For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत अ चा कसोटी मालिका विजय

06:46 AM Sep 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत अ चा कसोटी मालिका विजय
Advertisement

सामनावीर केएल राहुल, साई सुदर्शन यांची शतके, ऑस्ट्रेलिया अ 5 गड्यांनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेत शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात सामनावीर के.एल.राहुल आणि साई सुदर्शन यांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारत अ ने ऑस्ट्रेलिया अ संघाचा 5 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे यजमान भारत अ संघाने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.  अ संघांमध्ये सर्वाधिक धावांचे उद्दिष्ट पार करून विजय मिळविण्याचा बहुमान भारत अ संघाने मिळविला आहे.

Advertisement

या दुसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया अ ने भारताला निर्णायक विजयासाठी 413 धावांचे कठीण आव्हान दिले होते. पण भारताने 91.3 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात हे उद्दिष्ट गाठत मालिका काबिज केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करुन विजय मिळविण्याची भारतीय संघाची ही सहावी खेप आहे.

या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात 420 धावा जमविल्यानंतर भारत अ चा पहिला डाव 194 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात 226 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर मात्र भारत अ संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया अ चा दुसरा डाव 185 धावांत आटोपल्याने भारत अ संघाला विजयासाठी 413 धावांचे आव्हान मिळाले. भारत अ च्या दुसऱ्या डावामध्ये के. एल. राहुलने 210 चेंडूत 4 षटकार आणि 16 चौकारांसह नाबाद 176 धावा झळकविल्या तर साई सुदर्शनने 172 चेंडूत 100 धावांचे योगदान दिले. पुढील महिन्यात खेळविल्या जाणाऱ्या विंडीजबरोबरच्या कसोटी मालिकेपूर्वी राहुलला फलंदाजीचा सूर मिळल्याचे समजते.

भारत अ संघाने 2 बाद 169 या धावसंख्येवरुन चौथ्या आणि शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. संघाची धावसंख्या 189 असताना मानव सुतार बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि कर्णधार ध्रुव जुरेल यांनी चौथ्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली. साई सुदर्शनने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपले आठवे शतक झळकविले. शतक नोंदविल्यानंतर तो ऑस्ट्रेलिया अ संघाचा फिरकी गोलंदाज रॉचीसिओलीने सुदर्शनला बाद केले. सुदर्शन तंबूत परतल्यानंतर राहुल आणि जुरेल यांनी ऑस्ट्रेलियन अ संघाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेताना पाचव्या गड्यासाठी 115 धावांची भागिदारी केली. या सामन्यात गुरूवारी दुखापतीमुळे 74 धावांवर निवृत्त झालेल्या राहुलने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपले 22 वे शतक 136 चेंडूत झळकविले. राहुलने शतकानंतरच्या 76 धावा केवळ 74 चेंडूत नोंदविल्या. गेल्या जुलैमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत के. एल. राहुलने दोन शतकांच्या मदतीने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 532 धावा जमविल्या होत्या. भारत अ संघाची धावसंख्या 382 असताना जुरेल बाद झाला. त्यानंतर के. एल. राहुल आणि नितीशकुमार रे•ाr यांनी चहापानाला काही मिनिटे बाकी असताना विजयाचे उद्दिष्ट गाठले. नितीशकुमार रे•ाr 16 धावांवर नाबाद राहिला.

पश्चिम विभाग आघाडीवर

चौथ्या डावात अधिक धावांचा पाठलाग करुन विजय मिळविणाऱ्या संघांच्या यादीमध्ये पश्चिम विभाग पहिल्या स्थानावर आहे. 2010 च्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने पश्चिम विभागाला विजयासाठी 536 धावांचे आव्हान दिले होते आणि पश्चिम विभागाने ते यशस्वीरीत्या गाठले होते.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया अ प. डाव 420, भारत अ प. डाव 194, ऑस्ट्रेलिया अ दु. डाव सर्वबाद 185, भारत अ. दु. डाव 91.3 षटकात 5 बाद 413 (के. एल. राहुल नाबाद 176, साई सुदर्शन 100, ध्रुव जुरेल 56, नितीशकुमार रे•ाr नाबाद 16, मर्फी 3-114)

Advertisement
Tags :

.