भारत अ चा 4 गड्यांनी विजय
वृत्तसंस्था / राजकोट
येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या अनधिकृत वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शानदार शतकाच्या जोरावर भारत अ संघाने द. आफ्रिका अ संघाचा 4 गड्यांनी पराभव केला. गायकवाडने 129 चेंडूत 117 धावा झळकविल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिका अ संघाने 50 षटकात 9 बाद 285 धावा जमविल्या. भारत अ संघाला विजयासाठी त्यांनी 286 धावांचे आव्हान दिले. अलिकडच्या कालावधीत भारताच्या वनडे आणि टी-20 संघात स्थान न मिळालेल्या गायकवाडने या सामन्यात शानदार फलंदाजी केली. द. आफ्रिका अ संघाच्या डावामध्ये अर्शदीप सिंगने द. आफ्रिका अ संघाची सलामीची जोडी रुबीन हर्मन आणि रिव्हाल्दो मुनसॅमी यांना बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने द. आफ्रिका अ संघाचा कर्णधार अॅकरमनला बाद केले. 12 व्या षटकात द. आफ्रिकेचा अ संघाचा निम्मा संघ 53 धावांत तंबूत परतला होता. डायन फोरेस्टर तसेच डिलानो पॉटगेटर आणि फॉर्च्युन यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सुस्थितीत नेले. फोरेस्टरने 77, पॉटगेटरने 90 तर फॉर्च्युनने 59 धावा जमविल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ च्या डावाला कर्णधार गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी बऱ्यापैकी सुरूवात करुन देताना 64 धावांची भागिदारी केली. अभिषेकने 25 चेंडूत 31 धावा जमविल्या. रियान पराग 8 धावांवर बाद झाला, कर्णधार तिलक वर्माने 39 धावांचे योगदान दिले. नितीशकुमार रे•ाrने 26 चेंडूत 37 धावा केल्या. निशांत सिंधूने 26 चेंडूत नाबाद 29 धावा जमवित आपल्या संघाला 3 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका अ 50 षटकात 9 बाद 285 (फोरेस्टर 77, पॉटगेटर 90, फॉर्च्युन 59), भारत अ 49.3 षटकात 6 बाद 286 (ऋतुराज गायकवाड 117, अभिषेक शर्मा 31, तिलक वर्मा 39, पराग 8, नितीशकुमार रे•ाr 37, निशांत सिंधू नाबाद 29).