेल. या सामन्यात फलंदाजीच्या फळीत उपलब्ध एकमेव जागेवर प्रतिभाशाली रजत पाटीदार व धडाकेबाज रिंकू सिंग यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

अर्शदीप सिंग आणि आवेश खान या युवा वेगवान गोलंदाजांनी सुऊवातीच्या सामन्यात जबरदस्त मारा करून भारताला आठ गडी राखून विजय मिळवून दिल्यानंतर आता कर्णधार के. एल. राहुलला दबाव कमी करणे आवडणार नाही आणि त्याच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये भारतात 0-3 असा जो पराभव स्वीकारावा लागला होता त्याचे उट्टे काढण्याचे ध्येय त्याच्यासमोर असेल.

26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर लक्ष ठेवून रविवारच्या सामन्यानंतर श्रेयस अय्यरने कसोटीची तयारी सुरू केल्याने त्याच्या जागेवर एका राखीव फलंदाजाला पदार्पणाची संधी मिळेल. डावखुऱ्या रिंकू सिंगने उपखंडातील खेळपट्ट्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात चेंडू उसळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर यशस्वी होण्याचे तंत्र आपल्याकडे आहे हे दाखवून दिले आहे. तथापि, इंदूरस्थित पाटीदारने 2022 मध्येच भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळवले होते. परंतु गेल्या एका वर्षात त्याला संघर्ष करावा लागलेला असून या वर्षाच्या सुऊवातीला त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया झाली.

भारतीय संघ व्यवस्थापनाचा खेळाडूंकडे विशिष्ट भूमिका सोपविण्याकडे कल राहिला आहे. रिंकूकडे 6 व्या क्रमांकावरील फिनिशर म्हणून पाहिले जात आहे, तर 30 वर्षीय पाटीदार जेव्हा त्याच्या राज्य संघासाठी म्हणजे मध्य प्रदेशसाठी फलंदाजी करतो तेव्हा तो चौथ्या क्रमांकावर येत असतो. अय्यर या उजव्या हाताच्या फलंदाजाची जागा भरली जाणार असल्याने पाटीदारला संधी मिळू शकते. रिंकूच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सध्या सहावा क्रमांक संजू सॅमसनला देण्यात आला आहे, जो कर्णधार राहुलच्या मागे एक फलंदाज म्हणून खेळायला येतो. संघ व्यवस्थापनाचा कल पाहता ते रिंकूकडे वळण्यापूर्वी त्याच्याहून ज्येष्ठ असलेल्या सॅमसनला त्या स्थानावर योग्य संधी देऊ पाहतील.

तथापि, रिंकूची ‘अ’ श्रेणीतील शानदार कामगिरी (50 च्या जवळपास सरासरी) पाहता संघ व्यवस्थापनाला त्याला निवडण्याचाही मोहही अनावर होईल. खरे तर रिंकू आणि पाटीदार या दोघांनाही संधी मिळू शकते. परंतु त्याकरिता सुऊवातीच्या सामन्यात फक्त दोन चेंडूंना सामोरे जाता आलेल्या तिलक वर्माला वगळावे लागेल,  जे सध्या फारसे समर्पक वाटत नाही. सुऊवातीच्या सामन्यात युवा डावखुरा सलामीवीर बी. साई सुदर्शनने त्याच्या अर्धशतकाच्या माध्यमातून आश्वासक चित्र दाखविलेले आहे.

यजमानांच्या दृष्टीने ही मालिका म्हणजे क्विंटन डी कॉक निवृत्त झाल्यानंतरच्या संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील मोठी चाचणी आहे. डी कॉकचा सुरुवातीचा धडाका नंतर रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन्स आणि डेव्हिड मिलर यांना वेग वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरायचा. पण गोलंदाजीला अनुकूल परिस्थितीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या उणिवा उघड पाडल्या आहेत आणि त्यांना दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. हा सामना दिवस-रात्र खेळविण्यात येईल.

पहिल्या सामन्यात अर्शदीप आणि आवेशने केलेल्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजी विभागात फारसे बदल करण्याची गरज भासणार नाही. मुकेश कुमार, ज्याला 7 षटकांत 46 धावा देऊन एकही बळी मिळविता आला नाही त्याला सुधारित कामगिरी करावी लागेल. जर संघ व्यवस्थापनाला प्रयोग करायचा असेल, तर ते मुकेशच्या जागी त्याचा बंगालचा सहकारी आकाश दीपला घेऊ शकतात. परंतु संघ मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या सामन्यात असे होण्याची शक्यता कमीच आहे. फिरकी विभागात, कसोटीसाठी निवड न झालेल्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांनाही आंतरराष्ट्रीय सामने चुकवायला आवडणार नाही आणि त्यामुळे यजुवेंद्र चहलला संधी मिळणे अवघड आहे.

संघ : भारत-के. एल. राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, बी. साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, रिंकू सिंग, आकाश दीप, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर.

दक्षिण आफ्रिका-एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोन्गवाना, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, रॅसी व्हॅन डर डुसेन, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम्स, काइल वेरेन.

सामन्याची वेळ : सायंकाळी 4.30 वा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article