इंडिया अ 7 गड्यांनी विजयी
सामनावीर रसिख सलाम : 15 धावांत 3 बळी, अभिषेक शर्मा : 24 चेंडूत 58 धावा
वृत्तसंस्था / अल अमारत (ओमान)
येथे सुरू असलेल्या एसीसी पुरुषांच्या टी-20 इमर्जिंग आशिया चषक 2024 च्या क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यात रसिख सलाम आणि अभिषेक शर्मा यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंडिया अ संघाने संयुक्त अरब अमिरातचा (युएई) सात गड्यांनी पराभव केला. या सामन्यात इंडिया अ संघातील रसिख सलामला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 15 धावांत 3 गडी बाद केले.
या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएई संघाचा डाव 16.5 षटकात 107 धावांत आटोपला. या संघातील राहुल चोप्राने एकाकी लढत देत 50 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 50 धावा झळकविल्या. मयांककुमारने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 10, तर कर्णधार बसील हमीदने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 22 धावा झळकविल्या. संयुक्त अरब अमिरातच्या डावामध्ये 6 षटकार आणि 5 चौकार नोंदविले गेले. इंडिया अ संघातील रसिख सलामने 15 धावांत 3 तर रमनदीप सिंगने 7 धावांत 2 तसेच अन्शुल कंबोज, वैभव अरोरा, अभिषेक शर्मा, नेहाल वधेरा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडिया अ संघातील सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने 24 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 58 धावा जमविताना कर्णधार तिलक वर्मासमवेत दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. तिलक वर्माने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 6 चेंडूत 1 षटकारासह 8 धावा जमविल्या. वधेरा आणि बडोनी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. इंडिया अ संघाने हा सामना 55 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी जिंकला. वधेराने 8 चेंडूत नाबाद 6 तर बडोनीने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 12 धावा केल्या. युएईतर्फे रेहमान, फारुक आणि सुकुमारन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. इंडिया अ च्या डावामध्ये 8 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: संयुक्त अरब अमिरात 16.5 षटकात सर्वबाद 107 (राहुल चोप्रा 50, हमिद 22, मयांक कुमार 10, अवांतर 7 रसिख सलाम 3-15, रमनदीप सिंग 2-7, कंबोज, अरोरा, अभिषेक शर्मा, वधेरा प्रत्येकी 1 बळी), इंडिया अ 10.5 षटकात 3 बाद 111 (अभिषेक शर्मा 58, तिलक वर्मा 21, बडोनी नाबाद 12, वधेरा नाबाद 6, प्रभसिमरन सिंग 8, अवांतर 6, ओमीद रेहमान, मोहम्मद फारुकी आणि सुकुमारन प्रत्येकी 1 बळी)