भारत अ महिलांचा ऑस्टेलिया अ संघावर विजय
पहिली वनडे लढत : यास्तिकाचे अर्धशतक, राधा यादवचे 3 बळी, अनिका-रॅचेलची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ब्रिस्बेन
यास्तिका भाटियाचे अर्धशतक आणि राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर भारत अ महिला संघाने येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाचा 3 गड्यांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. डावखुरी स्पिनर राधा यादवने 45 धावांत 3, मिन्नू मणी व तितास साधून यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 47.5 षटकांत 214 धावांत आटोपला. त्यानंतर भारत अ संघाने 42 षटकांतच विजयाचे उद्दिष्ट 7 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. यास्तिका भाटियाने 70 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 59 धावा काढल्या. तिने शफाली वर्मासमवेत भारताला शानदार सुरुवात करून देताना 10.4 षटकांत 77 धावांची सलामी दिली. शफालीने 31 चेंडूत 36 धावा फटकावल्या. सिआना जिंजरने ही जोडी फोडताना शफालीला बाद केले.
त्यानंतर यास्तिकाने धारा गुज्जरच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. धाराने 53 चेंडूत 31 धावा जमविल्या. भारत अ ने 23.3 षटकांत 1 बाद 140 अशी भक्कम स्थिती प्राप्त केली होती. टेस फ्लिन्टॉफने गुज्जरला बाद करून ही जोडी फोडली तर किम गर्थने यास्तिकाला बाद केले. यामुळे भारताची स्थिती 3 बाद 157 अशी झाली. ऑफस्पिनर एला हेवर्डने नंतर तेजल हसबनिस व तनुश्री सरकार यांना 30 व 32 व्या षटकात बाद केल्यानंतर भारताची स्थिती 5 बाद 166 अशी नाजूक झाली. पण राघवी बिस्तने कडवी झुंज देत 34 चेंडूत नाबाद 25 धावा जमवित भारत अ संघाचा विजय 42 व्या षटकाअखेर साकार केला. त्याआधी राधा यादव व मिन्नू मणी झटपट बाद झाल्या होत्या. लुसी हॅमिल्टनने हे बळी मिळविले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया अ महिला संघाला अनिका लिअरॉईड (90 चेंडूत नाबाद 92) व रॅचेल ट्रेनामन (62 चेंडूत 51) या दोघींचा अपवाद वगळता अन्य फलंदाजा भारताच्या भेदक माऱ्यासमोर टिकाव धरता आला नाही. ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि 214 धावांत त्यांचा डाव आटोपला. लिअरॉईड व ट्रेनामन यांनी 3 बाद 50 अशा स्थितीनंतर 63 धावांची भागीदारी करून डाव सावरला होता. लिअरॉईडने नंतर निकोल फाल्टमसवेत तिसऱ्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी केली. यावेळी 34.1 षटकांत 4 बाद 158 अशी त्यांची स्थिती होती. पण यानंतर राधा व मिन्नू मणी यांच्यासमोर त्यांचा डाव कोलमडला. या दोघींनी 7 धावांमध्ये त्यांचे चार गडी बाद केले. लिअरॉईडमुळे त्यांना दोनशेचा टप्पा पार करता आला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया अ महिला संघ 47.5 षटकांत सर्व बाद 214 : अनिका लिअरॉईड नाबाद 92, रॅचेल ट्रेनामन 51, राधा यादव 3-45, मिन्नू मणी 2-38, तितास साधू 2-37, शबनम शकील, तनुश्री सरकार प्रत्येकी 1 बळी. भारत अ महिला संघ 42 षटकांत 7 बाद 215 : यास्तिका भाटिया 59, शफाली वर्मा 36, धारा गुज्जर 31, राघवी बिस्त नाबाद 25, हेवर्ड 2-46, लुसी हॅमिल्टन 2-36.