For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनेस्कोमध्ये भारताने मिळविले मोठे यश

06:20 AM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
युनेस्कोमध्ये भारताने मिळविले मोठे यश
Advertisement

अनेक स्थानांचा जागतिक वारसा सूचीत समावेश

Advertisement

वृत्तसंस्था / पॅरिस, नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्र संघाची सांस्कृतिक संघटना असणाऱ्या ‘युनेस्को’मध्ये भारताने मोठ्या यशाची प्राप्ती केली आहे. भारतातील 64 योगिनी मंदिरे, अशोकाच्या काळातील ठिकाणे यांच्यासह आणखी सहा महत्वाच्या स्थानांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी सूचित करण्यात आला आहे. या संघटनेत भारताचे स्थायी प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाने ही माहिती शुक्रवारी प्रसारित केली.

Advertisement

या सर्व स्थळांना 7 मार्च या दिवशी युनेस्कोच्या अस्थायी सूचीत समाविष्ट करण्यात आले. ज्या महत्वाच्या स्थळांना युनेस्कोकडून चिरंतन वारसा म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता असते, अशा स्थळांना प्रथम अस्थायी सूचीत समाविष्ट केले जाण्याची आवश्यकता असते. याचाच अर्थ असा की, प्रथम अस्थायी सूचीत स्थान मिळाल्याशिवाय ही स्थळे चिरंतन जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे हे यश मोठे मानले जात आहे.

64 योगिनी मंदिरे

भारताच्या पुरातन शिल्पकलेचा वैशिष्ट्यापूर्ण आविष्कार मानली गेलेली 64 योगिनी मंदिरे भारताच्या विविध भागांमध्ये आहेत. या मंदिरांमध्ये पाषाणावर केलेल्या जटील कोरीवकामासह 64 योगिनींची शिल्पे आहेत. त्यामुळे या मंदिरांना ‘64 योगिनी मंदिरे’ म्हणून ओळखले जाते. योगसाधना करणाऱ्या महिलांना ‘योगिनी’ असे संबोधले जाते. या शिल्पांमध्ये असणाऱ्या योगिनी मातृदेवता मानल्या गेलेल्या आहेत. या मंदिरांचा समावेश युनेस्कोच्या अस्थाई सूचीत व्हावा, यासाठी भारत अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होता. हे प्रयत्न आता फळाला आले आहेत. 64 योगिनी मंदिरे मुख्यत्वे पर्वतांवर स्थापन करण्यात आलेली आहेत.

सहा स्थळांचा समावेश

युनेस्कोच्या अस्थायी सूचीत छत्तीसगड राज्यातील कांगेर खोऱ्यातील राष्ट्रीय उद्यान, तेलंगणा राज्यातील महाशीलायुगीन (मेगालिथिक) स्थळे, अनेक राज्यांधील मौर्यकालिन मार्गांवर असणारी अशोककालीन स्थळे, अनेक राज्यांमध्ये असलेली 64 योगिनी मंदिरे, उत्तर भारतातील गुप्त मंदिरे आणि मध्यप्रदेश तसेच उत्तर प्रदेशातील बुंदेलकालीन राजप्रासाद यांचा समावेश आता करण्यात आला आहे.

जागतिक वारसा सूचीत 43 स्थळे

सध्या भारताच्या 43 स्थळांचा समावेश युनेस्कोच्या चिरंतन जागतिक वारसा सूचित करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी 35 स्थळे सांस्कृतिक सूचीत, 7 नैसर्गिक सूचीत आणि 1 मिश्र सूचीत समाविष्ट आहे. अस्थायी सूचीत नव्याने समाविष्ट झालेल्या सहा स्थळांचा समावेश चिरंतन जागतिक वारसा सूचित झाला, तर ही संख्या आणखी काही काळाने 49 इतकी होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी भारतात प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आसाम राज्यातील अहोम राजवंशाच्या ऐतिहासिक स्थळाला या बैठकीच्या माध्यमातून युनेस्कोने मानांकित केले होते, अशी माहिती देण्यात आली.

युनेस्को सूचीतील स्थानाचे महत्व

जगातील पुरातन, नैसर्गिक आणि संस्कृतिक स्थळांना जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याचा अधिकार युनेस्को या संघटनेला आहे. कोणत्याही स्थळाचा समावेश अशा प्रकारे या संघटनेने जागतिक वारसा स्थळ सूचित केल्यास त्या स्थळाला अधिकृत वारसा स्थळाची श्रेणी प्राप्त होते. अशा स्थळांचे संरक्षण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे, ही उत्तरदायित्वे त्या देशाच्या सरकारला स्वीकारावी लागतात. तसेच या स्थळांना जागतिक संरक्षण मिळते. कोणत्याही देशाच्या प्राचीन स्थळांना अशा प्रकारच्या संरक्षणाची आवश्यकता असते. असे संरक्षण न मिळाल्यास आपल्या इतिहासाचे त्या देशाला विस्मरण होण्याची शक्यता असते. युनेस्कोकडून मान्यता मिळालेल्या वारसा स्थळांचे पर्यटनविषयक महत्व वाढते आणि पर्यटकांचा ओढा या स्थळांकडे वाढू शकतो. यामुळे त्या देशाच्या संपत्तीतही भर पडते.

Advertisement
Tags :

.